*बोटावरच्या ‘शाई’ ला पुसणार नाय….*

*बोटावरच्या शाईला पुसणार नाय….*

 

‘ शाई ‘ चा इतिहास प्राचीन आणि फार रंजक आहे . जगातील पुरातन संस्कृतींमध्ये शाईचा वापर लिहिण्यासाठी आणि चित्रे काढण्यासाठी करण्यात आलेला आहे.हाडे, लाकूड, द्राक्षवेली व काजळी यापासून शाई तयार केली जात असे. काजळी पासून बनवलेल्या शाईला लॅंपब्लॅक म्हणतात. ५० ते १०० वर्षांच्या पाईन वृक्षाच्या राळेपासून देखील शाई तयार केली जात असे. प्राचीन इजिप्त मध्ये ख्रिस्तपूर्व २६व्या शतकापासून लिहिण्यासाठी आणि चित्रे काढण्यासाठी शाईचा वापर पपायरस वर केला जात होता.चिनी शाईचा संदर्भ चिनी निथोलिक काळात सापडतो .शाईसाठी लागणारे साहित्य भारतातून चीनमध्ये नेऊन शाई तयार केली जात असे म्हणून तिला ‘भारतीय शाई’ असे संबोधले जायचे. ख्रिस्तपूर्व चवथ्या शतकापासून भारतात शाई वापरल्याचा उल्लेख आहे. भारतात प्रथम दक्षिण भारतात शाईचा वापर सुरू झाला. बौद्ध आणि जैन धर्माची सूत्रे शाईने ग्रंथात लिहिलेली आहेत.

जगाच्या व्यवहारात शाईचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे. शाईने अनेक ग्रंथ निर्माण केले. तलवारीच्या कर्तुत्ववाने जशा अनेक शाह्या निर्माण झाल्या तशाच अनेक सियासिती शाईच्या आधारे वाढल्या,टिकल्या तर बदलल्या गेल्या. शाईमुळे अक्षर साहित्याचा जन्म झाला. शाईमुळे साहित्य व्यवहारात अमुलाग्र क्रांती झाली. विविध शास्त्रांच्या, विज्ञानाच्या, संशोधनाच्या, धार्मिक ग्रंथांच्या, तार्किक व तत्वज्ञानाच्या ग्रंथांच्या निर्मितीमध्ये शाईचा वाटा सिंहाचा आहे. शाई आणि मुद्रणकला हे हातात हात घालून वावरत आल्यामुळे अक्षरसाहित्य उदयाला आले.अशी ही शाई संस्कृती घडवणारी आणि बिघडवणारी देखील आहे. लेखणीद्वारे उमटणाऱ्या शाईने जशी मने जोडली जातात तशी तोडली देखील जातात .अनेक करारमदार शाईने पूर्णत्वास नेले तर अधोगतीला देखील नेले आहेत .अलिकडे तर थोबाड रंगविण्यापासून ते कपडे रंगविण्यापर्यंत शाईचा वापर निषेधाचे हत्यार म्हणून केला जात आहे .जर तलवार खूप लहान असेल आणि लेखणी खूप तीक्ष्ण असेल तर लेखणी तलवारीपेक्षा शक्तिशाली आहे . कलम ही मनाची जीभ आहे. जगात दोन शक्ती आहेत; एक तलवार आणि दुसरी कलम. दोघांमध्ये मोठी स्पर्धा आणि टक्कर आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केलेल्या साप्ताहिक मार्मिक चे ब्रीदवाक्य, “खींचो न कमानों को, न तलवार निकालो,जब तोप मुक़ाबिल हो, तो अख़बार निकालो” हे होते. तलवारीपेक्षा कलमेची शक्ती प्रचंड मोठी असल्याचे त्यातून ते सूचित करतात. युरोपमधील प्रसिद्ध कवी आणि वात्रटिका कार ब्रिटिश कवी जाॅर्ज गोर्डन बायरन म्हणतो “A drop of ink may make a million think.” म्हणजे एक शाईचा थेंब लक्ष लक्ष लोकांना विचार करायला लावतो.इतके सामर्थ्य शाईमध्ये आहे.

निवडणूक प्रक्रियेतील भ्रष्टाचाराला प्रतिबंध करण्यासाठी न पुसल्या जाणाऱ्या शाईचा वापर भारत, मेक्सिको , इंडोनेशिया , मलेशिया आणि अन्य विकसनशील देशात होऊ लागला. भारतात तो १९६२ पासून आजतागायत सुरू आहे.मध्यंतरीच्या काही निवडणूकांमध्ये समाज कंटकांनी ही बोटावरील शाई केमिकल वापरून घालवून , पुसून टाकून पुन्हा मतदान करण्याचा भ्रष्ट मार्ग अवलंबला होता.पण त्यावरही सरकारने उपाययोजना करून तो ही मार्ग बंद केला. मैसूर पेंटस आणि वार्निश लिमिटेड भारतातील एकमेव प्राधिकृत कंपनी न पुसणारी शाई बनवते. ही कंपनी मैसूर येथे असून ती कंपनी जवळपास ३० देशांना न पुसली जाणारी शाई निर्यात करते. अशा बोटावरील शाईची ताकद मोठी आहे,ती शाई देशाची सरकारे घडवते आणि पाडतेही..एका शायरने शाईचे महत्त्व फार मार्मिकपणे विशद केले आहे .तो म्हणतो…

” स्याही की तासीर का अंदाज तो देखिये जनाब,बिखरती है तो दाग बनती है, दर्द मे डुबी तो शायरी और उंगली पर लग जाये तो सरकार बनाती है.”

 

*एक थेंब निळ्या शाईचा*

*लक्ष लक्ष विचारांचा*

*एक डाग बोटावरचा*

*सरकार घडवण्याचा*

 

*लेखक: मोरेश्वर बागडे*

Leave a Comment

× How can I help you?