*ठाणे :* रविवार दि.२६ मे रोजी ठाण्याच्या मराठी ग्रंथ संग्रहालयात संपन्न झालेल्या या सोहळ्यात प्रमुख पाहुणे माननीय दिलीप गडकरी, ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक अनंत देशमुख, मराठी ग्रंथ संग्रहालयाचे अध्यक्ष विद्याधर ठाणेकर, कार्यकारिणी सदस्य मोहन देसाई, ज्येष्ठ कवी बाळ कांदळकर या मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करण्यात आले.
त्यानंतर कवी अजित महाडकर यांच्या हस्ते प्रमुख पाहुणे दिलीप गडकरी यांचा पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
आपल्या प्रास्ताविकात आश्लेषा राजे हिने या प्रकाशनाची संकल्पना कशी सुचली व ती पूर्णत्वास जाईपर्यंतचा प्रवास उलगडून दाखवला.
त्यानंतर एक एक कवी, कवयित्रींनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर त्यांच्या कवितासंग्रहाचे प्रकाशन प्रमुख पाहुणे दिलीप गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले व त्या त्या कवी कवयित्रींचा गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
प्रमुख पाहुणे दिलीप गडकरी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, भावाषयाला चिंतनाची जोड लाभल्यामुळेच समृध्द अभिव्यक्तीच्या आशयसंपन्न कविता हे कवी व कवयित्री लिहू शकले आहेत. त्याबद्दल त्यांनी सर्वांचे त्यांच्या काव्यसंग्रहाच्या निर्मितिबद्दल अभिनंदन केले. ते पुढे असेही म्हणाले की, अनेक मान्यवरांच्या मते काव्य शास्त्र शिकून, अथवा गुरूच्या मागे लागून कविता लिहिता येत नाही. कविता लिहीणे हे सवंगपणाचे काम नाही. आपला आत्मा कवितेत ओतता आला तरच दर्जेदार कविता निर्माण होते व अशी कविता रसिकांचे अंतःकरण भेदू शकते. मला सांगायला आनंद वाटतो की आज ज्यांच्या कवितासंग्रहाचे प्रकाशन झाले आहे त्या सर्व कवींच्या कविता रसिकांचे अंतःकरण भेदू शकतात.
या सर्व कवींनी अवलोकन , आकलन, वाचन, चिंतन, लेखन ही पंचतत्वे लक्षात ठेवली आहेत. त्यांनी पूर्वसुरिंची मळवाट तुडवण्यापेक्षा स्वतःची पाऊलवाट चोखाळली आहे़. या सर्वांनी कवितालेखन हे छंद म्हणून स्विकारले नाही तर ते व्रत म्हणून स्विकारले असून त्याची उपासना केली आहे़, त्यामुळेच सर्वांच्या कवितांची फुले झाली आहेत.
यांच्या अनेक कवितांना चाली लावता येतील. आणि ते फक्त कवी न राहता गीतकार म्हणून नावारूपाला येतील यात शंकाच नाही. या सर्वच कवींनी शब्दांचे भान ठेवून कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त आशय दिला आहे़. जनसामान्यांच्या मनापर्यंत जाणिवांचा प्रकाश नेणारे सर्वांचे शब्द रत्नांसारखे तेजस्वी आणि अस्त्रांसारखे भेदक, धारदार आणि सामर्थ्यवान असल्यामुळेच या सर्वांच्या कवितांचा आस्वाद घेणाऱ्यांच्या मनामध्ये सदवर्तनाचा, सद्विचारांचा, सद्प्रवृत्तींचा प्रकाश निर्माण करण्याची ताकद या सर्वांच्या शब्दांत आहे़. याप्रसंगी गडकरी यांनी ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक व कवी नारायण सुर्वे यांच्या सोबतच्या आठवणींना उजाळा दिला. मनोगताच्या शेवटी त्यांनी सर्व कवींना पुढील काव्यप्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.
स्वाती शृंगारपुरे यांनी अतिशय ओघवत्या शैलीत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी अजित महाडकर यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे, साहित्यिकांचे व रसिकांचे सर्वांच्या वतीने आभार मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.