गुंता मनाचा…

मानवी मन हे एक चमत्कारिक रसायन आहे. ते फुलपाखराप्रमाणे सर्वत्र भिरभिरते. आत्ता इथे आहे म्हणेपर्यंत ते शेकडो किलोमीटरचा प्रवास करून येते. आपले मन पाखरावाणी उडत असते. आधुनिक विज्ञानानुसार व्यक्तीचे विचार भाव-भावना, बुद्धी, जाणिवा या सर्वांचे केंद्र मेंदू आहे. परंतु या भौतिक अवयवाच्या पलीकडे जाऊन एक अमूर्त असे सुक्ष्म इंद्रिय आहे. ते म्हणजे मन होय. मन ही संकल्पना वैदिकसंहितेपासून उपनिषदांमध्येही आपणाला पहावयास मिळते. माणसाच्या पाच ज्ञानेंद्रियांपेक्षाही जास्त उस्फुर्त आणि प्रगल्भ असणारे इंद्रिय म्हणजे मानवी मन होय. मनाला अंत:करण, चित्त अशी नावे दिली आहेत. माणसाची मने बिघडली तर नाती बिघडतात आणि ती नाती सुधारण्यासाठी खूप वेळ द्यावा लागतो. कोणत्याही कार्याला प्रेरणा देणारी असते बुद्धी. पण प्रत्यक्षात कार्य करणारे इंद्रिय हे मन असते. या मनाला भान असते. म्हणूनच संत ज्ञानेश्वर मनाला आकाशाची उपमा देतात. मन असावे राजासारखे परंतु त्याच्यावर नियंत्रण असावे. मन जागृत असले तर सर्व गोष्टी सोप्या होतात. मानवी मन ही जगात सर्वात अनाकलनीय अशी गोष्ट आहे. चांगल्या गोष्टींचे आचरण केल्याने मन शुद्ध होते. निर्मळ आणि विशुद्ध मन हे पवित्र देवालय असते. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या सहा षड्रिपूंचा मनात शिरकाव होऊ देऊ नये. नाहीतर ते अशांत बनेल. मन एकाग्र करण्यात अडचणी येतील. म्हणूनच मनाला पटेल तेच करावे. यामुळे मनाची एकाग्रता वाढते.

तुकारामांच्या शिकवणीनुसार ‘मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण’ यातच नैराश्य घालवण्याची मात्रा सापडते. बाहेरील घटनांकडे फार लक्ष न देता अंतरीक सुखाकडे लक्ष दिले तर मन ठणठणीत होते. शरीराची प्रगती करते आणि मनाची शांती होते. औषध, गोळ्या हे बाह्योपचार आहे परंतु मनाचे चैतन्य हा अंतरोपचार आहे. म्हणूनच आजारी व्यक्तीला मन प्रसन्न ठेवण्याचा सल्ला दिला जातो. कारण आशा आणि निराशा या मनातच वस्ती करून असतात. पण निराश असेल तर आशा देखील काही करू शकत नाही. मन नेहमी आशावादी असते. चांगले शोधणे, भले करणे, सुख मानणे या चांगल्या मनाच्याच व्याख्या आहेत.

मनाच्या या सैराटपणासाठी खान्देशी कवयित्री बहिणाबाईंनी मनावर खूप सुंदर रचना केली आहे.

मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू

मात

आता होतं भुईवर गेलं गेलं आभायात

माणसाचं मन इतकं चंचल आहे की त्याचा ठावही लागत नाही. ते कधी कोणावर जडेल आणि कधी कोणाशी तुटेल याचा मागमुसही लागत नाही. मनाला बांधुन घालण्यासाठी कोणताही दोर चालत नाही.पिकात घुसलेल्या ढोरावाणी ते मोकाट उंडारत असते. त्याला कशाचाही धरबंध नसतो. ते एखाद्या गोष्टीत गुंतलं तर तो गुंता सुटता सुटत नाही आणि आपला जीव ओवाळून टाकते.

आपले मन ज्याला आपण भावनाप्रधान होऊन अंत:करण म्हणतो असे हे मन शरीराचा कोणताही अवयव नसताना देखील आपले सर्व धागेदोरे त्याच्याशी निगडीत असतात. आपण एखादी गोष्ट करून घ्यायची असेल तरी पटकन बोलून जातो, “आता घे ना मनावर” पण मनावर घ्यायचे म्हणजे कुठे घ्यायचे हे कोणीच सांगू शकत नाही. एका कवीने तरी म्हटले आहे ,”बा मना, बन तू दगड” आता मन हे कोणताही अवयव नसताना आपण त्याला दगडाचे रूप देऊ इच्छित असतो. मनावर ताण येणे, मन मोकळे होणे, मन गुंतणे, मनाच्या वाटा, मन हलके होणे, मनातल्या मनात पुटपुटणे, मनातले सांगणे, मनीचे गुपित, मनात जागणे, मनाचे खेळ, मन जडणे अशा कितीतरी मराठी म्हणी आणि वाक्प्रचार या मनावर रचले गेले आहेत. इतके आपण मनाला गृहीत धरतो. त्याला वाटणाऱ्या भावभावनांचा आपण विचार करतो.

एवढेच नव्हे तर मारुतीस्तोत्रात देखील मनाच्या वेगाविषयी वर्णन केले आहे. ‘मनासि टाकिले मागे, गतीसी तुळणा नसे’ म्हणजेच या मनाने हनुमानालासुद्धा मागे टाकले आहे इतका त्याचा वेग आहे. मनाचे वारू चौफेर उधळणारे आहे आणि ते अशांत,चंचल असुनही सर्वांना हवहवसं वाटणारं आहे.

संतकाव्यातदेखील मनाविषयी अनेक स्तोत्र किंवा रचना असलेल्या आपणास दिसून येतात. आपल्या करुणाष्टकात संत रामदास देखील लिहीतात,

अनुदिन अनुतापे तापलो रामराया

परमदिनदयाळा नीरसी मोहमाया

अचपळ मन माझे नावरे आवरीता

तुजविण शिण होतो धांवरे धांव आता ||

संत रामदास देखील या मनाच्या चपळपणाचा लागला नाही, मन आवरत नाही असे ते बोलून जातात.

आपल्या या मनाला चेहरामोहरा नसतो. वर्ण नाही. तरीही आपल्या जीवनाचा तो अविभाज्य घटक आहे. खूप महत्वाचा असा न दिसणारा,आभासी, परंतु सतत जाणवत राहणारा असा अवयव आहे. त्याच्याशिवाय आपले खूप अडत असते. मन नसेल तर समजूत कशाची घालायची? अदमास कशाचा घ्यायचा? ठाव कशाचा लावायचा? हे आपणाला समजत नाही. कवी संगीतकार सुधीर मोघेंचे मनाशी अगदी घट्ट असे नाते आहे. ते आपल्या कवितेत म्हणतात, “माझे मन तुझे झाले, तुझे मन माझे झाले”. मनाला डोळे, कान नसतात पण ते सर्वत्र पाहू शकते, सर्वकाही ऐकू शकते. एवढा त्याचा विस्तार मोठा आहे.

एखाद्याच्या मनात काय विचार चालू आहेत ते ओळखणं सोपं नाही. मानसशास्त्रज्ञ देखील कुणाच्या मनाचा ठाव घेऊ शकत नाहीत इतके ते खोल आहे की त्याचा थांग काही लागत नाही. जीवनातले घोटाळे सोडवू शकू पण मनाचे घोटाळे, गुंता सुटता सुटत नाही. मनाचा आपण जो जो विचार करायला जाऊ तो तो जास्तच गर्तेत अडकले जाऊ. मन मारुन जगण्यापेक्षा संकटावर मात करून जगण्यातच मनाला उभारी मिळते. प्रसन्न मन सर्व कार्य सिद्धिस नेते.

“मन मनासि होय प्रसन्न |तेव्हा वृत्ति होय निरभिमान” या अभंगातून संत एकनाथ आपली वृत्ती निराभिमान होण्यासाठी मनाला प्रसन्न करून घेण्याचा सल्ला देतात. कारण आपले मन हे एक दैवत आहे आणि या दैवताला प्रसन्न केलं तर कुठलेही कार्य सिद्धीस जाण्यास वेळ लागत नाही. मनाचा समतोल, संयम आणि मनाला लावलेलं योग्य वळणच आपल्याला योग्य ठिकाणी घेऊन जाऊ शकतं, ही गोष्ट खरी असली तरी सोपी नक्कीच नाही कारण मन अस्थिर आहे. वाऱ्यापेक्षा गतिमान आणि पाऱ्यापेक्षा गुळगुळीत अशा मनाचा ठाव घेणे किंवा त्याच्यावर ताबा मिळवणे केवळ अशक्यच आहे. मनावर ताबा मिळवण्यासाठी कुठे तपोवनात किंवा जंगलात जाऊन तप करावे लागत नाही. आपण आपले जीवन जगताना त्याच्यावर ताबा मिळवू शकतो. आत्मचिंतन करून ‘स्व’ ला म्हणजेच आपल्या मनाला ओळखण्याचा प्रयत्न करायचा. आपल्या स्वभावाचे कंगोरे जाणून घेतले आणि मनाला सकारात्मक विचारांची झालर जोडली की मनाला प्रसन्नता येते. जगातील सुख दुःख हे मानण्यावर असते. म्हणूनच रामदास स्वामी म्हणतात, “जगी सर्व सुखी असा कोण आहे? विचारी मना तू चि शोधून पाहे”.

वरपांगी दिसणारे शारीरिक सुख हे खरे सुख नसून मन सुखी तर सर्व सुखी असेच म्हटले जाते. मोकळ्या मनाची व्यक्ती खऱ्या अर्थाने सुखी असते असे वाटते.

 

सौ.भारती सावंत

खारघर, नवी मुंबई

9653445835

Leave a Comment

× How can I help you?