ठाण्यात भरले फुलपाखरू प्रेमींचे संमेलन प.द. मंडळ , एन्व्हायरो व्हिजिल, ठाणे जनता सहकारी बँक आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा उपक्रम

ठाणे : 5 जून, जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अनेक संस्था विविध कार्यक्रम उपक्रम राबवित असतात याचाच एक भाग म्हणून पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी अग्रेसर असणाऱ्या ठाण्यातील पर्यावरण दक्षता मंडळ आणि एन्व्हायरो व्हिजिल या संस्थांनी ठाण्यात फुलपाखरूप्रेमींचे एक संमेलन आयोजित केले होते. ठाणे पूर्व येथील भारतीय स्त्री जीवन विकास संस्थेच्या सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला ठाणे जनता सहकारी बँक आणि महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

या कार्यक्रमासाठी एन्व्हायरो व्हिजिल चे अध्यक्ष डॉ. विकास हजिरनीस, पर्यावरण दक्षता मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. संजय जोशी, खजिनदार प्रा. विद्याधर वालावलकर, मंडळाच्या ‘आपलं पर्यावरण’ मासिकाच्या कार्यकारी संपादिका कविता वालावलकर, सचिव सौ. संगीता जोशी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी आनंद काटोळे व शकील शेख आणि ठाणे जनता सहकारी बँकेच्या ठाणे पूर्व शाखेच्या मॅनेजर सौ. शमिका भिसे हे मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात पर्यावरण दक्षता मंडळाच्या ‘देवराई’ प्रकल्पावर तयार करण्यात आलेल्या एका चित्रफितीने झाली. त्यानंतर पर्यावरण दक्षता मंडळाच्या प्रकल्प प्रमुख आणि ठाण्याच्या बांदोडकर महाविद्यालयातील उप-प्राध्यापिका सुरभि वालावलकर ठोसर यांनी पर्यावरण दक्षता मंडळ आणि एन्व्हायरो व्हिजिल या संस्थांची माहिती सांगितली आणि काही नव्याने सुरुवात झालेल्या प्रकल्पांची ओळख करून दिली. ‘माझा तलाव’ या प्रकल्पाला पर्यावरण दिनाच्या निमित्ताने १ वर्ष पूर्ण झाले असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे शकील शेख यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पर्यावरण संवर्धनातील कार्यावर प्रकाश टाकला आणि पर्यावरण दक्षता मंडळाच्या कार्याला शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले ते डॉ. संजय जोशी यांचे ‘जागतिक पर्यावरण दिन २०२४’ या दिवसाच्या संकल्पनेविषयीचे व्याख्यान. त्यांनी आपल्या व्याख्यानात पर्यावरण दिनाचा इतिहास, त्यामागील कारणे इ. स्पष्ट केले. यावर्षीची पर्यावरण दिनाची संकल्पना होती ‘जमिनीचे पुनरुज्जीवन, वाळवंटीकरण थांबविणे आणि दुष्काळाशी सामना’. ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी आपण काय करू शकतो याविषयी डॉ. जोशी यांनी मार्गदर्शन केले. या व्याख्यानानंतर सौ. संगीता जोशी यांनी पर्यावरण दक्षता मंडळाच्या ‘देवराई’ या प्रकल्पाबद्दलचे काही अनुभव सांगितले. या प्रकल्पाची सुरुवात, देवराईचे काम करत असताना आलेल्या समस्या आणि सर्व अडथळ्यांवर मात करून संस्थेला मिळालेले यश हा सगळं प्रवास त्यांनी उलगडून सांगितला. त्यानंतर श्री. विद्याधर वालावलकर यांनी संस्थेच्या ‘गणेश मंदिर देवराई’ या नव्याने सुरु झालेल्या प्रकल्पाविषयी अतिशय महत्वपूर्ण माहिती दिली. त्यानंतर पर्यावरण शाळेच्या प्रकल्प प्रमुख आणि कार्यक्रमाच्या सूत्रसंचालिका पौर्णिमा भोसले शिरगावकर यांनी फुलपाखरू उद्यान कसे तयार करावे याविषयी थोडक्यात मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने पर्यावरण दक्षता मंडळाने काही फुलपाखरू तज्ज्ञांना निमंत्रण दिले होते. डॉ. राजू कसंबे. डॉ. अमोल पटवर्धन, डॉ. पूनम कुर्वे, श्री. दिवाकर ठोंबरे व श्री. परेश चुरी या तज्ज्ञांच्या हस्ते ‘आपलं पर्यावरण’ मासिकाच्या जून महिन्याच्या अंकाचे प्रकाशन झाले. या सर्वांचा परिचय सौ. कविता वालावलकर यांनी करून दिला. प्रकाशनानंतर ३० गृहनिर्माण संस्थांना फुलपाखरू उद्यानासाठी प्रत्येकी १ रोप देण्यात आले. प्रत्येक गृहनिर्माण संस्थेला ५० रोपांचा एक सेट देण्यात येणार आहे. त्यापैकी ४९ रोपं नंतर सर्व संस्थांना घरपोच देण्यात येतील. रोपं स्वीकारताना सर्वांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. विकास हजिरनिस यांनी आपले विचार मांडले.
पर्यावरण दक्षता मंडळाच्या ‘ग्रीन्स’ प्रकल्पाचे प्रमुख शुभम निकम यांनी सर्व मान्यवरांचे आणि सहभागींचे आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Leave a Comment

× How can I help you?