प्रत्येक सुसंस्कृत समाजात दानशूर मंडळी असतातच.किंबहुना दानशूर मंडळींची संख्या त्या समाजाची श्रीमंती ठरवत असते.पण आज देशात श्रीमंत म्हणून गणता येईल अशा मंडळींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.त्या मानाने दानशूर मंडळीची संख्या वाढताना दिसत नाही.हे कशाचे लक्षण आहे. एकतर जीवनात यशस्वी झालेल्या या साऱ्यांना आपल्या समाजाचं आपल्यावर ऋण आहे,असे वाटत नसावे किंवा दान घेणाऱ्या व्यक्ती वा संस्था यांच्या सामाजिक कल्याणकारी कामाबाबत त्यांच्या मनात साशंकता असावी.काहीजण देणगी देऊ इच्छितात ते त्या देणगीच्या बदल्यात काहीतरी मिळवायची इच्छा धरतात.अगदी मंदिरात जाणारा देखील प्रत्यक्ष परमेश्वराशी सुद्धा सौदा करतो. अमुक झाले तर तमुक करीन असा नवस बोलून देवाशीही सौदा केला जातो.सौद्याला देणगी कशी म्हणता येईल ?.ती आत्मवंचनाच आणि सौदेबाजी होय.अनामिक देणगी ही खरी देणगी,तद्वत विनाशर्त दिलेली देणगी ही खरी देणगी. चांगल्या हेतूने सश्रद्ध भावनेने कोणतीही अपेक्षा न ठेवता केलेल्या दानाला अनन्यसाधारण महत्त्व आपल्या भारतीय संस्कृतीत आहे..
: मोरेश्वर बागडे
