*ठाणे कारागृहावरून भाजप-राष्ट्रवादी आमने-सामने; पार्क उभारण्यास आमदार संजय केळकरांचा विरोध*

ठाण्यातील 200 वर्ष जुने असलेले जेल पडघा येथे नेण्यात यावे आणि त्या जागी पार्क उभारावे अशी मागणी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नजीब मुल्ला यांनी केली होती. या प्रस्तावाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिरवा कंदील दाखवला असून ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी पडघा येथे दोनशे एकर जागा देणार असल्याचे सांगितले. मात्र भाजपचे आमदार संजय केळकर यांनी या वास्तूचे पार्कात रूपांतर करण्यासाठी कडाडून विरोध केला आहे. बिल्डर लॉबीचा हा छुपा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान आम्ही या पुरातन वास्तूचे पार्कात रूपांतर होऊ देणार नाही, असा इशाराच आमदार संजय केळकर यांनी दिला आहे.

ठाणे जेलची वास्तू ही 200 वर्ष जुनी आहे. सुरुवातीला या किल्ल्यावर पोर्तुगीज आणि ब्रिटिशांनी राज्य केले. मात्र त्यानंतर अनेक क्रांतिवीरांना येथे फाशी देण्यात आली आहे. त्यामुळे याला एक ऐतिहासिक महत्त्व आहे. ठाणे हे एक सांस्कृतिक शहर म्हणून ओळखले जाते. त्यामुळे ठाणेकरांना हे कधीही आवडणार नाही. जर कैद्यांची संख्या जास्त आहे, तर जेलच्या मागेच पाच हेक्‍टर जागा आहे, तिथे कैद्यांसाठी जागा बांधता येईल.

त्याचबरोबर जेलच्या मागच्या बाजूला जैवविविधता उद्यान बांधण्यात येत असून कोविड काळात त्याचे काम सुरू झाले. मात्र काही कारणास्तव ते पूर्ण होऊ शकले नाही. आता पुन्हा एकदा त्या जैवविविधता उद्यानाचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे ठाणेकरांना इथे आणखी कोणत्याही पार्कची गरज नाही. बिल्डर लॉबीचा एक डाव असल्याचा आरोप भाजप आमदार संजय केळकर यांनी केला.

दरम्यान या जेलच्या बाजूलाच ठाणे जिल्हा न्यायालय, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस आयुक्तालय आणि जिल्हा रुग्णालय जवळ असल्याने हीच जेलची योग्य जागा असून, जे पक्के कैदी आहेत त्यांना पडघा येथे नेण्यात यावे, अशी मागणी देखील केळकर यांनी केली आहे. याआधी हा विषय अधिवेशनात मांडला असून आता पुन्हा एकदा हा विषय अधिवेशनात मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Comment

× How can I help you?