आमदार राजू पाटील यांचा भाचा असल्याचे सांगून लुटणाऱ्या भामट्यास अटक

डोंबिवली : महात्मा फुले रोड परिसरात एका वयोवृद्ध व्यक्तीने विष्णूनगर पोलिस ठाण्यात विजय तांबेविरोधात तक्रार केली होती. त्याने पोलिसांना सांगितले की, मला रस्त्यात एक व्यक्ती भेटली. त्याने सांगितले की, मी मनसे आमदार राजू पाटील यांचा भाचा आहे. मी तुम्हाला त्या दिवशी आमदारांसोबत भेटलो होतो.

काका त्याच्या या बोलण्यानंतर आठवत होते की, मी याला नक्की कधी भेटलो. इतक्यात त्याने आजोबांकडील दागिने आणि 10 हजार रुपयांची रोकड घेऊन पळ काढला. आजोबा बँकेतून नुकतेच बाहेर पडले होते. त्याच वेळी ही घटना घडली.

अशीच एक तक्रार डोंबिवलीतील रामनगर पोलीस ठाण्यात देखील दाखल झाली होती. पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ, विष्णूनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी दिग्विजय भवार यांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला. ज्या ठिकाणी आजोबांना बतावणी करुन लुटले गेले, तेथीस सीसीटीव्ही पोलिसांच्या हाती लागले.

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपीच्या घरी छापा टाकला. तो घरी सापडला नाही. ज्येष्ठ नागरिकांना लुटणारा हा व्यक्ती रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. पोलिसांनी काही दिवसात त्याला खारघर येथून अटक केली. अटक होण्याआधी त्याने दोन वयोवृद्धांना लूटले होते. विजय तांबे याने अटक झाल्यानंतर सर्व गुन्ह्यांची कबुली दिली. विजय तांबे याला असाध्य आजार आहे. त्या आजाराचे त्याच्याकडे वैद्यकीय प्रमाणपत्र आहे. न्यायालयात तो ते प्रमाणपत्र दाखवून सहानुभूती मिळवतो.

याच आधारे त्याला न्यायालयाकडून जामीन मिळतो. जामीनावर सुटून आला की तो पुन्हा लोकांना गंडा घालण्याचे काम करतो. यावेळी पोलीस त्याला न्यायालयात हजर करताना सर्व परिस्थिती कथन करणार आहेत. जेणेकरुन त्याला पुन्हा जामीन मिळू नये. आतापर्यंत 50 पेक्षा जास्त लोकांना त्याने गंडा घातला आहे.

Leave a Comment

× How can I help you?