स्वप्निल कुसाळे हे नाव आज देशातल्या प्रत्येकाच्या तोंडात आहे. त्याचे कारण पॅरिस इथे होत असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत त्याने 50 मीटर रायफल थ्री पोझिशनमधील प्रकारात देशाला कांस्य पदक मिळवून दिले आहे. पण हे पदक मिळवण्या आधी त्याला करावा लागलेला संघर्ष, त्याची तपश्चर्या, त्याची मेहनत याकडे कानाडोळा करून चालणार नाही.

स्वप्निल कुसाळे याचा जन्म कोल्हापूरच्या कांबळवाडीचा आहे. 6 ऑगस्ट 1995 साली त्याचा जन्म झाला. सर्व सामान्य कुटुंबात त्याचा जन्म झाला. त्याचे वडील हे शिक्षक आहेत. भाऊ ही शिक्षक आहे. तर आई कांबळवाडीच्या सरपंच आहेत. स्वप्निलने 2008 मध्ये अभिनव बिंद्राला खेळताना पाहीले. त्यानंतर त्याने निश्चिय केला की आपणही नेमबाज बनायचे. त्याने आपली इच्छा वडीलांना सांगितली. नेमबाजीतही त्याने 50 मीटर रायफल थ्री पोझिशन हा प्रकार निवडला. हा खेळ तसा खर्चीक होता. पण मुलासाठी वडीलांनी पाऊल उचललं. 2009 साली नाशिकच्या क्रिडा प्रबोधिनीत दाखल झाला. तेव्हा पासून त्याच्या नेमबाजीला खऱ्या अर्थाने सुरूवात झाली. तिथेच स्वप्नील घडला.

नेमबाजीत स्वप्निल आपले हात अजमावत होता. पण हा खेळ तसा खर्चीक होता. नेमबाजाला बंदुकीतल्या बुलेट गरजेच्या असतात. या बुलेट महाग असतात. रायफल आणि जॅकेटचा खर्च हा वेगळा असतो. त्यावेळी एका बुलेटची किंमत 120 रूपये होती. अशा स्थितीत बुलेट घेण्यासाठी स्वप्निलकडे पैसेही नव्हते. त्याचा सरावही त्यामुळे थांबणार होता. मुलाचा सराव थांबला तर मोठे नुकसान होईल. हे लक्षात घेता स्वप्निलच्या वडीलांनी त्यावेळी कर्ज काढले. त्यातून स्वप्निलला सर्व साहीत्य घेवून दिले. रायफलमधील बुलेट महाग असल्याने, त्या तो काळजीने वापरत होता. अशा पद्धतीने त्याचा शुटींगचा श्रीगणेशा झाला.

पुढे स्वप्निलने आंतरराष्ट्रीय स्पर्धात चुणूक दाखवायला सुरूवात केली. त्यावेळी लक्ष्य स्पोर्ट्स सारखी संस्था त्याच्या मागे खंबीर पणे उभी होती. प्रत्येक स्पर्धेत त्याच्या मागे सुधारणा होत गेली. 2022 साली झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये त्याने चौथे स्थान पटकवले. ही स्पर्धा त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. कारण या स्पर्धेत चौथे स्थान पटकावल्यामुळे त्याला पॅरीस ऑलिम्पिकमध्ये थेट प्रवेश मिळाला. त्याच वर्षी झालेल्या एशियन गेम्समध्ये त्याने सुवर्ण पदकाला गवसणी घातली होती. तर विश्वचषक स्पर्धेत त्याने तिन पदकं जिंकली. त्यात एक सुवर्ण तर दोन रौप्य पदकाचा समावेश होता.

Leave a Comment

× How can I help you?