आध्यात्मिक स्वास्थ्याची अमृतवाणी

आकाशवाणी एकदाच होते, पण ज्ञानेश्वर माऊलींची अमृतवाणी मात्र कानावर पडून हृदयाच्या आतल्या कप्प्यापर्यंत झिरपते आणि मनोमनी रेंगाळत राहते, पदोपदी आठवत राहते. उत्कृष्ट साहित्याचे अद्भुत उदाहरण म्हणजे ज्ञानेश्वरी असून त्यातील आध्यात्मिक आरोग्याचे दाखले आजच्या युगातही माझ्या वैद्यकीय व्यवसायात समर्पक वाटतात. दैनंदिन आयुष्यात एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करत राहतात!
आध्यात्मिक स्वास्थ्य (आरोग्य ) म्हणजे काय, याचा विचार करता असं म्हणावं लागेल की, आध्यात्मिक स्वास्थ्य म्हणजे माणसाच्या आयुष्यातील खोल अर्थ, समाधान, शांती, सकारात्मकता आणि जीवनातील उद्दिष्ट यांची जाणीव व अनुभव होणे. हे केवळ धर्माशी संबंधित नसून स्वतकडे पाहणे, आत्मपरीक्षण करणे, जीवनाचा अर्थ शोधणे आणि आपल्या अस्तित्वाचा मोठ्या संदर्भात विचार करणे या सर्व गोष्टींशी संबंधित आहे.
आध्यात्मिक स्वास्थ्याची वैशिष्ट्ये महत्त्वाची आहेत. म्हणजे, मनाची शांतता व शुद्धता महत्त्वाची. आध्यात्मिकदृष्ट्या स्वस्थ व्यक्तीचे मन शांत, सकारात्मक आणि शक्तिशाली असते. तो प्रत्येक परिस्थितीत आनंदी राहतो आणि मानसिक तणाव टाळतो.
त्याचप्रमाणे आत्मपरीक्षण व स्वतकडे पाहणे हेही गरजेचे आहे. ‘अधि आत्म’ म्हणजे स्वतकडे पाहणे, आत्मपरीक्षण करणे. यातून जीवनाचा खोल अर्थ समजतो आणि पूर्णत्वाची आस निर्माण होते.
सकारात्मकता व प्रेम यांचीही गरज असते. आध्यात्मिकता नकारात्मकता दूर करते. प्रेम, कृतज्ञता आणि सहिष्णुता वाढवते. तसेच समाजाशी जवळीक निर्माण करते.
सर्वांगीण आरोग्याचा पाया जाणून घ्यावा. डब्ल्यूएचओच्या मते, शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक आरोग्य मिळूनच संपूर्ण आरोग्य निर्माण होते. त्यामुळे केवळ शरीर निरोगी असणे म्हणजे आरोग्य नाही, तर मन आणि आत्माही संतुलित असणे आवश्यक आहे.
आशा, समाधान, क्षमा हे गुण काम अंगी बाळगावेत. आध्यात्मिक मनोवृत्तीतून आशा, समाधान, क्षमाशीलता, प्रेम, सहिष्णुता, नम्रता, आत्मविश्वास, आणि संतुष्टता या गुणांचा विकास होतो.
आध्यात्मिक स्वास्थ्याचे फायदे खूप आहेत. मानसिक तणाव, चिंता, भीती, क्रोध, लोभ यांसारख्या नकारात्मक भावना कमी होतात. तसेच शारीरिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो; प्रतिकारशक्ती वाढते. हृदयविकार, रक्तदाब अशा विकारांमध्ये मदत होते. जीवनात अर्थ आणि उद्दिष्ट मिळते, ज्यामुळे समाधानाची भावना वाढते.
आध्यात्मिक स्वास्थ्य जोपासण्यासाठी साधना (ध्यान, योग, प्रार्थना), सत्संग (सकारात्मक संगत), सेवा (निस्वार्थ सेवा), आत्मसमर्पण (मोठ्या शक्तीवर विश्वास ठेवणे) करावे.
काही अलौकिक साहित्य प्रकार तुम्हाला अशा प्रकारचे आध्यात्मिक आरोग्ययुक्त जीवन जगायला शिकवतात आणि मग या साहित्यातून मिळणाऱया उत्कट प्रतिभावंत संतकवींचा सहवास जणू तुमच्या आयुष्याचेच इतरांना वस्तूपाठ देणारे पुस्तक बनवून टाकतो. अमृतानुभव देणारी ज्ञानेश्वरी त्यात अग्रगण्य आहे!
ज्ञानेश्वरी म्हणजे 13व्या शतकातील महान साहित्यकृती आहे. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ संत ज्ञानेश्वरांनी 12व्या शतकाच्या शेवटी, म्हणजे सुमारे इ.स. 1290 च्या सुमारास लिहिला. हा ग्रंथ भगवद्गीतेवर मराठीत केलेले सर्वात प्राचीन आणि सर्वात प्रभावी भाष्य मानला जातो. संत ज्ञानेश्वरांनी आपल्या अलौकिक प्रतिभेने आणि भक्तीभावनेने या ग्रंथात तत्त्वज्ञान, भक्ती आणि जीवनशास्त्र यांचा सुंदर संगम साधला आहे. ज्ञानेश्वरीचा काळ हा महाराष्ट्रात संत साहित्याचा सुवर्णकाल मानला जातो
ज्ञानेश्वरांनी भक्तीला एक नवा आयाम दिला. लोकभाषेचा स्वीकार करून ज्ञानेश्वरी लिहिली. संस्कृत हे तत्त्वज्ञानाचे मुख्य माध्यम होते. पण ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेत भगवद्गीतेचे भाष्य करून लोकांना तत्त्वज्ञान समजावून सांगितले.

सामाजिक समरसता हे ज्ञानेश्वरीचे वैशिष्ट्य आहे. त्या काळी जातीय भेदभाव प्रचंड होता. पण ज्ञानेश्वरांनी आपल्या ग्रंथात सर्व जाती-धर्मांना समान मानले. ज्ञानेश्वरीतील काही महत्त्वाचे उदाहरणे आणि त्यांचे कालखंडाशी संबंध लक्षात घेणे आवश्यक आहे.
1. उपमा अलंकार-लोकजीवनातून घेतलेली उदाहरणे. ‘जैसे पाण्याच्या लाटेवर पाणी तैसे जीवात्म्यात परमात्मा.’ (अध्याय 6, ओवी 45) ही उपमा म्हणजे आत्मा आणि परमात्म्याचे अभिन्न नाते दाखवते. पाण्याच्या लाटेवर पाणी कसे एकसारखे असते, तसेच आत्मा परमात्म्याचा भाग आहे.
‘जसे दुधात साखर मिसळावी तसे भक्तीत परमात्मा मिसळतो.’ (अध्याय 7, ओवी 10) सोप्या आणि रोजच्या जीवनातील वस्तूंमधून घेतलेली उपमा लोकांच्या मनाला सहज भावते.
2. रूपक अलंकार-तत्त्वज्ञानाची सजीव मांडणी. अशा प्रकारे मन हे सिंहासनासारखा आहे, ज्यावर आत्मा म्हणजे राजा बसतो. (अध्याय 2, ओवी 20) या रूपकाद्वारे ज्ञानेश्वरांनी मनाचे महत्त्व आणि त्यावर आत्म्याचा वास याचे सुंदर चित्रण केले आहे.
ज्ञानेश्वरीच्या काळातील भाषिक वैशिष्ट्ये समजून घेतले पाहिजे. मराठी भाषेचे प्राचीन स्वरूप कसे होते, ते ज्ञानेश्वरीतून कळते. ज्ञानेश्वरीतील मराठी ही मध्ययुगीन मराठी आहे, ज्यात संस्कृत शब्दांचा समावेश असूनही ती सहज समजण्यासारखी आहे. शिवाय ज्ञानेश्वरीत ओवी छंदाचा वापर केला गेला आहे. ओवी छंद हा लोकगीतांसाठी वापरला जाणारा छंद आहे. त्यामुळे ज्ञानेश्वरी गेय आणि लयबद्ध आहे. साधी पण प्रभावी भाषा हे ज्ञानेश्वरीचे वैशिष्ट्य आहे. संस्कृतच्या गूढ तत्त्वज्ञानाला सोप्या मराठी भाषेत मांडण्याचा प्रयत्न ज्ञानेश्वरांनी केला. आणि लोकांपर्यंत तत्त्वज्ञान पोहोचवले. ज्ञानेश्वरीने भक्ती चळवळीला चालना दिली, वारकरी संप्रदायाला बळकटी दिली.
वैद्यकीय आणि मानसिक स्वास्थ्याशी ज्ञानेश्वरीचा संबंध आहे. कारण, ज्ञानेश्वरीचे पठण केल्याने मानसिक शांती आणि सकारात्मक ऊर्जा वाढते, असे अनेकांनी अनुभवले आहे. वारकरी संप्रदायात ज्ञानेश्वरीचे अभंग आणि ओवी नियमितपणे गायले जातात, ज्यामुळे मानसिक स्वास्थ्याला चालना मिळते.
काही संशोधनांत असेही नमूद आहे की, मंत्रोपचार आणि अभंग संगीतामुळे तणाव कमी होतो, रक्तदाब नियंत्रित राहतो. उदाहरण द्यायचे तर गीतेचा अध्याय 1 म्हणजे अर्जुनविषादयोग वाचावा.
त्यात अर्जुनाच्या मनातील द्विधा, शंका आणि युद्धाच्या संदर्भातील विषाद व्यक्त केला आहे. जीवनातील संघर्ष आणि मन:स्थिती यावर प्रकाश. ‘जैसे डोळ्यांना अंजन लागल्यावर दृष्टी खुलते,’ तसेच ज्ञानेश्वर म्हणतात, ‘गुरु भजल्यावर होते दूरदृष्टी लाभते.’
गीतेतील अध्याय 3 म्हणजे कर्मयोग, यात म्हटले आहे की, ‘शेतकरी आपले काम करतो, त्याचप्रमाणे मनुष्याने कर्म करावे.’ निस्वार्थ कर्म करण्याचा संदेश यात देण्यात आला आहे.
गीतेचा अध्याय 6 म्हणजे आत्मसंयमयोग. त्यात, ‘जसे शांत नदी समुद्रात मिळते, तसे ध्यानयोगाने मन शांत होते,’ असे म्हटले आहे. ध्यानयोगाचे महत्त्व खूप मोठे आहे. शांत आणि स्थिर मनात प्रचंड शक्ती आहे.
गीतेचा अध्याय 9 म्हणजे राजविद्याराजगुह्ययोग असून त्यात, ‘जसे सूर्य सर्वत्र प्रकाश देतो, तसे भक्ती सर्वत्र देवाला पोहोचवते.’ असे म्हटले आहे. म्हणजेच भक्तीचा सर्वव्यापी प्रभाव सांगितला आहे. आणि तोच तणावमुक्तीचा राजमार्ग आहे.
ज्ञानेश्वरीतील प्रत्येक अध्याय भगवद्गीतेतील तत्त्वज्ञानाला सहज समजेल अशा भाषेत मांडतो. त्यातील उपमा, रूपक, आणि अलंकार लोकजीवनाशी निगडित असल्यामुळे ते सारे रसपूर्ण तत्त्वज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचले आणि त्यांच्या आध्यात्मिक तसेच मानसिक स्वास्थ्याला चालना मिळाली.
स्वामी स्वरूपानंदांनी अलीकडच्या काळात ‘अभंग ज्ञानेश्वरी’ रचून या अमृतवाणीचा ओघ हृदय मंदिरापर्यंत पोहोचवला आहे. या अशा अध्यात्म साहित्याचा प्रभाव मराठीला अभिजात दर्जा देऊन गेला आहे.
एका डॉक्टरच्या नजरेतून स्वामीजींची ही रचना आजच्या प्रत्येक सुजाण व शिक्षित नागरिकाला सुशिक्षित करून परिपूर्ण आरोग्याची वाट दाखवणारी ठरो,

दैन्य दुःख लया नेते
पाप ताप निवारते,
चित्तास शांतता देते
ही विद्या मिळवू येथे!

– डॉ. मधुरा उदय कुलकर्णी

Leave a Comment