एक पान कृतज्ञतेचे

मानव हा प्राणीसृष्टीपैकी एक प्राणी आहे .इतर प्रजातींप्रमाणे तोही उत्क्रांत झाला. समुदाय हे प्राणिजीवनाचे मुख्य अंग आहे . मनुष्य वा अन्य बरेचसे प्राणी यांना एकटेपणा असह्य होतो. सामुदायिकता हा सर्वच प्राणीमात्रांचा मुलाधार आहे. प्रख्यात ग्रीक तत्त्ववेत्ता अ‍ॅरिस्टॉटल याने म्हटले आहे, “माणूस स्वभावाने सामाजिक प्राणी आहे.” हे किती खरे आहे याची जाणीव आपल्याला पदोपदी येत असते. तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही जा तुम्ही मित्र,मैत्रिणी, शेजारी यांना जोडत जाता.एक समाज स्वतः भोवती तयार करता. तुमच्या वैयक्तिक जीवनाला समाज जीवनाचा स्पर्श झाला की तुमचा विकास आपोआप होत जातो. नोकरी धंदा, उद्योग आणि व्यक्तीमत्त्व विकास उन्नत करण्यासाठी सामाजिक जीवन फार मोलाचे ठरत असते.

एकांगी जीवन जगताना मानवाचा विकास खुंटला जातो. परदेशात जेव्हा आपण,शिक्षण,नोकरी उद्योग यासाठी जातो तर तिथे प्रथम आपण आपल्या कम्युनिटीचा शोध घेतो नंतर यथावकाश आपण तिथल्या स्थानिक कम्युनिटीशी समरस होतो ते वेगळे. प्रथम आपण आपल्या मूळ जीवनशैलीशी मिळतेजुळते समाज जीवन शोधायचा प्रयत्न करतो.मूळ जीवनशैली ही प्रथा,परंपरा, चालीरीती आणि संस्कृती यांचा परिपाक असते. हे सारे संचित आपल्या बरोबर येते.म्हणूनच विविध देशांत जी महाराष्ट्र मंडळ निर्माण झाली आहेत त्याचे कारण हेच आहे, नाही का!

माणूस जीवनामध्ये आर्थिक विकासाबरोबरच सुरक्षितता देखील शोधत असतो. ही गरज सामाजिक जीवनातून काही अंशी भागवली जाते. सामाजिक बांधिलकीमुळे माणसं प्रसंगाला उभी राहतात एकमेकांना मदत करतात.त्यामुळे माणसाचे जीवन सुसह्य होते. माणसाचे जीवन वाटते तेवढे सोपे नसते. जसे गरीबीत चटके बसतात तसेच श्रीमंतीतही चटके आणि धक्के बसत असतात. सर्वसाधारण असा एक समज आहे की ,गरीबी म्हणजे दु:खाचा सागर आणि श्रीमंती म्हणजे सुखाचा महासागर. परंतु वस्तुस्थिती अशी नाही. प्रत्येक माणसाच्या जीवनात सुख-दु:खे येत असतात आणि जात असतात. जीवनाला कलाटणी देणारे क्षण जीवनात येत असतात. माणसे कुठच्या कुठे जाऊन पोहोचतात,तसंच होत्याचे नव्हतेही होते. याची असंख्य उदाहरणे सापडतात. जगण्याच्या वाटेवर अनेक घडामोडी घडतात.

या वाटेवर माणसाच्या जीवनात जशी अनेक माणसं येतात त्याप्रमाणे अनेक सजीव व निर्जीव वस्तु देखील येतात.समाजाबरोबर सारा भोवताल घेऊन माणूस जगत असतो.आपण म्हणाल हे काय वेगळंच! पण नीट बारकाईने जीवनाकडे न्याहाळल्यास आपल्याला असे लक्षात येईल की, एखादे मंदिर,एखादे दैवत, घर, घराचा दरवाजा अगदी एखादे झाड,पाळीव प्राणी अगदी दगड सुद्धा. यासर्वांवर आपली इतकी श्रद्धा जडते की त्या सजीव निर्जीव वस्तू आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनतात. किंबहूना आपल्या जगण्याला त्यांनी इतकी उभारी दिलेली असते की आपण त्यांचे आयुष्यभर ऋणी राहतो. कुणाच्या घरात “टॉमी” किंवा “फरी” नावाचा प्राणी येतो आणि त्याच्या पायगुणांनी भरभराट झाली असे त्यांना वाटते .

एखाद्याच्या घरात मोलकरणीचा देखील पायगुण लाभदायक असतो. कोण लकी पेन खिशाला लावून हिंडत राहतो. कोण एखाद्या रंगाचा भाग्यवान असतो, तर कोण कायम सुखी सदरा घालून परिक्षा,मुलाखत द्यायला जातो किंवा लग्नासाठी मुलगी बघायला जातो. अलिकडच्या माॅडर्न भाषेत बोलायचे तर डेटींगला जातो. या अंधश्रद्धा वाटत असल्या तरी हे सगळे माणसांच्या आयुष्यात घडत असते..अगदी सुशिक्षित माणसेही अशीच वागताना आढळतात.जगण्याच्या धडपडीत हे सारे आपल्या लक्षातच येत नाही. आपण इतके प्रवाहपतीत झालेलो असतो की ह्या सगळ्या माणसांचे ,त्या त्या वस्तूंचे, त्या क्षणांचे, प्रसंगाचे महत्व आपण ओळखायला विसरतो.त्यांचा फार मोठा प्रभाव आपल्या आयुष्यावर राहिलेला असतो.

ज्या समाजाने ,ज्या समाजातील माणसांनी ,भवतालातील सजीव वा निर्जीव वस्तुंनी आपल्या जीवनाला उभारी दिली त्या सगळ्यांच्या प्रती कधीतरी आपण उतराई होणार की नाही? कधीतरी आपण त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणार की नाही? ज्यांच्यामुळे आपल्या जगण्याला अर्थ प्राप्त झाला. त्यांची नोंद आपण केव्हा घेणार?शांतपणे आपण याचा कधी विचारच करत नाही. इतके सहज आणि हलकेपणाने आपण आयुष्यातील त्या महत्वपूर्ण प्रसंगांना घेतो.. आपल्याला त्यांच्या बाबतीत आलेल्या अनुभवाचे श्रेष्ठ सार काढून व्यक्त होउयात की आपल्या बरोबर त्यांनाही काळाच्या उदरात बंदिस्त करून ठेवून आपण निघून जाणार? हीच वेळ आहे त्यांचे उतराई होण्याची , हीच वेळ आहे मनमोकळेपणाने,दिलखुलास पणे त्यांचे उपकार व्यक्त करण्याची. खानदेशी कवयित्री बहिणाबाई म्हणतात..

ईमानाले इसरला
त्याले नेक म्हणू नही
जन्मदात्याला भोवला
त्याला लेक म्हणू नही!

तेव्हा आपण आपले ईमान जागे करुया.चला तर मग हाती लेखणी घेऊन त्यांचा नामोल्लेख करून कृतज्ञता व्यक्त करुया. समाजाची देणीघेणी कृतज्ञतेच्या शब्दांनी भागवण्यास काय हरकत आहे! .कृतार्थतेचा एक दस्तऐवज आपल्या पुढच्या पिढीच्या हाती ठेवूया आणि उत्तम संस्काराचे बीजारोपण करूया…

चला तर मग लिहा तुमच्या डायरीत , अशांसाठी खास राखून ठेवलेल्या एका पानावर आपल्या आठवणींतल्या माणसांचा,वस्तुंचा,गोष्टींचा तपशील की ज्यामुळे तुमच्या जगण्याला ,जीवनाला आकार आला आणि तुमचे जगणे कृतकृत्य झाले, ज्या पानाचे शीर्षक असेल..
“एक पान आठवणींचे,
चार शब्द कृतज्ञतेचे “..

:

: मोरेश्वर हु. बागडे,

81084  39999

 

Leave a Comment