
आज वृत्तपत्रातून खूप दिवसांनी का होईना, पण पुन्हा एकदा महाराष्ट्राचे स्टार नेते एकनाथ शिंदे नाराज असल्याचे आणि त्यामुळे मंत्रिमंडळाच्या बैठकीला गैरहजर असल्याचे समजले. हल्ली शिंदेंच्या नाराजीची बातमी वाचायला-ऐकायला नाही मिळाली तर राजकारणाचं समीकरणच चुकल्यासारखं वाटतं. कारण महाराष्ट्राचं राजकारणात जर “नाराजी” या शब्दाला मानवी रूप द्यायचं झालं, तर ते रूप एकनाथ शिंदे यांच्या आसपासच कुठेतरी फिरताना दिसेल. शिंदे कधी नाराज होतात, कधी समजावून घेतात, कधी पुन्हा नाराज होतात. हे गणित इतकं गुंतागुंतीचं आहे की त्यावर विद्यापीठात एक स्वतंत्र अभ्यासक्रमच सुरू करावा लागेल.
“एकनाथ शिंदे किती वेळा नाराज होतात?” हा प्रश्न विचारणं म्हणजे “पावसाळ्यात मुंबईत किती वेळा पाऊस पडतो?” असं विचारण्यासारखं आहे. उत्तर एकच ‘हवं तेवढ्या वेळा!’ कधी सकाळी नाराज, दुपारी समाधानी, संध्याकाळी पुन्हा नाराज आणि रात्री ‘ऑल इस वेल’ असा दिलासा. नाराजी ही शिंदे यांची तात्पुरती अवस्था नसून जणू त्यांचे एक राजकीय योगासनच बनले आहे ‘नाराजासन’.
मंत्रिमंडळाच्या बैठकींचंही तसंच आहे. शिंदे बैठकीला येणार की नाही, हे शेवटच्या क्षणापर्यंत कुणालाच माहीत नसतं. कॅबिनेट मीटिंग सुरू असताना एक खुर्ची रिकामी दिसली, की सगळे एकमेकांकडे पाहतात “आज शिंदे नाराज आहेत वाटतं!”
कधी ते बैठकीला गैरहजर राहतात कारण ते नाराज असतात, तर कधी नाराज असतात म्हणून ते गैरहजर राहतात. यात आधी कोंबडी की आधी अंडं, हा प्रश्नही गोंधळून जातो.
राजकीय वर्तुळात अशीही कुजबुज आहे की मंत्रिमंडळाची उपस्थिती नोंदवताना आता ‘हजर’, ‘गैरहजर’सोबत एक नवीन रकाना जोडावा लागेल ‘नाराज असल्याने अनुपस्थित’. काही अधिकारी तर बैठकीपूर्वी अजेंडा कमी आणि शिंदेंची मनःस्थिती जास्त तपासू लागले असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून कळले. .
विशेष म्हणजे, शिंदेंची नाराजी ही कधीच पूर्ण नकारात्मक नसते. ती जणू “तुमचं लक्ष वेधण्यासाठीचा सौम्य राग” असते. एखाद्या खात्याचा विषय, एखादी फाईल, एखादा निर्णय या सगळ्यांना गती देण्यासाठी नाराजीचा वापर केला जातो. म्हणजेच नाराजी ही त्यांची राजकीय भाषा आहे आणि गैरहजेरी हे त्यांचे विरामचिन्ह!
जनतेला मात्र या सगळ्यात एकच प्रश्न पडतो, राज्य चालतंय की नाराजी? पण महाराष्ट्राचं राजकारण आता इतकं सरावलेलं आहे की शिंदे नाराज असले तरी सरकार चालतंच. जसं मुंबई लोकल उशिरा आली तरी लोक पोहोचतात, तसं मंत्रिमंडळात एखादी खुर्ची रिकामी असली तरी निर्णय घेतले जातात.
शेवटी एवढंच म्हणावं लागेल की, एकनाथ शिंदे किती वेळा नाराज होतात किंवा किती वेळा बैठकीला गैरहजर राहतात, हे मोजण्यापेक्षा त्यांच्या नाराजीशिवाय एक आठवडा गेला तर तोच मोठा राजकीय चमत्कार मानावा लागेल. कारण महाराष्ट्राच्या राजकारणात नाराजी हा आता अपवाद राहिलेला नाही, तर एक नवी परंपरा झाली आहे.
: मनीष चंद्रशेखर वाघ


