
एकनाथ शिंदे यांनी “हिंदुत्वाचे वारसदार” असल्याचा गवगवा करत सत्तेचा जिना चढला; पण परळीतील वास्तव पाहता या दाव्याचा बुरखा पूर्णतः फाटलेला दिसतो. परळीत शिंदेसेनेने ‘एमआयएम’शी हातमिळवणी करत सत्तेचा सौदा केला आणि तथाकथित हिंदुत्वाची शवपेटी स्वतःच्या हाताने खांद्यावर घेतली. ‘सत्तेसाठी काहीही’ हीच शिंदेसेनेची खरी ओळख आता उघड झाली आहे.
ज्या एमआयएमवर कालपर्यंत शिंदे गटाचे नेते व्यासपीठावरून आग ओकत होते, तीच एमआयएम आज शिंदेंसाठी सत्तेची शिडी बनली. हा केवळ राजकीय विरोधाभास नसून सरळसरळ वैचारिक बेईमानी आहे. हिंदुत्वाचा झेंडा हातात घेऊन मुस्लिम मतांच्या गणितासाठी एमआयएमशी हातमिळवणी करणे म्हणजे मतदारांच्या डोळ्यात धूळफेक नव्हे तर उघडपणे फसवणूक आहे.
एकनाथ शिंदे सतत सांगतात की, “आम्ही बाळासाहेबांचे हिंदुत्व पुढे नेत आहोत.” मग प्रश्न असा आहे की, बाळासाहेबांनी कधी सत्तेसाठी वैचारिक तडजोड केली होती का? परळीत जे घडले, ते बाळासाहेबांच्या विचारांना हरताळ फासणारे आहे. शिंदेसेनेचे हे कृत्य म्हणजे शिवसेनेच्या मूळ डीएनएवरच वार आहे.
आज शिंदेसेना ज्या वेगाने सत्तेच्या मागे धावत आहे, त्यात तत्त्व, निष्ठा आणि विचार यांना काडीचीही किंमत उरलेली नाही. भाजपसोबत सत्ता हवी, त्यासाठी एमआयएमही चालेल, उद्या दुसरे कोणीही चालेल, ही संधीसाधू वृत्ती महाराष्ट्र पाहतो आहे. हा केवळ परळीचा प्रश्न नाही; हा शिंदे गटाच्या संपूर्ण राजकीय अधःपतनाचा आरसा आहे.
शिंदे यांनी हिंदुत्वाला निवडणूक जिंकण्याचे साधन बनवले आहे. व्यासपीठावर जोरजोरात घोषणा आणि सत्तेच्या बंद खोलीत मात्र वैचारिक सौदेबाजी हा दुटप्पीपणा आता लपून राहिलेला नाही. जनतेने विचारले पाहिजे: हे कोणते हिंदुत्व? हे कोणते शिवसैनिकत्व?
परळीतील ‘एमआयएम युती’ ही अपघाताने घडलेली घटना नाही; ती शिंदे यांच्या राजकारणाची दिशा दाखवणारी खूण आहे. सत्ता टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी कोणतीही कसर न ठेवण्याची मानसिकता एकनाथ शिंदे यांनीच जोपासली आहे. त्यामुळे आज शिंदेसेना विचारधारेऐवजी आकड्यांवर, मूल्यांऐवजी सत्तेवर उभी आहे.
महाराष्ट्रातील मतदारांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की, जे आज आपल्या विचारांशी गद्दारी करतात, ते उद्या जनतेशीही गद्दारी करतील. परळीतील घडामोडींनी एक गोष्ट स्पष्ट केली आहे ती म्हणजे एकनाथ शिंदे यांचे हिंदुत्व हे केवळ भाषणापुरते आहे; सत्तेच्या खेळात ते केव्हाच विकले गेले आहे.
: मनीष चंद्रशेखर वाघ


