डॉ. संग्राम पाटील यांच्या डिटेन्शन आणि चौकशीच्या निमित्ताने…

 

डॉ. संग्राम पाटील यांना अटक करण्याचा सरकारचा मुळीच हेतू नव्हता. ते भारतीय नागरिक नाहीत आणि त्यांच्यावर कोणताही गंभीर गुन्हा दाखल नसल्याने अटक करणे कायदेशीरदृष्ट्या शक्य नाही, हे सरकार आणि पोलीस यंत्रणेला चांगलेच ठाऊक होते. मग ही कारवाई कशासाठी होती? यामागचा उद्देश स्पष्ट आहे—संदेश देण्याचा.

हा संदेश दोन दिशांनी जातो. पहिला संदेश सरकारसाठी काम करणाऱ्या पगारी आयटी सेल कार्यकर्त्यांसाठी आहे—“काहीही करा, विरोधातील आवाज दाबून टाका. संपूर्ण यंत्रणा तुमच्या पाठीशी उभी आहे.”
दुसरा संदेश सरकारवर टीका करणाऱ्यांसाठी आहे—“परकीय नागरिकाला आम्ही दिवसभर बसवून ठेवू शकतो, तर तुमचा हिशोब तर आणखी सोपा आहे.”

हा सरळसरळ भीती दाखवण्याचा प्रकार आहे, आणि तो साहजिकच आहे.

मुख्य प्रवाहातील माध्यमे जेव्हा सरकारच्या मांडीवर बसतात, तेव्हा सरकारविरोधातील आवाज उरतो तो फक्त समाजमाध्यमांपुरता. हा आवाजही बंद झाला, की सरकारच्या आरत्या सर्वत्र ऐकू येतील, दिसतील.

या परिस्थितीत मार्ग दोनच आहेत. पहिला—गप्प बसून सगळं सहन करत राहणं.  दुसरा—सरकारवर टीका करताना काही मूलभूत संयम पाळणं.
भाषा संयमित ठेवा.
अपमानास्पद शब्दांचा वापर टाळा.
मोडतोड केलेले फोटो चुकूनही वापरू नका.
अश्लील भाषा, शिव्या यांचा वापर करू नका.
थेट व्यक्तीचा उल्लेख अत्यावश्यक असेल तेव्हाच करा.

एक महत्त्वाची बाब लक्षात ठेवा: या सत्तेला विनोद आणि उपहास झेपत नाहीत. त्यामुळे त्यांचा मुक्तहस्ताने, पण जबाबदारीने वापर करा.

माझ्या पोस्टवर प्रतिक्रिया देणाऱ्या सर्वांना नम्र विनंती आहे.
मला सरकारवर टीका करण्यासाठी सरकारचे निर्णय, शासकीय धोरणे आणि राजकीय नेत्यांच्या धोरणात्मक कोलांट्या पुरेशा आहेत.
मला कोणाचेही चारित्र्यहनन करायची किंवा कोणाच्या लैंगिक निवडींवर भाष्य करण्याची अजिबात गरज नाही. त्यामुळे अशा प्रकारचे फोटो किंवा शब्द कृपया वापरू नयेत. वापरल्यास ते मी काढून टाकेन, हे स्पष्टपणे सांगतो.

पाटील प्रकरणातून विरोधकांनी एवढा तरी धडा घ्यावा इतकेच पुरेसे आहे.

आणि अजूनही “भारत लोकशाही देश आहे” असे मानणाऱ्यांच्या बुद्धीला भावपूर्ण श्रद्धांजली!

: आनंद शितोळे

आपल्या_धडावर_आपलेच_डोके
आम्ही_भारताचे_लोक
लोकशाहीची_कबर

Leave a Comment