ताऱ्यांकडे झेप घेताना माणुसकीची जाणीव हरवू नये…

भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांचा भारत दौरा हा केवळ गौरवाचा क्षण नाही, तर अवकाशाच्या भवितव्यावर विचार करायला लावणारा महत्त्वाचा टप्पा आहे. २२ ते २५ जानेवारी दरम्यान होणाऱ्या केरळ साहित्य महोत्सवाच्या निमित्ताने भारतात आलेल्या सुनीता विल्यम्स यांनी दिल्लीतील अमेरिकन सेंटरमध्ये घेतलेल्या “आईज ऑन द स्टार्स, फूट ऑन द ग्राउंड” या चर्चासत्रात आजच्या जागतिक वास्तवावर नेमके बोट ठेवले. अवकाश ही आता केवळ विज्ञानाची नव्हे, तर सत्तेची आणि भांडवलाची स्पर्धा बनत चालली आहे, असा त्यांचा स्पष्ट इशारा होता.

सुनीता विल्यम्स म्हणतात, जगात सध्या एक नवी ‘अंतराळ शर्यत’ सुरू आहे. अनेक देश चंद्र आणि अवकाशात आघाडी घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र प्रश्न ‘कोण आधी पोहोचतो’ हा नसून, मानव सुरक्षित, शाश्वत आणि नैतिक मार्गाने अवकाशात कसा पोहोचतो, हा आहे. अवकाशावर कोणत्याही एका देशाचे किंवा कॉर्पोरेट शक्तीचे वर्चस्व नसावे, तर तो संपूर्ण मानवतेचा सामायिक वारसा असावा, हा त्यांचा ठाम आग्रह आहे. संशोधनाच्या नावाखाली अवकाशाचे व्यापारीकरण आणि वर्चस्ववादी स्पर्धा धोकादायक असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

या भेटीला आणखी एक भावनिक संदर्भ आहे. २७ वर्षांच्या दीर्घ सेवेनंतर सुनीता विल्यम्स २७ डिसेंबर २०२५ रोजी नासामधून निवृत्त झाल्या. मार्च २०२५ मध्ये पृथ्वीवर परतल्यानंतर त्यांचे अंतिम अभियान संपले. “अवकाश माझे आवडते ठिकाण आहे,” असे त्या सांगतात; पण आता नवीन पिढीला संधी देण्याची वेळ आली आहे, असेही त्या नम्रपणे कबूल करतात. चंद्र आणि मंगळावरील मानवी मोहिमांसाठी त्या आता प्रेरणादायी भूमिका बजावणार आहेत.

सुनीता विल्यम्स यांच्या कारकिर्दीला धैर्याची एक खास छाया आहे. जून २०२४ मध्ये बोईंग स्टारलाइनरमधून अवघ्या आठ दिवसांच्या मोहिमेसाठी गेलेली सुनीता नऊ महिने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर राहिली. तांत्रिक अडचणींमुळे स्टारलाइनरला क्रूशिवाय परतावे लागले. ‘अवकाशात अडकल्याच्या’ चर्चांवर त्यांनी शांतपणे उत्तर दिले, प्रणालीवर आणि निर्णयप्रक्रियेवर माझा पूर्ण विश्वास आहे. चाचणी उड्डाणात अडचणी येणारच, हे तिला आधीच माहीत होते. हे धैर्यच खऱ्या अंतराळवीराचे लक्षण आहे.

तीन मोहिमांमध्ये ६०८ दिवस अंतराळात घालवणाऱ्या सुनीता विल्यम्स यांनी ९ स्पेसवॉक करून ६२ तासांहून अधिक काळ अवकाशात काम केले. अंतराळात मॅरेथॉन धावणाऱ्या त्या जगातील पहिली व्यक्ती ठरल्या आणि आयएसएसची कमांडर होण्याचा मानही त्यांना मिळाला. हे आकडे केवळ विक्रम नाहीत, तर मानवी क्षमतेची साक्ष आहेत.

कल्पना चावला यांच्या बलिदानानंतर सुनीता विल्यम्स यांनी भारताला पुन्हा एकदा अभिमानाची संधी दिली. या दोघीही तरुण पिढीसाठी, विशेषतः मुलींसाठी, प्रेरणादायी प्रतीक आहेत. “ताऱ्यांकडे झेप घेताना माणुसकीची जाणीव हरवू नये” हा संदेश देत सुनीता विल्यम्स आजही अवकाशाइतकीच उंच उभी आहे.

 

Leave a Comment