विडियो न्यूज

वेब स्टोरी

वेब स्टोरी

ई-पेपर

लॉग इन करें

सावंतवाडीच्या ‘टर्मिनस’चे स्वप्न पुन्हा धुळीला

विशेष प्रतिनिधी :

कोकण रेल्वेवरील महाराष्ट्राच्या पट्ट्यातील महत्त्वाचे स्थानक असलेल्या सावंतवाडी रेल्वे स्थानकाच्या पदरी पुन्हा एकदा निराशाच पडली आहे. ‘कोचिंग टर्मिनस’चा दर्जा मिळेल या आशेवर बसलेल्या कोकणी चाकरमान्यांना रेल्वे प्रशासनाच्या नव्या निर्णयाने मोठा धक्का बसला आहे. टर्मिनस तर दूरच, पण गाड्यांमध्ये पाणी भरण्याची मूलभूत सुविधाही आता सावंतवाडीच्या हातातून निसटल्याचे स्पष्ट झाले आहे.

दुसरीकडे, गोव्यातील मडगाव रेल्वे स्थानक ला देशातील पहिल्या ४८ प्रमुख स्थानकांमध्ये स्थान देण्यात आले असून, २०३० पर्यंत येथील कोचिंग सुविधा दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच कर्नाटकातील उडुपी रेल्वे स्थानक येथे ‘कोच वॉटरिंग’ सुविधा उपलब्ध करून देण्याचे ठरले आहे. या निर्णयांमुळे सावंतवाडीचे तांत्रिक महत्त्व लक्षणीयरीत्या कमी होत आहे.

या सर्व घडामोडींमध्ये महाराष्ट्रातील खासदारांची निष्क्रियता ठळकपणे समोर येते. गोवा आणि दक्षिणेकडील खासदार कोकण रेल्वे प्रशासनावर प्रभाव टाकून आपल्या भागासाठी सुविधा मिळवताना दिसत आहेत, पण महाराष्टातील खासदारांकडून अपेक्षित पाठपुरावा होत नसल्याची भावना प्रवाशांमध्ये तीव्र होत आहे.

याचा थेट परिणाम दक्षिणेकडे जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांना सावंतवाडी येथे थांबा मिळण्याची शक्यता आणखी कमी होणार. कारण ‘कोच वॉटरिंग’सारखी सुविधा नसल्यास गाड्यांचा थांबा देणे रेल्वेसाठी व्यवहार्य ठरत नाही. परिणामी, भविष्यात सावंतवाडी स्थानक ‘पासिंग स्टेशन’ बनण्याची भीती व्यक्त होत आहे.

सावंतवाडी हे पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठिकाण आहे. पण रेल्वे सुविधा न मिळाल्यास पर्यटकांची संख्या घटण्याची शक्यता असून, स्थानिक व्यापारावर त्याचा थेट परिणाम होणार आहे. नव्या गाड्या सुरू करणे किंवा विद्यमान गाड्यांचा विस्तार करणेही ‘तांत्रिकदृष्ट्या अशक्य’ असल्याचे कारण पुढे केले जाऊ शकते.

आज परिस्थिती अशी आहे की, सावंतवाडीकरांना स्वतःच्या हक्काच्या सुविधा मिळवण्यासाठी केवळ आश्वासनांवरच समाधान मानावे लागत आहे. जर हीच उपेक्षा कायम राहिली, तर भविष्यात सावंतवाडी स्थानक केवळ नावापुरते उरेल आणि प्रवाशांना केवळ जाणाऱ्या-येणाऱ्या गाड्यांवरच अवलंबून राहावे लागेल.

Leave a Comment

और पढ़ें