विडियो न्यूज

वेब स्टोरी

वेब स्टोरी

ई-पेपर

लॉग इन करें

‘आर्यन’ ते ‘अनाया’ : एक कठीण प्रवास

माजी भारतीय क्रिकेटपटू संजय बांगर यांचा मुलगा आर्यन बांगरने त्याच्या आयुष्यातील एका मोठ्या बदलाची माहिती सर्वांसमोर आणली आहे. आर्यनचा जन्म मुलगा म्हणून झाला होता, पण त्याने ‘लिंग’ बदल करून मुलगी होण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला, लिंगबदलासाठी अनायाला तिच्या कुटुंबाकडून कोणताही पाठिंबा मिळाला नाही. पण आता, संपूर्ण कुटुंब तिच्या पाठीशी उभं आहे. हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. कारण तो भारतात घेतलेला निर्णय होता. आर्यनच्या या निर्णयाने भारतामध्ये लिंग ओळख, विज्ञान आणि समाज यांच्यातील नाते नव्याने चर्चेत आले आहे. कारण ही केवळ वैयक्तिक निर्णयाची गोष्ट राहिलेली नसून ती समाजातील बदलत्या विचारसरणीचा आणि विज्ञानाच्या प्रगतीचा आरसा बनली आहे.

लिंग ओळख ही केवळ जैविक घटकांवर आधारित नसून ती व्यक्तीच्या मानसिक, भावनिक आणि सामाजिक अनुभवांशी जोडलेली असते. अनेक व्यक्तींना त्यांच्या जन्मतः मिळालेल्या लिंगाशी अंतर्गत ओळख जुळत नाही, ज्यामुळे मानसिक तणाव निर्माण होतो. अशा परिस्थितीत लिंग-पुष्टीकरण प्रक्रिया ही केवळ शारीरिक बदल नसून मानसिक समाधान आणि आत्मस्वीकृतीचा मार्ग ठरते. अनाया बांगरचा प्रवास हा या संघर्षाचा आणि त्यावर मात करण्याच्या धैर्याचा प्रतीक आहे.

या प्रकरणात कुटुंबाच्या पाठिंब्याची भूमिका विशेष महत्त्वाची ठरते. भारतीय समाजात अजूनही लिंगभेद आणि तृतीयपंथीयतेबद्दल संकोच आहे. अशा वातावरणात पालकांनी दिलेला स्वीकार हा सामाजिक बदलाचा पाया ठरू शकतो. संजय बांगर यांनी दाखवलेली समज आणि साथ ही केवळ कौटुंबिक मर्यादेत न राहता व्यापक समाजासाठी एक सकारात्मक संदेश देते.

या चर्चेचा एक महत्त्वाचा पैलू म्हणजे आधुनिक वैद्यकीय विज्ञानाची भूमिका. लिंग-पुष्टीकरण शस्त्रक्रिया, हार्मोन थेरपी, तसेच आयव्हीएफ आणि सरोगसीसारख्या तंत्रज्ञानामुळे पारंपरिक ‘नैसर्गिक’ आणि ‘अनैसर्गिक’ या संकल्पनांवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. एका तृतीयपंथी व्यक्तीला जैविक पालकत्वाची संधी मिळणे ही विज्ञानाची मोठी उपलब्धी मानली जाते, परंतु काहीजण याकडे संशयानेही पाहतात.

इतिहास साक्षी आहे की प्रत्येक नवीन तांत्रिक प्रगतीला सुरुवातीला विरोध झाला आहे. परंतु काळानुसार त्याचा स्वीकार झाला आहे. आज आयव्हीएफ किंवा अवयव प्रत्यारोपण सामान्य झाले आहे, त्याचप्रमाणे लिंग-पुष्टीकरण प्रक्रियाही समाजाने समजून घेण्याची गरज आहे. हा वाद विज्ञान विरुद्ध निसर्ग असा नसून, तो मानवी सन्मान आणि स्वातंत्र्य यांच्याशी निगडित आहे.

अर्थात, या प्रक्रियेनंतरचे जीवनही सोपे नसते. सामाजिक स्वीकाराचा अभाव, भेदभाव आणि पूर्वग्रह हे अजूनही मोठे अडथळे आहेत. त्यामुळे प्रश्न केवळ व्यक्तीच्या निर्णयाचा नसून समाजाच्या दृष्टिकोनाचाही आहे. भारतीय समाजाने जर समज, सहानुभूती आणि स्वीकार यांचा मार्ग स्वीकारला, तर तृतीयपंथी समुदायासाठी अधिक सन्मानजनक आणि सुरक्षित वातावरण निर्माण होऊ शकते.

शेवटी, प्रत्येक व्यक्तीला आपल्या जीवनाचा मार्ग निवडण्याचा अधिकार आहे. समाजाची जबाबदारी ही त्या निवडीचा आदर करण्याची आणि समजून घेण्याची आहे. अनाया बांगरची कहाणी ही केवळ एका व्यक्तीच्या परिवर्तनाची नाही, तर बदलत्या भारताची कथा आहे, जिथे विविधतेला स्वीकारण्याची तयारी हीच खरी प्रगती ठरते.

: मनीष चंद्रशेखर वाघ

 

Leave a Comment

और पढ़ें