
विशेष प्रतिनिधी :
स्थानिक स्वराज्य संस्था या लोकशाहीच्या पायाभूत घटकांपैकी एक मानल्या जातात. नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित प्रश्न सोडवण्याची जबाबदारी प्रामुख्याने नगरसेवकांवर असते. मात्र अलीकडील अभ्यासातून समोर आलेली वस्तुस्थिती ही या संकल्पनेलाच धक्का देणारी आहे. निवडणूक नामनिर्देशन पत्रांमध्ये सादर केलेल्या विकास योजनांचा विचार केला असता, त्या योजनांमध्ये वास्तवाचे प्रतिबिंब कमी आणि केवळ औपचारिकतेची पूर्तता अधिक दिसून येते.
विकास आराखड्यांमध्ये महत्त्वाच्या प्रश्नांचा अभाव, विषयांची अपुरी आणि विस्कळीत मांडणी, तसेच वॉर्ड आणि शहर विकासाची स्पष्ट दृष्टी नसणे ही गंभीर बाब आहे. नगरसेवकांना विकास म्हणजे नेमके काय, याचेच स्पष्ट भान नसल्याचे जाणवते. परिणामी, नागरिकांच्या जीवनमानाशी थेट संबंधित असलेले प्रश्न, जसे की सार्वजनिक वाहतूक, वाहतूक कोंडी, पर्यावरणीय प्रदूषण, पदपथांची अवस्था, हे त्यांच्या प्राधान्यक्रमात दुय्यम ठरले आहेत.
विशेष म्हणजे, शहरातील मोठा वर्ग रोज प्रवास करीत असताना सार्वजनिक वाहतुकीचा मुद्दा केवळ नगण्य नगरसेवकांनीच आपल्या योजनांमध्ये मांडला आहे. वाहतूक कोंडीसारख्या ज्वलंत समस्यांवर ठोस उपाययोजना सुचवण्याऐवजी, त्या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आलेले दिसते. ही बाब केवळ प्रशासनिक दुर्लक्ष नसून नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे असलेली असंवेदनशीलता दर्शवते.
पर्यावरणाचा प्रश्न तर अधिकच गंभीर आहे. ठाण्यासारख्या शहरात हवेच्या प्रदूषणाची स्थिती चिंताजनक असताना, केवळ १६ टक्के नगरसेवकांनी त्याचा उल्लेख केला आहे. हे आकडे शहराच्या आरोग्यासाठी धोक्याची घंटा आहेत. तरीही या समस्येवर ठोस भूमिका घेण्याची तयारी दिसत नाही. उलट, महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात नसलेल्या वीजपुरवठ्यासारख्या मुद्द्यांना अधिक महत्त्व दिले गेले आहे, जे नगरसेवकांच्या अधिकार आणि जबाबदाऱ्यांबद्दलच्या अस्पष्टतेचे द्योतक आहे.
सार्वजनिक जागांच्या निर्मितीबाबत काही प्रमाणात सकारात्मकता दिसून येते, मात्र ग्रंथालयांसारख्या सर्वसमावेशक आणि बौद्धिक विकासासाठी आवश्यक असलेल्या सुविधांकडे पूर्णतः दुर्लक्ष झाले आहे. यावरून विकासाची व्याख्या केवळ भौतिक सुविधांपुरती मर्यादित ठेवण्यात आल्याचे स्पष्ट होते.
या सर्व परिस्थितीत सर्वात चिंताजनक बाब म्हणजे नगरसेवकांचा नागरिकांबद्दलचा दृष्टिकोन. विवरणात काहीही लिहिले तरी त्यावर कोणी प्रश्न उपस्थित करणार नाही, अशी मानसिकता दिसून येते. हीच लोकशाहीसाठी सर्वात मोठी धोक्याची घंटा आहे. लोकप्रतिनिधींना जबाबदार धरण्याची जबाबदारी नागरिकांनीही स्वीकारली पाहिजे.
नागरिकांनी माहिती अधिकार, अर्थसंकल्प, अधिकृत कागदपत्रे यांचा अभ्यास करून आपल्या प्रतिनिधींना प्रश्न विचारले पाहिजेत. मतदानापलीकडे जाऊन सहभाग नोंदवणे हीच खरी लोकशाही आहे. अन्यथा, विकासाच्या नावाखाली चालणारी ही पोकळ आश्वासने आणि धोरणात्मक उदासीनता भविष्यात शहरांच्या सर्वांगीण प्रगतीस मोठा अडथळा ठरेल.