
आज भारतात महिलांच्या राजकीय हक्कांवरून वातावरण तापलेले आहे. आरक्षण, प्रतिनिधित्व आणि सत्तेतील सहभाग या मुद्द्यांवरून राजकीय पक्षांमध्ये स्पर्धा आणि संघर्ष सुरू आहे. अशा पार्श्वभूमीवर जागतिक स्तरावर घडणाऱ्या काही घटना आपल्याला नवा दृष्टिकोन देतात. प्रतिष्ठित ‘टाईम’ मासिकाने जाहीर केलेल्या जगातील १०० प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्ष क्लॉडिया शाइनबाम पार्डो यांचा समावेश ही त्यापैकीच एक घटना. त्यांच्या प्रवासाकडे पाहिल्यास, महिला सक्षमीकरणाचा खरा अर्थ केवळ प्रतिनिधित्वात नसून, कार्यक्षमतेत आणि नैतिक नेतृत्वात आहे, हे दिसून येते.
क्लॉडिया यांची जडणघडण ही वैज्ञानिक विचारसरणीवर आधारित आहे. ज्यू कुटुंबात जन्मलेल्या क्लॉडियाचे वडील केमिकल इंजिनिअर तर आई जीवशास्त्राच्या प्राध्यापिका. घरातील या शैक्षणिक वातावरणामुळे लहानपणापासूनच तर्कशुद्ध विचार आणि विश्लेषणात्मक दृष्टिकोन त्यांच्या व्यक्तिमत्त्वात रुजला. नॅशनल ऑटोनॉमस युनिव्हर्सिटी ऑफ मेक्सिकोमध्ये त्यांनी ऊर्जा अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आणि पुढे अमेरिकेतील लॉरेन्स बर्कले नॅशनल लॅबोरेटरीमध्ये संशोधन पूर्ण केले. ऊर्जा क्षेत्रातील त्यांच्या अभ्यासामुळे मेक्सिकोच्या गरजा आणि शक्यता यांची त्यांना जाणीव झाली.
क्लॉडिया यांना तरुणपणापासूनच राजकारणात रस होता. विद्यार्थिनी किंवा शिक्षिका असताना, जेव्हा जेव्हा हस्तक्षेप करण्याची गरज वाटली तेव्हा त्यांनी कधीही संकोच केला नाही. परंतु राजकारणाला करिअर म्हणून स्वीकारण्याचा विचार केला नव्हता. २००० साली जेव्हा मेक्सिको सिटीचे महापौर आंद्रेस लोपेझ मॅन्युएल ओब्राडोर यांनी क्लॉडिया यांना स्थानिक प्रशासनात पर्यावरण मंत्री म्हणून नियुक्त केले, तेव्हा क्लॉडिया यांनी ते एक आव्हान म्हणून स्वीकारले. शहराच्या रिंग रोडचे बांधकाम आणि देखभाल, जलद बस सेवा आणि इलेक्ट्रॉनिक वाहन नोंदणी केंद्राची जबाबदारी त्यांच्यावर होती. ही जबाबदारी क्लॉडिया यांनी इतक्या निष्ठेने पार पाडली की त्यांची क्षमता संपूर्ण मेक्सिको सिटीमध्ये ओळखली जाऊ लागली.
त्यांच्या कार्यकाळात, निसर्गाने मेक्सिकोच्या लोकांसमोर एक मोठी परीक्षा उभी केली.२०१७ मधील भीषण भूकंप हा त्यांच्या नेतृत्वाचा खरा कस होता. टीका, अडचणी आणि संकटांमध्येही त्यांनी संयम राखत पुनर्बांधणीचे काम सुरू ठेवले. संकट काळात नेतृत्व कसे असावे, याचे त्यांनी उदाहरण घालून दिले. त्यानंतर मेक्सिको सिटीच्या महापौरपदी निवडून येत त्यांनी जलसंधारण, हरित विकास आणि सार्वजनिक सुविधा यावर भर दिला.
२०२४ मध्ये राष्ट्राध्यक्षपदी निवडून येताना त्यांनी केवळ इतिहास घडवला नाही, तर नेतृत्वाची नवी व्याख्या सुद्धा मांडली. मेक्सिकोच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांनी देशाला नवीकरणीय ऊर्जेकडे नेण्याचा निर्धार व्यक्त केला. आंतरराष्ट्रीय पातळीवरही त्यांनी ठाम आणि संतुलित भूमिका घेतली. पदभार स्वीकारल्यानंतर काही महिन्यांतच, त्यांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याकडून जकात आणि लष्करी कारवाईच्या धमक्या येऊ लागल्या. ट्रम्प यांच्या धमक्यांना जोरदार प्रत्युत्तर देत असतानाही क्लॉडिया यांनी राजनैतिक मार्ग खुले ठेवले. आपल्या शहाणपणाने त्यांनी अमेरिकेला पटवून दिले आणि केवळ आपल्या सार्वभौमत्वाचे रक्षणच केले नाही, तर देशातील अराजकतावादी घटकांनाही आवर घातला. आज, क्लॉडिया संपूर्ण प्रदेशातील सर्वात लोकप्रिय नेत्यांपैकी एक आहेत.
क्लॉडिया शाइनबाम यांची कथा ही केवळ एका महिलेच्या यशाची गोष्ट नाही; ती सक्षम, विचारशील आणि मूल्याधिष्ठित नेतृत्वाची ओळख आहे. आज भारतात महिलांच्या राजकीय सहभागाबाबत चर्चा होत असताना, केवळ संख्यात्मक प्रतिनिधित्वापलीकडे जाऊन गुणवत्ता, दृष्टी आणि प्रामाणिकता यांनाही तितकेच महत्त्व द्यायला हवे, हे त्यांच्या उदाहरणातून शिकण्यासारखे आहे.
महिला सक्षमीकरणाचा खरा अर्थ केवळ संधी देण्यात नाही, तर त्या संधींचे रूपांतर सक्षम नेतृत्वात करण्यामध्ये आहे. आणि क्लॉडिया शाइनबाम पार्डो यांनी हेच सिद्ध करून दाखवले आहे.
: मनीष चंद्रशेखर वाघ