
नुकत्याच पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक होऊन निकालही लागला. इतर चार राज्यातला निकाल अपेक्षित असला तरी तामिळनाडूचा निकाल हा काहीसा चमत्कारिक वाटतो. या निकालाकडे केवळ सत्तांतर म्हणून पाहणं हा मोठा भ्रम ठरेल. हा पराभव म्हणजे केवळ एम. के. स्टॅलिन यांचा किंवा द्रविड मुनेत्र कळघम पक्षाचा पराभव नाही तर तो भाषिक अस्मितेच्या राजकारणाला मिळालेला धक्का मानायला हवा.
द्रविड राजकारणाची पायाभरणीच भाषिक स्वाभिमानावर झाली. सी. एन. अण्णादुराई यांनी हिंदी लादण्याविरोधात उभा केलेला लढा आणि एम. करुणानिधी यांनी त्याला दिलेली राजकीय धार ही केवळ इतिहासातील घटना नाहीत, तर तमिळनाडूच्या सामाजिक-राजकीय ओळखीचा गाभा आहे. स्टॅलिन यांनीही त्याच परंपरेतून केंद्राच्या भाषिक धोरणांना ठाम विरोध केला, मग तो त्रिभाषा धोरणाचा प्रश्न असो किंवा NEET चा मुद्दा.
म्हणूनच या पराभवाचं गांभीर्य अधिक आहे. कारण ज्या राज्यात भाषा हीच राजकीय चेतनेचा मुख्य हेतू आणि उद्देश होता, तिथेच ती निर्णायक ठरली नाही, तर याचा अर्थ काय घ्यायचा? हा बदल फक्त तमिळनाडूपुरता मर्यादित नाही; तो देशातील भाषिक राजकारणाच्या भविष्यावरही परिणाम करणारा आहे.
मतदारांनी विकास, कल्याणकारी योजना, रोजगार या मुद्द्यांवर मतदान केलं असेल, पण त्या प्रक्रियेत भाषिक अस्मिता मागे पडली, ही वस्तुस्थिती दुर्लक्ष करता येणार नाही. स्टॅलिन यांनी आर्थिक प्रगती, औद्योगिक गुंतवणूक, शिक्षण आणि सामाजिक न्याय या क्षेत्रांत काम केलं. पण त्यांच्या राजकारणाचा आत्मा असलेला भाषिक प्रतिकार मतदारांना तितका निर्णायक वाटला नाही.
याचा अर्थ भाषेचा प्रश्न संपला असा नाही. पण तो ‘तातडीचा’ राहिलेला नाही, हे नक्की. आणि हीच बाब चिंताजनक आहे. कारण भाषा ही केवळ संवादाचं साधन नाही; ती संस्कृती, ओळख आणि स्वायत्ततेचा पाया आहे. जेव्हा हा पाया राजकारणात दुय्यम ठरतो, तेव्हा दीर्घकालीन परिणाम गंभीर असू शकतात.
दरम्यान, नव्या नेतृत्वाचा उदय, विशेषतः विजय यांच्यासारख्या चेहऱ्यामुळे, मतदारांमध्ये ‘पर्याय’ आणि ‘बदल’ यांची भावना अधिक प्रभावी झाली. या लाटेत पारंपरिक विचारसरणी, जरी ती मजबूत असली तरी, काही काळासाठी मागे पडली.
शेवटी, स्टॅलिन यांचा पराभव हा एका नेत्याचा पराभव नाही; भाषिक अस्मिता जपण्यासाठी केवळ इतिहासाचा आधार पुरेसा नसतो, तर ती नव्या पिढीच्या प्राधान्यक्रमांमध्ये पुन्हा रुजवावी लागते. अन्यथा, ती हळूहळू राजकीय केंद्रस्थानी असण्याऐवजी बाजूला सरकते आणि हाच या निकालाचा खरा संदेश आहे.
: मनीष चंद्रशेखर वाघ