
भारतीय राजकारणात काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात की, त्यांचे योगदान केवळ त्यांच्या काळापुरते मर्यादित राहत नाही, तर पुढच्या अनेक पिढ्यांच्या जीवनशैलीवर त्याचा प्रभाव पडतो. भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी हे असेच एक व्यक्तिमत्त्व होते. आधुनिक भारताच्या उभारणीचा विचार केला, तर ‘आधुनिक भगीरथ’ ही उपमा त्यांना योग्य ठरते. जसा भगीरथाने कठोर तपश्चर्येने गंगा पृथ्वीवर आणली, तसाच राजीव गांधी यांनी विज्ञान, तंत्रज्ञान, संगणक आणि दूरसंचार यांचा प्रवाह भारताच्या सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला.
३१ ऑक्टोबर १९८४ रोजी इंदिरा गांधींची हत्या झाली आणि भारतीय राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली. त्या दिवशी राजीव गांधी पश्चिम बंगालमध्ये प्रचारसभेत होते. बातमी मिळताच ते तातडीने दिल्लीला रवाना झाले. संध्याकाळी त्यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यामुळे अनेकांनी त्यांना ‘अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ असे संबोधले. कारण व्यावसायाने ते वैमानिक होते. त्यांनी सत्तेसाठी राजकारणात प्रवेश केला नव्हता; परिस्थितीने त्यांना त्या भूमिकेत आणून उभे केले होते.
राजीव गांधींनी पंतप्रधानपद स्वीकारले तेव्हा भारत एका संक्रमणकाळातून जात होता. एका बाजूला जुन्या राजकारणाचे ओझे, तर दुसऱ्या बाजूला आधुनिकतेची हाक होती. अशा वेळी त्यांनी भारताला एकविसाव्या शतकाकडे नेण्याचे स्वप्न दाखवले. त्या काळात संगणक आणि दूरसंचार यांविषयी समाजात भीती आणि विरोध होता. संगणक आल्याने रोजगार नष्ट होतील, अशी धारणा प्रबळ होती. पण राजीव गांधी यांनी दूरदृष्टी दाखवत तंत्रज्ञानाला भारताच्या प्रगतीचे साधन बनवले.
त्यांच्या कार्यकाळात सॅम पित्रोदा यांच्या सहकार्याने दूरसंचार आणि तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी क्रांती घडून आली. गावोगावी पीसीओ उभे राहिले. सामान्य माणसालाही संवादाचे नवे दार खुले झाले. आज प्रत्येकाच्या हातात असलेला मोबाईल, इंटरनेटची सहज उपलब्धता, डिजिटल व्यवहार आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील भारताची जागतिक ओळख; या सर्वांच्या पायाभरणीमध्ये राजीव गांधी यांचे योगदान महत्त्वाचे मानले जाते.
त्यांनी पंचायत राज व्यवस्थेला बळकटी देण्याचा प्रयत्न केला. लोकशाही गावपातळीपर्यंत पोहोचावी, सत्ता विकेंद्रीत व्हावी, हा त्यांचा विचार होता. युवकांना मतदानाचा अधिकार २१ वरून १८ वर्षांपर्यंत खाली आणून त्यांनी तरुण पिढीला राष्ट्रनिर्मितीत सक्रिय सहभागाची संधी दिली. शिक्षण, विज्ञान, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण विकास यांसाठी त्यांनी अनेक योजना राबवल्या.
मात्र, राजीव गांधींच्या राजकीय प्रवासाला दुसरी बाजूही होती. आधुनिक भारताचे स्वप्न पाहणाऱ्या या नेत्याला भारतातील जातीय आणि धार्मिक वास्तवाचा पुरेसा अनुभव नव्हता. शाह बानो प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला सुरुवातीला पाठिंबा देऊन नंतर मुस्लिम समाजाच्या दबावामुळे तो निर्णय कायद्याद्वारे बदलण्याचा निर्णय घेतल्याने त्यांच्या भूमिकेवर टीका झाली. त्यानंतर बाबरी मशीद प्रकरणात घेतलेल्या निर्णयांनीही धार्मिक ध्रुवीकरण अधिक तीव्र झाले.
त्याच काळात बोफोर्स प्रकरण उभे राहिले आणि त्यांची ‘मिस्टर क्लीन’ प्रतिमा डागाळली. भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे त्यांची लोकप्रियता कमी झाली. विश्वनाथ प्रताप सिंह यांनी काँग्रेसपासून वेगळी वाट धरली आणि काँग्रेसविरोधी शक्तींना एकत्र आणले. परिणामी १९८९ च्या निवडणुकीत राजीव गांधी यांना सत्तेतून बाहेर पडावे लागले.
तरीही विरोधी बाकांवर बसल्यानंतरही ते राष्ट्रीय राजकारणातील एक प्रभावी चेहरा राहिले. १९९१ मध्ये पुन्हा निवडणूक प्रचारादरम्यान त्यांनी देशभर दौरे सुरू केले होते. पण २१ मे १९९१ ची ती काळी रात्र भारतीय राजकारणासाठी अत्यंत दुर्दैवी ठरली. तामिळनाडूतील श्रीपेरूमबंदर येथे निवडणूक सभेदरम्यान झालेल्या आत्मघाती हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या शरीराची ओळखही बुटांवरून पटावी, इतका भीषण तो स्फोट होता.
राजीव गांधींच्या मृत्यूने भारतीय राजकारणातील एका नव्या युगाचा अंत झाला. ते भारताचे सर्वात तरुण पंतप्रधान होते, पण त्यांच्या विचारांची व्याप्ती मोठी होती. त्यांनी भारताला आधुनिकतेची दिशा दिली. त्यांच्या चुका होत्या, अनुभवाचा अभाव होता, काही निर्णय वादग्रस्त ठरले; परंतु आधुनिक भारताचे जे स्वप्न त्यांनी पाहिले, ते आज मोठ्या प्रमाणावर साकार होताना दिसते.
इतिहास कदाचित त्यांना एका सभ्य, आधुनिक आणि स्वप्नाळू नेत्याच्या रूपात स्मरणात ठेवेल. अशा नेत्याच्या रूपात, ज्यांचा राजकीय प्रवास अचानक सुरू झाला, संघर्षांनी भरलेला राहिला आणि ज्याचा शेवटही तितकाच अचानक व वेदनादायी ठरला. “अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर” म्हणून ओळख मिळालेल्या राजीव गांधी यांनी मात्र भारताला आधुनिकतेच्या नव्या पर्वात प्रवेश करून दिला, हे नाकारता येणार नाही.
: मेहेर नगरकर