
‘मेलोडी खाओ, खुद जान जाओ…’ या जुन्या जाहिरातीच्या ओळीला आज नवाच राजनैतिक अर्थ मिळाल्यासारखे वाटले. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांना भारतीय ‘मेलोडी’ चॉकलेट भेट दिले आणि सोशल मीडियाला पुन्हा एकदा ‘मेलोडी’ क्षण मिळाला.
कॅमेऱ्यासमोरची ही गोड भेट जितकी हलकी-फुलकी, तितकाच तिच्याभोवतीचा राजकीय अर्थ गंभीर आहे. कारण आजच्या जागतिक राजकारणात प्रतिमा, हावभाव आणि वैयक्तिक केमिस्ट्री यांनाही धोरणाइतकेच महत्त्व प्राप्त होताना दिसते…
जागतिक राजकारणात प्रतिमांचे महत्त्व वाढत चालले आहे. कॅमेऱ्यासमोरची मैत्री, सोशल मीडियावरील हशे, आणि नेत्यांमधील हलक्या-फुलक्या संवादांमधून एक नवीन प्रकारची राजनैतिक भाषा तयार होत आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याभोवती तयार झालेला “मेलोडी” हा शब्द त्याचाच भाग आहे.
पण प्रश्न असा आहे की, या साऱ्या प्रतिमांच्या खेळात भारताची वास्तविक प्रतिष्ठा किती मजबूत होत आहे?
एकेकाळी भारताची ताकद त्याच्या नैतिक भूमिकेत होती. अलिप्त राष्ट्रांच्या चळवळीपासून ते विकसनशील देशांच्या नेतृत्वापर्यंत भारत जगाला एक संतुलित, विचारशील आणि स्वायत्त राष्ट्र म्हणून दिसत होता. आज मात्र परराष्ट्र धोरणाचा मोठा भाग सोशल मीडिया क्लिप्स, आलिंगने, आणि वैयक्तिक समीकरणांच्या प्रतिमांमध्ये अडकताना दिसतो.
राजकारणात मैत्री व संवाद महत्त्वाचे असतातच. पण तेवढ्याने राष्ट्राची उंची वाढत नाही. देशाची किंमत वाढते ती त्याच्या अर्थव्यवस्थेने, लोकशाहीच्या आरोग्याने, सामाजिक सलोख्याने आणि जगासमोर मांडलेल्या मूल्यांनी. जर देशांतर्गत बेरोजगारी, महागाई, सामाजिक तणाव आणि संस्थांची कमकुवतता वाढत असेल, तर बाहेरच्या मंचांवरील हास्यचित्रे फार काळ प्रभाव टिकवू शकत नाहीत.
“मेलोडी” हा शब्द इंटरनेटवर ट्रेंड होऊ शकतो; पण भारताला इतिहासात स्थान मिळवून देणारी गोष्ट ट्रेंड नव्हे, तर तत्त्वे असतील. प्रश्न इटलीच्या पंतप्रधानांशी असलेल्या स्नेहाचा नाही. प्रश्न असा आहे की, भारताची परराष्ट्र प्रतिमा आता व्यक्तिनिष्ठ होत चालली आहे का? राष्ट्राच्या धोरणांपेक्षा नेत्यांच्या वैयक्तिक लोकप्रियतेवर अधिक उभी राहत आहे का?
जगात सन्मान मिळवण्यासाठी केवळ प्रतिमा पुरेशी नसते; त्यामागे वास्तवाची ताकद लागते. अन्यथा टाळ्यांचा आवाज मोठा असला, तरी राष्ट्राची किंमत मात्र शांतपणे घसरत राहते.
आज ‘मेलोडी’ चॉकलेटच्या भेटीने सोशल मीडियाला नवा विनोद, नवा ट्रेंड आणि नवे मीम्स मिळाले असतील; पण इतिहास राष्ट्रांना त्यांच्या हॅशटॅग्सने नव्हे, तर त्यांच्या तत्त्वांनी लक्षात ठेवतो. कारण अखेरीस प्रश्न चॉकलेटचा नाही, तर देशाच्या प्रतिमेमागील वास्तवाचा आहे. ‘मेलोडी खाओ… खुद जान जाओ!’
: मनीष चंद्रशेखर वाघ