विडियो न्यूज

वेब स्टोरी

वेब स्टोरी

ई-पेपर

लॉग इन करें

‘एआय’ने लेखक ‘घडतील’; पण साहित्य मूल्यांचं काय?

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने आजकाल पुस्तक लिहिणं अगदी सोपं झालंय असा प्रचार केला जातोय. व्हॉईस-टू-टेक्स्ट, स्वयं-प्रकाशन, सोशल मीडिया मार्केटिंग अशा गोष्टींच्या आधारे प्रत्येक व्यक्ती लेखक बनू शकते, असा दावा केला जातो. वरकरणी हा बदल लोकशाहीवादी आणि सकारात्मक वाटत असला, तरी या प्रवाहाकडे गंभीरपणे पाहण्याची गरज आहे. कारण प्रश्न फक्त ‘पुस्तक लिहिण्याचा’ नाही, तर ‘साहित्य मूल्य’ टिकवण्याचा आहे.

आज पुस्तक लिहिणं सोपं झालं असेल, पण चांगलं पुस्तक लिहिणं त्याहूनही कठीण आहे. लेखन ही केवळ शब्दांची मांडणी नसते; ती विचारांची खोली आणि भाषेच्या संवेदनशीलतेतून जन्माला येणारी प्रक्रिया असते. कृत्रिम बुद्धिमत्ता तुमच्यासाठी वाक्य तयार करू शकते, व्याकरण दुरुस्त करू शकते, कथानकाचा आराखडा बनवू शकते; पण ती तुमचं दुःख जगू शकत नाही, तुमची संघर्षयात्रा समजू शकत नाही, किंवा समाजातील वेदना अनुभवू शकत नाही. त्यामुळे तंत्रज्ञान लेखकाला मदत करू शकतं, पण लेखक बनवू शकत नाही.

आज “कोणताही माणूस लेखक होऊ शकतो” ही कल्पना ज्या वेगाने पसरते आहे, त्याच वेगाने साहित्याची गुणवत्ता खालावत चालली आहे. सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी, व्हायरल होण्यासाठी किंवा ‘मीही लेखक झालो’ असे मिरवण्यासाठी अनेकजण घाईघाईने पुस्तके प्रकाशित करत आहेत. परिणामी बाजारात पुस्तकांची संख्या वाढते आहे; पण विचारांची उंची आणि साहित्यिक मूल्य मात्र कमी होत आहे.

पूर्वी प्रकाशकांच्या संपादकीय प्रक्रियेतून एखादं पुस्तक जात असे. अनेकदा लेखकाला नकार मिळायचे, सुधारणा सुचवल्या जायच्या. त्या प्रक्रियेमुळे साहित्य अधिक परिपक्व होत असे. आज स्वयं-प्रकाशनामुळे ही तपासणी जवळजवळ संपली आहे. ज्याच्या हातात पैसा आहे किंवा सोशल मीडियावर फॉलोअर्स आहेत, तो सहज पुस्तक प्रकाशित करू शकतो. त्यामुळे साहित्य क्षेत्रातही बाजारवाद आणि प्रसिद्धीचा प्रभाव वाढताना दिसतो.

‘व्याकरणाची चिंता मिटली’ हा दावा देखील धोकादायक आहे. भाषा ही केवळ शुद्धलेखन नसते; ती संस्कृतीची वाहक असते. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित साधने भाषेतील भावना, बोलीतील सूक्ष्म अर्थ, लोकजीवनातील गंध किंवा शब्दांच्या मागची सामाजिक पार्श्वभूमी समजू शकत नाहीत. मशीनने दुरुस्त केलेली भाषा तांत्रिकदृष्ट्या योग्य असेल, पण ती जिवंत असेलच असं नाही.

तसंच, आज सोशल मीडिया मार्केटिंगमुळे पुस्तकांचा प्रचार सहज शक्य झाला आहे. पण या प्रक्रियेत वाचनापेक्षा ‘ब्रँडिंग’ महत्त्वाचं बनत चाललं आहे. एखादं पुस्तक चांगलं आहे म्हणून नव्हे, तर त्यामागे किती जाहिरात आहे यावर त्याचं यश ठरत आहे. साहित्य हळूहळू उपभोगाच्या बाजारात बदलत चाललं आहे.

हे सर्व बदल पूर्णपणे नाकारण्याचा उद्देश नाही. तंत्रज्ञानाने अनेक नवोदितांना संधी दिली आहे, हेही खरं आहे. पण ‘सोपं लेखन’ आणि ‘गंभीर साहित्य’ यातला फरक ओळखणं अत्यंत गरजेचं आहे. प्रत्येकजण पुस्तक प्रकाशित करू शकतो, पण प्रत्येक प्रकाशित मजकूर साहित्य ठरत नाही.

लेखन म्हणजे फक्त टायपिंग नाही; ते आत्मपरीक्षण आहे. ते संयम आहे. ते समाजाशी प्रामाणिक राहण्याची जबाबदारी आहे. तंत्रज्ञानाने मार्ग सोपा केला असेल, पण लेखक होण्याचा प्रवास आजही तितकाच कठीण, वेदनादायी आणि प्रामाणिकतेची मागणी करणारा आहे.

म्हणूनच, ‘पुस्तक लिहिणं सोपं झालं’ या घोषणेइतकंच महत्त्वाचं एक वाक्य आज सांगण्याची गरज आहे ते म्हणजे ‘साहित्य निर्माण करणं अजूनही कठीण आहे.’

: मनीष चंद्रशेखर वाघ

Leave a Comment

और पढ़ें