
तमिळनाडूमध्ये ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताचा आणि ‘तमिळ थाई वाझ्थू’ या राज्यगीताच्या क्रमावरील वादाने पुन्हा एकदा तामिळ अस्मितेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी दिल्लीतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या पहिल्याच अधिकृत बैठकीत ‘तमिळनाडू आपल्या सांस्कृतिक ओळखीबाबत कोणतीही तडजोड स्वीकारणार नाही’ हा मुद्दा ठामपणे उपस्थित करून स्पष्ट संदेश दिला आहे की,
‘तमिळ थाई वाझ्थू’ हे केवळ एक राज्यगीत नाही, तर तमिळ संस्कृती, भाषा आणि इतिहासाचे प्रतीक मानले जाते. अनेक दशकांपासून तमिळनाडूमधील शासकीय कार्यक्रमांची सुरुवात या गीताने करण्याची परंपरा आहे. त्यामुळे ‘वंदे मातरम्’ आधी की ‘तमिळ थाई वाझ्थू’ आधी, हा प्रश्न केवळ प्रोटोकॉलचा राहत नाही; तो थेट राज्याच्या स्वाभिमानाशी जोडला जातो.
भारताची ताकद विविधतेत आहे, हे आपण वारंवार म्हणतो. पण प्रत्यक्षात अनेकदा केंद्राकडून एकसमान सांस्कृतिक चौकट देशभर लादण्याचा प्रयत्न होत असल्याची भावना दक्षिणेकडील राज्यांमध्ये निर्माण झाली आहे. हिंदीचा दुराग्रह असो, राष्ट्रीय प्रतीकांच्या वापरावरील वाद असो किंवा शैक्षणिक धोरणे; तमिळनाडूने प्रत्येक वेळी आपल्या प्रादेशिक ओळखीचा मुद्दा ठामपणे मांडला आहे. त्यामुळे हा वाद अचानक निर्माण झालेला नसून, दीर्घकाळ साचलेल्या अस्वस्थतेचेच आणखी एक रूप आहे.
मुख्यमंत्री विजय यांनी हा विषय पंतप्रधानांसमोर मांडणे हे तमिळ मतदारांच्या भावनांशी जोडलेले एक प्रतीकात्मक विधान आहे. नवीन मुख्यमंत्री म्हणून त्यांनी पहिल्याच भेटीत राज्याच्या अस्मितेला प्राधान्य दिल्याने त्यांची राजकीय दिशा स्पष्ट झाली आहे. तमिळनाडूमध्ये भाषा आणि संस्कृतीचा प्रश्न हा भावनिक तसेच राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील मानला जातो. त्यामुळे विजय यांची भूमिका राज्यातील जनतेला आपली वाटणे स्वाभाविक आहे.
मात्र, अशा प्रश्नांवर राजकीय ध्रुवीकरण वाढण्याचीही भीती आहे. राष्ट्रगीत, राष्ट्रभावना आणि प्रादेशिक अभिमान यांना एकमेकांच्या विरोधात उभे करणे धोकादायक ठरू शकते. ‘वंदे मातरम्’चा सन्मान राखताना कुठल्याही राज्याच्या राज्यगीतालाही मान्यता देणे, हेच खऱ्या संघराज्य व्यवस्थेचे लक्षण ठरेल. भारत एकसंध आहे कारण येथे विविध भाषा, संस्कृती आणि परंपरा सन्मानाने सहअस्तित्वात आहेत.
आज गरज आहे ती संवेदनशील संवादाची. केंद्राने राज्यांच्या सांस्कृतिक भावनांचा आदर करणे आवश्यक आहे, तर राज्यांनीही राष्ट्रीय प्रतीकांबाबत संतुलित भूमिका घ्यायला हवी. तामिळ अस्मिता ही भारतविरोधी नाही; उलट ती भारतीय विविधतेचा एक महत्त्वाचा भाग आहे. या वास्तवाची जाणीव ठेवूनच पुढील वाटचाल झाली, तरच अशा वादांना सकारात्मक दिशा मिळू शकते.
: मनीष चंद्रशेखर वाघ