
इंग्रजीत एक प्रसिद्ध गोष्ट आहे, ‘एव्हरीबडी, समबडी, एनीबडी अँड नोबडी’ या चार व्यक्तींबाबत ही कथा सांगितली जाते. एक महत्त्वाचे काम करायचे होते. सर्वांना वाटले की कुणीतरी ते करेल, कोणीही करू शकत होते; पण शेवटी कोणीच ते केले नाही. परिणामी दोषारोपांचे राजकारण सुरू झाले. आज अनेक लोकशाही व्यवस्थांमध्ये हीच परिस्थिती दिसून येते. शाळा, रुग्णालये, सार्वजनिक सुविधा आणि सामाजिक समावेशकता यांसारख्या प्रश्नांवर ठोस काम करण्याऐवजी प्रतीकात्मक वादांना अधिक महत्त्व दिले जाते.
लोकशाही व्यवस्थेत सरकारचे खरे मूल्यमापन त्याने कोणते वाद निर्माण केले यावर नव्हे, तर जनतेच्या मूलभूत गरजा कितपत पूर्ण केल्या यावर होते. समाजासमोर उभ्या असलेल्या शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि सामाजिक सलोखा यांसारख्या प्रश्नांवर प्रभावी उपाययोजना करणे ही कोणत्याही सरकारची प्राथमिक जबाबदारी असते. मात्र अनेकदा असे दिसून येते की, या मूलभूत प्रश्नांऐवजी जनभावनांना भडकावणारे किंवा समाजात विभागणी निर्माण करणारे विषय राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आणले जातात.
शिक्षण क्षेत्रात शिक्षकांना आवश्यक संसाधने, पुरेशी मनुष्यबळ व्यवस्था आणि सन्मान मिळणे अपेक्षित असताना अनेक ठिकाणी त्यांना अपुऱ्या सुविधांमध्ये काम करावे लागत आहे. आरोग्य व्यवस्थेवर वाढणारा ताण, सार्वजनिक रुग्णालयांतील मर्यादा आणि खासगीकरणाच्या वाढत्या प्रवृत्तीमुळे सामान्य नागरिकांच्या चिंता वाढल्या आहेत. त्याचबरोबर विविधता, समानता आणि सर्वसमावेशकता यांसारख्या लोकशाही मूल्यांवरही काही ठिकाणी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
स्थलांतरित, अल्पसंख्याक किंवा विविध सांस्कृतिक समुदायांविषयी संशय आणि भीती निर्माण करणारे राजकारण तात्कालिक राजकीय लाभ मिळवून देऊ शकते; परंतु दीर्घकालीन सामाजिक ऐक्यासाठी ते घातक ठरते. कोणताही समाज तेव्हाच प्रगत होतो जेव्हा त्यातील प्रत्येक नागरिकाला सन्मान, संधी आणि सुरक्षिततेची भावना मिळते.
आज गरज आहे ती दोषारोपांच्या राजकारणाची नव्हे, तर जबाबदारी स्वीकारणाऱ्या नेतृत्वाची. शाळा उभारणे, आरोग्यसेवा बळकट करणे, सामाजिक समावेशकता वाढविणे आणि विकासाच्या संधी सर्वांपर्यंत पोहोचविणे हीच खरी लोकसेवा आहे. जनतेनेही प्रतीकात्मक वादांपलीकडे जाऊन सरकारकडून ठोस कामगिरीची अपेक्षा ठेवली पाहिजे. कारण वाद कोणी निर्माण केले हे महत्त्वाचे नसून समाजासमोरील आवश्यक कामे कोणी पूर्ण केली हे महत्त्वाचे आहे.
: मनीष चंद्रशेखर वाघ