विडियो न्यूज

वेब स्टोरी

वेब स्टोरी

ई-पेपर

लॉग इन करें

समाजाच्या मुखवट्याआड दडलेली वेदना

पुण्यातील केतन अग्रवाल हत्याकांड ही केवळ एका तरुणाच्या मृत्यूची घटना नाही; ती आपल्या समाजाच्या अंतःकरणावर उमटलेली एक काळी रेघ आहे. लोहगडाच्या उंच कड्यावरून खाली कोसळलेला केतन हा विश्वास, नातेसंबंध आणि सामाजिक मूल्यांचा एक भागही त्याच्यासोबत कोसळला. या घटनेने पुन्हा एकदा दाखवून दिले की, आपण ज्या समाजाला संस्कार, परंपरा आणि कुटुंबव्यवस्थेचा अभिमान बाळगणारा म्हणतो, त्याच समाजाच्या पायाभरणीत अनेक ठिकाणी खोल तडे गेले आहेत.

सिया गोयल असो, मेघालयातली सोनम रघुवंशी असो किंवा हुंडाबळीच्या घटनांमध्ये सहभागी असलेले पुरुष असोत; गुन्हेगाराचा लिंगभेद नसतो. गुन्हा हा गुन्हाच असतो आणि त्याला कोणतीही सामाजिक वा भावनिक सहानुभूती मिळू शकत नाही. परंतु अशा घटनांचा विचार करताना केवळ व्यक्तींच्या विकृत मानसिकतेवर बोट ठेवून चालणार नाही. त्या विकृतीला खतपाणी घालणाऱ्या सामाजिक वातावरणाकडेही पाहावे लागेल.

भारतीय समाज अजूनही अनेक बाबतीत संवादापेक्षा नियंत्रणावर अधिक विश्वास ठेवतो. विवाहासारख्या आयुष्यभराच्या निर्णयांमध्ये मुला-मुलींना स्वतःचे मत व्यक्त करण्याची मोकळीक अनेक घरांमध्ये आजही नाही. प्रेमसंबंध, वैयक्तिक निवड किंवा स्वतंत्र विचार यांना अनेकदा बंडखोरीचे स्वरूप दिले जाते. परिणामी, काहीजण योग्य मार्गाने संघर्ष करण्याऐवजी चुकीचे आणि गुन्हेगारी मार्ग निवडतात. अर्थात, यामुळे त्यांच्या कृत्यांचे समर्थन होत नाही; मात्र समस्येची मुळे समजून घेणे आवश्यक ठरते.

विरोधाभास असा की, समाज एका बाजूला आधुनिकतेची भाषा बोलतो, तर दुसऱ्या बाजूला व्यक्तिस्वातंत्र्याला संशयाच्या नजरेने पाहतो. मुलांनी प्रश्न विचारू नयेत, वडीलधाऱ्यांच्या निर्णयांवर चर्चा करू नये आणि कुटुंबाच्या प्रतिष्ठेसाठी स्वतःच्या इच्छांचा बळी द्यावा, अशी अपेक्षा अजूनही अनेक घरांमध्ये जिवंत आहे. दडपलेल्या भावना, न बोललेले मतभेद आणि जबरदस्तीने स्वीकारलेले निर्णय यांचे रूपांतर कधी मानसिक तणावात, कधी कौटुंबिक हिंसाचारात, तर कधी थेट रक्तरंजित गुन्ह्यांत होते.

समाजाचा खरा विकास परंपरा जपण्यात नसून, परंपरा आणि परिवर्तन यांच्यात समतोल साधण्यात आहे. मुलांनी आपले विचार मांडणे हा उद्धटपणा नसून परिपक्वतेचा भाग आहे, हे स्वीकारावे लागेल. कुटुंबव्यवस्था टिकवायची असेल तर ती भीतीवर नव्हे, तर विश्वास आणि संवादावर उभी राहिली पाहिजे.

भोपाळ, नोएडा, इंदूर, मेघालय आणि लोहगड-पुणे येथील घटना वेगवेगळ्या वाटल्या तरी त्यांचा संदेश एकच आहे, समाजाच्या चेहऱ्यावरचा आदर्शवादाचा मुखवटा आता गळून पडत आहे. प्रश्न आहे त्या मानसिकतेचा, जी व्यक्तीला सत्य बोलण्यापेक्षा खोटे जगण्यास भाग पाडते.

धोक्याची घंटा वाजली आहे. ती केवळ न्यायव्यवस्थेसाठी नाही, तर प्रत्येक कुटुंबासाठी, प्रत्येक पालकासाठी आणि संपूर्ण समाजासाठी आहे. आता तरी आपण संवादाची दारे उघडणार आहोत की पुढील एखाद्या शोकांतिकेची वाट पाहणार आहोत, हा खरा प्रश्न आहे.

: मनीष चंद्रशेखर वाघ

Leave a Comment

और पढ़ें