या ‘वंचित’चं काय करायचं?

वंचित’ची ‘मविआ’सोबतची संभाव्य युती फिस्कटली. त्यानंतर ‘वंचित’चे अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीकेचा असा काही भडिमार झाला की केवळ त्यांच्यामुळेच भाजपा जिंकणार आहे. संविधान मोडीत काढून देशात हुकुमशाही आणू पाहणार्‍या भाजप विरोधात सर्वांनी एकत्र येऊन लढणे अपेक्षित असताना आघाडीत असा बिघाड झाल्याने कोणाही लोकशाहीप्रेमी माणसाला संताप येणे साहजिकच आहे. पण आता हा संताप थोडा थंड करून याकडे वस्तुनिष्ठपणे पाहू या आणि काही प्रश्नांची उत्तरे शोधायचा प्रयत्न करू या.

१) ‘वंचित’ला फक्त अडीच-तीन टक्के मिळतात, त्यांची एकही सीट निवडून येत नाही, ते भाजपला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत करत असतात असे वाटत असेल तर मुळात ‘मविआ’ने त्यांच्याशी आघाडीची बोलणी सुरूच का केली? याचे कारण हे असू शकते की ‘वंचित’ जर ‘मविआ’मध्ये सामील झाली त्यांच्या अडीच-तीन टक्के मतांच्या आधारे ‘मविआ’च्या अनेक जागा निवडून येऊ शकतात (आणि सामील न झाल्यास भाजपला अनेक जागा जाऊ शकतात).

2) भाजपला अधिक जागा जाऊ नयेत असे ‘मविआ’ला खरोखरच वाटत असेल तर ‘वंचित’ला ‘मविआ’चा एक घटकपक्ष मानून त्यांच्या सहाय्याने काहीही करून अधिकाधिक जागा जिंकाव्यात (भाजपला हरवून) असे ‘मविआ’ला वाटत नाही काय? असे वाटत असल्यास गेल्या निवडणुकांमधील अनुभवावरून ‘वंचित’मुळे अधिकच्या किती जागा ‘मविआ’ जिंकू शकते विश्लेषण करून न्याय्य जागावाटप का केले गेले नाही?

३) या आधीच्या निवडणुकांमध्ये ‘वंचित’ला सोबत न घेतल्याचे परिणाम ‘मविआ’ने अनुभवलेले असताना केवळ भाजपला हरवणे हे लक्ष्य ठेऊन, प्रसंगी काही जागांचा ‘वंचित’साठी त्याग करून युती का घडवून आणली गेली नाही? की भाजप अधिक जागा जिंकला तरी चालेल पण ‘वंचित’ नको असे ‘मविआ’चे धोरण आहे काय?

read more – https://aaplamaharashtradigital.in/archives/9734

४) बरे, नंतर निवडून आल्यावर ‘वंचित’ भाजप सोबत जाईल अशी भीती वाटत असेल तर गेल्या वेळी निवडले गेलेले ‘मविआ’चे किती लोक आज त्यांच्या सोबत आहेत? अगदी पक्षच्या पक्ष त्यांनी पळवून भाजपच्या दरात बांधले आहेत. आणि ‘मविआ’चे यापुढे निवडून येणारे लोक देखील फुटून भाजप कडे जाणार नाहीत याची काही हमी आहे काय?

५) आता ‘वंचित’ सोबत आघाडी नाही म्हणून भाजपच जिंकणार असे मानून ‘वंचित’ नेतृत्वावर जी टीकेची राळ उडवली जात आहे त्यातून ‘मविआ’ची पराभूत मानसिकता आणि दुटप्पीपणा दिसत नाही काय? म्हणजे जागांच्या बाबतीत तडजोड करायची नाही, आपण देऊ तेवढ्याच जागा घ्या असा हट्ट धरायचा आणि मग बिघाडी झाल्यावर ‘वंचित’लाच दोष द्यायचा. ‘मविआ’ने फेकलेल्या क्षुल्लक जागांच्या तुकड्यांवर समाधान मानून ‘वंचित’ने राजकारणात ‘मविआ’ची बलुतेदारीच करत रहावे काय? अशी आघाडी न होण्यास ‘मविआ’ देखील जबाबदार ठरत नाही काय?

६) ‘वंचित’दूर झाल्यावर सुद्धा ‘मविआ’मध्ये सर्व काही आलबेल आहे असे दिसत नाही. वंचितला द्यायच्या संभाव्य जागा आता पूर्णतः ‘मविआ’ला उपलब्ध असल्याने सर्व सुरळीत व्हायला पाहिजे होते. परंतु कित्येक जागांबाबत आजही नाराजी आहे. मग प्रश्न असा पडतो की ‘वंचित’ला ‘मविआ’ नक्की कोणत्या जागा देणार होती आणि निवडून आणणार होती?

एकीकडे भाजप निवडून येईल अशी भीती घालायची, दुसरीकडे ‘वंचित’च्या मतांची अपेक्षा ठेऊन जागेच्या देवाणघेवाणीत हात आखडता घ्यायचा, नंतर खापर ‘वंचित’वर फोडायचे हा प्रकार ‘मविआ’मधील तीन मोठ्या पक्षांचा दुटप्पीपणा आणि स्वार्थ दर्शवितो. अजूनही वेळ गेलेली नाहीये. जिथे जिथे शक्य असेल तिथे अजूनही समझौता करून बहुरंगी लढती टाळल्या जाऊ शकतात. फक्त ‘मविआ’मधील तीन मोठ्या पक्षांनी थोरल्या भावाची भूमिका घेऊन त्यागाची तयारी दाखवली पाहिजे. नंतर कोणीही, कोणाला, कितीही दोष दिला तरी त्याला काहीही अर्थ राहणार नाही.
उत्तम जोगदंड, कल्याण

Leave a Comment

× How can I help you?