चिमण्यांनो, घराकडे परतण्याची वेळ आली आहे…

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे निर्णय घेताना आपले मत विचारात घेत नाहीत, पक्षात आपली कुचंबणा होते, महत्त्वाच्या फायलींवर मातोश्रीत सह्या होतात अशी कारणे देत एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केले आणि आपले चाळीस शिलेदार सोबत घेत त्यांनी मुख्यमंत्रिपद मिळवले. भाजपच्या हायकमांडला शिंदे यांचे हे बंड इततं रुचलं, पचलं की त्यांनी शिंदेंना थेट मुख्यमंत्रपदाती बक्षिसीच दिली. सुरुवातीला शिंदे आणि उपमुख्यमंत्रीपदावर बोळवण केलेले देवेंद्र फडणवीस यांचे सरकार छान कारभार करत होते. पण शिंदे डोईजड होतील, याची भिती कुठेतरी भाजपला होती. म्हणून त्यांनी दुसरा विरोधी पक्ष फोडायचे ठरवले आणि त्यातील नाराज गडी अजितदादा पवारांना आपल्या छावणीत सामिल करून घेतले. इथेच एकनाथ शिंदे यांना आता आपली पहिल्यासारखी पत राहणार नाही, अशी खात्री पटली. पुढे लोकसभा निवडणुका आल्या आणि या दोन वर्षांत भाजपच्या रणनीतीचा अनुभव शिंदे यांना येऊ लागला.

महाविकास आघाडीत राहून शिवसेनेचे जेवढे खच्चीकरण झाले नसते, त्याहून अधिक खच्चीकरण आता भाजपकडून सुरू असल्याची चर्चा होत आहे. राज्यातील ट्रिपल इंजिन सरकारमध्ये भाजपच हा ‘बॉस’असून तो शिंदेसेनेला आणि अजितादादांच्या राष्ट्रवादीला ना धड धावू देत, ना मागे राहू देत. या दोन्ही पक्षांचा रिमोट भाजपच्या हाती आहेत. त्यात मुख्यमंत्री शिंदे यांच्या स्वभावाचा गैरफायदा घेत शिंदे यांना लोकसभा निवडणुकीत आपल्या तालावर नाचायला भाजपने भाग पाडले आहे. वेगवेगळ्या सर्वेक्षणाच्या नावाखाली उमेदवार बदलायला भाग पाडले, तर काही ठिकाणी मतदारसंघच बदलायला भाग पाडले. पक्ष शिंदेंचा; परंतु मतदारसंघ आणि उमेदवार ठरवणार भाजप. लोकशाहीची ही नवी पद्धत आता सुरू झालेली दिसते. त्या तुलनेत अजित पवार सौदेबाजीत हुशार म्हणायचे. त्यांचा एक मतदारसंघ सोडावा लागला, तरी त्यांनी दोन मतदारसंघपदरात पाडून घेतले.

गेल्या वेळच्या लोकसभा निवडणुकीतील सुनील तटकरे हे एकमेव खासदार त्यांच्याकडे होते; परंतु त्यांनी रायगडबरोबर बारामती, शिरूर, नाशिक, परभणी आणि धाराशिव हे सहा लोकसभा मतदारसंघ पदरात पाडून घेतले. त्यांचा रुसवा फुगवा कामाला आलेला दिसतो. त्यांचा एकही उमेदवार भाजपने सुचवला नाही. उलट, शिवसेनेच्या शिंदे गटात आणि भाजपत गेलेल्यांना राष्ट्रवादीत आणून त्यांनी उमेदवारी दिल्या. त्यात डॉ. अर्चना पाटील यांना फक्त भाजपच्या सूचनेप्रमाणे उमेदवारी दिली. महादेव जानकर यांना राष्ट्रवादीचा परभणीचा मतदारसंघ सोडून अजितदादांनी बारामतीसाठी बेगमी केली तर मावळ, कल्याण आणि जळगाव येथे शिंदेसेना आणि भाजपचे नाक दाबले आणि बारामतीचा कोंडलेला श्वास मोकळा झाला. याउलट शिंदे गटाची गत झाली. गेल्यावेळी 18 खासदार निवडून आले होते. त्यापैकी 13 खासदार शिंदे यांच्यासोबत असतानाही त्या जागा टिकविता येतील की नाही, अशी शिंदे गटाची स्थिती आहे. रामटेकमधील कृपाल तुमाने यांचे तिकीट कापून काँग्रेसमधून आ. राजू पारवे यांना शिंदे गटात प्रवेश करायला लावून त्यांना उमेदवारी द्यायला भाजपने भाग पाडले. हिंगोलीत हेमंत पाटील यांची जाहीर झालेली उमेदवारी बदलायला लावली. तिथे वेगळा उमेदवार दिला असला, तरी भाजपच्या आमदाराने तिथे बंड केले आहे.

महाराष्ट्रात 48 लोकसभा मतदारसंघांपैकी 45 जागांवर विजय मिळवण्याचे लक्ष्य गाठताना भाजपने स्वतकडचा एकही मतदारसंघ सोडला नाही. उलट, अजितदादांकडचा सातारा मतदारसंघ, शिंदे गटाचे पालघर, अमरावती, सिंधुदुर्ग आदी मतदारसंघ स्वतकडे घेतले आणि शिंदे गटाचे नाशिक, धाराशिव, परभणी हे तीन मतदारसंघ अजितदादा गटाला द्यायला भाग पाडले. स्वतचे ताट भरताना मित्राच्या ताटातले काढून घेण्याची राजकीय संस्कृती भाजपने रुजवली आहे. महायुतीतल्या चार मतदारसंघांवर तीनही पक्षांकडून दावे केले जात होते; पण राज्याच्या नेत्यांनी एकत्रितपणे इथे उमेदवार कोण यावर तोडगा काढला असला, तरी स्थानिक पातळीवर अजूनही कलह सुरू आहे.

कल्याण हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव डॉ. श्रीकांत यांचा मतदारसंघ. त्यांचे नाव सर्वांत अगोदर जाहीर व्हायला हवे होते; परंतु कल्याण आणि ठाणे मतदारसंघावर भाजपने दावा केल्याने शिंदे यांची गोची झाली आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाने गेली अनेक वर्ष हिंदुत्ववादी पक्षाला निवडून दिले आहे. 1996 पासून हा मतदारसंघ शिवेसेनेचा बालेकिल्ला राहिला होता; परंतु त्याअगोदर तो भाजपचा बालेकिल्ला होता. ठाणे जिल्हा हे शिंदे यांचे होमग्राऊंड असताना या मतदारसंघावर भाजपने दावा केला आहे. आता हे दोन्ही मतदारसंघ शिंदे यांच्याकडे ठेवायचे असतील, तर त्या बदल्यात छत्रपती संभाजीनगर, सिंधुदुर्ग, पालघर या तीन मतदारसंघावर भाजपने दावा केला आहे. त्यात पालघर लोकसभा मतदारसंघ भाजप स्वतकडे घेत असताना शिंदे गटाचे खासदारही स्वतच्या पक्षात घेत आहे. कल्याणमध्ये भाजप कार्यकर्ते आणि आमदारांकडून श्रीकांत शिंदे यांच्याबाबत उघडपणे नाराजी व्यक्त करण्यात आली.

काही दिवसांपूर्वी भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात शिवसेनेचा शिंदे टाचा पदाधिकारी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. या घटनेनंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आणि शिंदे कुटुंबीयांवर उघड नाराजी व्यक्त केली. हिंगोलीत उमेदवारी बदलल्याने शिंदे नांदेडमध्ये भाजपला धडा शिकवण्याचा इशारा दिला आहे. पाटील यांच्या पत्नी राजश्री यांना त्यांच्या माहेरच्या वाशिम यवतमाळमधून उमेदवारी दिली असली, तरी तिथे भावना गवळी यांनी बंडाचे निशाण फडकवले आहे. पालघरपासून रत्नागिरी – सिंधुदुर्गपर्यंतच्या मतदारसंघात शिंदे गटाच्या वाट्याला जास्तीत जास्त चार मतदारसंघ येऊ शकतात, अशी स्थिती आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या छगन भुजबळ यांच्यासाठी भाजपचा दबाव असून त्यामुळे खा. हेमतं गोडसे व त्यांचे समर्थक नाराज आहेत. लोकसभेला ही स्थिती असेल, तर विधानसभेला काय होईल, असा विचार आता शिंदे यांच्या मनात दाटत असेल. आपला मुळचा शिवसेना पक्षच बरा होता, असेही त्यांना वाटत असले. घरटे सोडून गेलेल्या चिमण्यांना आता घरी परतण्याची ओढ लागली नाही तरच नवल!

मनीष चंद्रशेखर वाघ

Leave a Comment

× How can I help you?