या लेखसंग्रहात एकूण ४० सर्वांगसुंदर, उत्तमोत्तम लेख आहेत. जे आपल्या देशातील शिक्षण व्यवस्थेचे प्रतिनिधित्व करतात तर कधी कुटुंब व्यवस्थेचे प्रतिनिधित्व करतात तर कधी सळसळत्या रक्ताच्या तरुणाईची भाषा बोलतात तर कधी प्रबोधनाची समशेर हातात घेवून जुन्या रुढी, परंपरा, अज्ञान, अंध:कार व अंधश्रद्धा यावर जोरदार प्रहार करतात.
एकूणच काय तर सौ. भारतीताईंची लेखणी ही अगदी मुक्तपणे चौफेर फटकेबाजी करताना या पुस्तकात आपणास आढळते.
सौ.भारतीताईंचे बालपण सर्वसामान्य परिस्थितीतून गेल्यामुळे अशा परिस्थितील मुलांनी आपले ध्येय कसे गाठावे हे त्या अत्यंत पोटतिडकिने अनेक लेखांच्या माध्यमातून सांगताना दिसतात.
लेखिकेला डॉक्टर व्हायचे होते ते न होता आले तरी नाउमेद न होता त्या विज्ञान शाखेतील पदवी घेऊन आयुष्याला नवे वळण देतात. पुढे लग्न झाल्यावर सासरी नोकरी करायला विरोध झाल्यावरही त्या कुटुंबाच्या सुखाला प्राधान्य देतात व योग्यवेळ येताच स्वत: शिकवणी घेवून आपली काहीतरी करून दाखविण्याची इच्छा आकांक्षा पुर्ण करत कुटुंबाची जबाबदारी पेलतात आणि आपली संसारवेलही फुलवतात.
याचबरोबर सौ. भारतीताई नियमितपणे वेळ काढून वाचन, लेखन करुन आपल्या आवडीनिवडी व छंद जोपासतात. त्यामुळेच त्या समाजात आपली एक वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरतात.
हे सगळं अदभूत आहे ! दिसते तेवढे सहजसोपे नक्कीच नाही. आयुष्याच्या रंगमंचावर त्या स्वत: रणरागिणी होउन तळपल्या म्हणूनच हा लेखसंग्रह खास आहे.
आपल्या स्वानुभवातून वाचकांना त्या कायमच सकारात्मक दृष्टीकोन ठेवून जगायला शिकवतात. हीच या पुस्तकाची जमेची बाजू आहे असे मला वाटते.
सौ. भारतीताईंची लेखणी ही अतिशय चपळ व प्रगल्भ आहे हे या पुस्तकातील लेख वाचल्यावर प्रकर्षाने जाणवते. विषयातील सर्व मुद्दे त्यांनी आपल्या लेखात चपखलपणे बसवले आहेत.अलंकारिक भाषा, म्हणींचा वापर आणि चारोळ्या घालून लेखातील मर्म वाचकांपर्यंत पोहचविणे ही लेखिकेच्या लेखनशैलीची खासियत आहे.
विषय कोणताही असो त्या खूपच सराईतपणे हाताळतात. कोणत्याही विषयाची मांडणी त्या खूपच सहजसुंदर व सुलभ रितीने करतात. त्यामागे त्यांची अनेक वर्षांची वाचन व लेखनाची तपश्चर्या असणार हे मात्र नक्कीच! त्याशिवाय लेखन इतके प्रभावी व सफाईतदार करणे केवळ अशक्य आहे. कोणताही विषय गुंफताना सौ.भारतीताई या नेमकेपणाने, मोजक्या शब्दांत त्याची अचूकपणे उकल करताना आढळतात.
त्यांचे हे गद्य लेखन नव्या पिढीसाठी नक्कीच प्रेरणादायी आणि आदर्शवत ठरेल यात काही शंकाच नाही.
शालेय विद्यार्थी, स्पर्धा परिक्षा, उच्चशिक्षण, व्याख्याते, अभ्यासक या सर्वांनाच हे पुस्तक पथदर्शक ठरुन निश्चितपणे उपयोगी पडेल असे मला वाटते.
अभ्यासासोबतच चिंतनाची आणखी थोडी जोड मिळाली तर सौ.भारतीताईंचे लेखन मराठी साहित्यात एक वेगळा ठसा उमटवेल असे मला खात्रीने म्हणावेसे वाटते. वाचकांना पुन्हां पुन्हां वाचायला
भुरळ पाडतील असे विषय घेऊन लेखिकेने वाचकांच्या काळजालाच हात घातला आहे.
त्यांच्या लेखनातुन सण, ऋतु, प्रवास, मानवी स्वभावाचे विविध पैलू ,टीनेजर मुलांसाठी सल्ला, शिक्षकांविषयी वाटणारा जिव्हाळा, अनेक महत्वाच्या व्यक्तींच्या जीवनातील गोषवारा लेखिकेने अनेक उदाहरणे, दाखले देऊन टिपला आहे. पुर्वीचा काळ सुवर्णकाळ कसा होता हे सांगताना लेखिका आपल्या बालपणात रमल्या आहेत. मुले आणि पालक यांच्या नात्यातील बदल सांगताना पुर्वीचे पालक आणि हल्लीचे पालक यांच्यातील फरक सांगितला आहे.
लेखिका आपल्या काळातील प्रजासत्ताक कसे साजरे करायची यांचेही साद्यंत वर्णन त्यांनी सुंदररित्या केले आहे.
लेखिका कुटुंबवत्सल असल्याचे त्यांच्या ‘ सुख कुटुंबाचे’, ‘बंध नात्यांचे’, ‘ ताई आणि भाऊजी’,’ मुलांना पॉकेटमनी देताना’ या अशा बऱ्याच लेखांमधून आपल्या निदर्शनास येते.
‘ दहावी बारावीचा बागुलबुवा’ या लेखातून त्या पालकांच्या वृत्तीवर ताशेरे ओढत आहेत. मोबाईलचा वापर किती आणि कसा करावा या गोष्टीचा उहापोह त्या आपल्या लेखातून करत आहेत.
जीवनातील अनेक महत्वाच्या बाबी त्यांनी वाचकांच्या नजरेत आणून दिल्या आहेत यावरून लेखिकेचा वाचन अनुभव आणि व्यासंग दांडगा असल्याचे समजते.
प्रा. विजय काकडे