धर्म हा शब्द संंस्कृत भाषेतील “धृ” या धातूपासून बनलेला आहे.” धारयति इति धर्म:”म्हणजे धारण करण्या योग्य जे जे आहे ते धर्म या संज्ञेत येते. मग धारण करण्या योग्य म्हणजे काय काय?असा पुढचा प्रश्न येतो. सर्वसाधारण माणसाचा वकूब असे सांगतो की ,जे आपल्याला दुसऱ्याच्या बाबतीत आचरण करणे योग्य वाटत नाही ते न करणे म्हणजे धर्म. इतका साधा अर्थ धर्माचा आहे. आपल्या श्रध्देबरोबर दुसऱ्यांच्या श्रद्धा जपणे , त्यांचा अनादर न करणे म्हणजे धर्म होय.
आर्य चाणक्य म्हणतात ‘सुखस्य मूलम धर्मः’ अर्थात सुखाचा आधार धर्म आहे. भाग्याने प्राप्त झालेला देव दुर्लभ देह शुभ आणि कल्याणकारी कामांसाठी लावणे यात जीवनाची सार्थकता आहे.संस्कृत मध्ये एक वचन आहे की ‘धरमेण हीनः पशुभि: समाना’
धर्माशिवाय हा नरदेह पशू समान आहे. अंततः मानवजातीच्या हितासाठी कर्तव्य करणे यालाच सनातन धर्म म्हणजेच जीवन व्यतीत करण्याचा आदर्श मार्ग मानले गेले आहे.
धर्माची व्याख्या करताना महाभारतकार वेद व्यासांनी असे म्हटले आहे की जो व्यवहार व्यक्ति, समाज,व सर्व साधारण लोकांना धारण करतो तोच धर्म आहे. धर्माचे प्रामुख्याने तीन अर्थ आहेत.संपूर्ण चराचराला धारण करणारा , त्याचे पालन-पोषण करणारा त्याचबरोबर त्याचा अवलंबन करणारा.याचा अर्थ पूर्ण विश्व हेच मानवतेसाठी एक धर्म आहे . ज्याच्या मार्ग-दर्शनाने सर्वप्रकारची विचारधारा समान रूपाने संवर्धीत होते.धर्माची परिभाषा मोठी व्यापक आहे , तिच्यावर या चराचराची आचारसंहिता अवलंबून आहे.
लोकांनी एकच धर्म मानावा अशी जर ईश्वराची इच्छा असती,तर इतके धर्म कशाला उत्पन्न झाले असते? सर्वांवर एकच धर्म लादण्याचे निष्पळ प्रयत्न अनेक पद्धतींनी करण्यात आलेले आहेत. यासाठी तलवारींचा उपयोग केला गेला.त्यावेळी देखील त्या ठिकाणी दहा नवे धर्म निर्माण झाल्याचे इतिहास आपल्याला सांगतो.एकच धर्म सर्वांसाठी उपयुक्त होऊ शकत नाही.क्रिया व प्रतिक्रिया अशा दोन प्रकारच्या शक्तींनी मानवी जीवन बनलेले आहे. मनुष्य विचारशील प्राणी आहे.मनुष्य म्हणजे मनस-युक्त अर्थात मन असलेला जीव आहे;जर त्याची विचारशक्ती नष्ट झाली तर पशूहून त्याच्यात कोणतेही वेगळे वैशिष्ट्य राहणार नाही.असा मानव कोणाला आवडेल? या मनुष्यत्वासाठी एकतेतील विविधता आवश्यक आहे.जोपर्यंत अशी विविधता शाबूत आहे तोपर्यंत जगाला विनाशाचा धोका नाही.जीवनातील आपापल्या क्षेत्रातील कर्तव्ये सर्वांनी योग्य रीतीने बजावली तरच विविधता सुरक्षित राहणार आहे.प्रत्येक धर्मात चांगले व कर्तुत्ववान लोक झालेले आहेत.त्यानी मानवजातीला मानाचे स्थान मिळवून दिले आहे.असे थोर लोक प्रत्येक धर्मात असल्याने कोणत्याही धर्माविषयी द्वेषभावना बाळगण्याचे कारण नाही…
धर्म एक शाश्वत नीति-दर्शनाचे नाव आहे . ज्याच्या आधारे मानवाचे अंतिम लक्ष्य म्हणजेच परमात्मा प्राप्ती होऊ शकते. धर्माच्या गर्भामध्ये सर्व पंथ, संप्रदाय ,मते व मान्यता जन्माला येऊन मानवजातीसाठी विकसित होत असतात.
Recent Posts
देवांनो ! तुम्ही सुद्धा!…
October 23, 2025
No Comments
पोलिस हुतात्मा दिन
October 21, 2025
No Comments
गोष्ट ॲक्वा लाईन ट्रेनची..
October 21, 2025
No Comments
एकल शिक्षकी शाळा : देशाच्या भविष्यापुढे प्रश्नचिन्ह
October 17, 2025
No Comments
डिएला : अल्बेनियाची पहिली एआय मंत्री
October 15, 2025
No Comments