भवतु सब्ब मंगलम….
आज गुरुवार २३ मे २०२४ म्हणजेच वैशाख पौर्णिमा! आज बौद्ध धर्म संस्थापक ,बोधीसत्व सिध्दार्थ गौतम यांचा जन्म दिवस.ब्रिटिशांनी विश्वातील १०० महामानवांची यादी केली आहे त्यामध्ये प्रथम क्रमांकावर गौतम बुद्ध आहेत.महामानव गौतम बुद्ध यांचा जन्म इस्वीसनपूर्व ५६७ दरम्यान हिमालय घाटी च्या खाली नेपाळ मध्ये लुंबिनी येथे झाला. त्यांचे वडील शाक्य वंशाचे प्रमुख होते. गौतम बुद्ध यांचा जन्म अतिसंपन्न, वैभवशाली राज परिवारात झाला होता. गौतम बुद्धाने रातोरात राजगादी त्याग करून कठोर तपस्या करून परम श्रेष्ठ ज्ञान प्राप्त केले.गौतम बुद्धाला भगवान विष्णूचा ९ वा अवतार मानले जाते. या बाबत बरीच मतमतांतरे आणि वादही आहेत. धर्म ग्रंथानूसार श्रीमद्भगवदगीता, विष्णू पुराण, श्रीमद्भागवत, भागवत पुराण या ग्रंथात बौद्धाच्या नवव्या अवताराचे सर्व उल्लेख आहेत. पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नवव्या अवताराचा मुद्दा संशोधन व अभ्यासपूर्ण विश्लेषण करून खोटा ठरवला.दिनांक १४ ऑक्टोबर १९५६ रोजी दिक्षाभूमी नागपूर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी बुध्द धम्म स्विकारताना केलेल्या भाषणात नमूद केले की ,विष्णूंचा नववा अवतार बौध्द, व राजा गौतम हे पूर्णपणे निराळे आहेत. डॉ आंबेडकर यांनी दिक्षा देताना ज्या २२ प्रतिज्ञा केल्या त्यामध्ये अनुक्रमांक ५ च्या प्रतिज्ञेत ते असे म्हणतात , “गौतम बुद्ध हा विष्णूचा अवतार होय, हा खोटा आणि खोडसळ प्रचार आहे असे मी मानतो.”
गौतमबुद्ध यांनी एका पिंपळाच्या झाडाखाली बसून कठोर तपश्चर्या केली. सत्य जाणून घेतल्याशिवाय मी येथून हलणार नाही असा निर्धार त्यांनी केला होता. गौतम बुद्ध ४९ दिवस झाडाखाली बसून ज्ञान प्राप्ती साठी साधना करत होते. वैशाख पौर्णिमा होती ,सारी रात्र ते बसून होते.असा एक क्षण पहाटे उजाडला आणि त्यांच्या कठोर साधनेचे फळ त्यांना मिळाले. त्यांना जीवनाचे सत्य उलगडले आणि पूर्ण ज्ञानाची प्राप्ती झाली. ज्या पिंपळ वृक्षाखाली गौतमांना अंतिम सत्याचा बोध झाला त्या वृक्षाला बोधीवृक्ष म्हटले गेले. गौतम बुद्ध त्यावेळी फक्त ३५ वर्षांचे होते. त्या दिवशी वैशाख पौर्णिमा होती .सिध्दार्थ गौतमाला अंतिम सत्य प्राप्त झाले – परम ज्ञान प्राप्त झाले आणि सिध्दार्थ गौतम यांना बुध्दत्व प्राप्त झाले. सिध्दार्थ गौतम, वैशाख पौर्णिमेला भगवान बुध्द झाले.
गौतम बुद्ध म्हणत,बौद्ध धर्म मला प्रज्ञा शिकवतो. तो मला अंधश्रद्धा आणि अद्भुतता शिकवत नाही. तो मला प्रज्ञा, करुणा आणि समता ही तत्त्वे शिकवतो. मनुष्याच्या चांगल्या आणि सुखी जीवनाला याची आवश्यकता आहे.” गौतमांनी ४५ वर्षे ही शिकवण देत धम्म प्रचार केला ..धम्मप्रचारासाठी भ्रमंती करताना बुद्ध गंभीर आजाराने त्रस्त झाले, शेवटी कुशीनगरला पोहोचले, जिथे त्यांनी आपला शेवटचा शिष्य नियुक्त केला आणि संघाला त्यांनी शेवटचे शब्द सांगितले .इसवी सन पूर्व ४८७ मध्ये त्यांना परिनिर्वाण प्राप्त झाले.त्या दिवशी देखील वैशाख पौर्णिमा होती .वयाच्या ८० व्या वर्षी भगवान बुध्द यांनी शरीर त्याग करताना दिलेला शेवटचा उपदेश मानवजातीसाठी महत्त्वाचा आहे. ते म्हणाले
” स्वतःसाठी दिवा व्हा ” म्हणजेच स्वतःच दीवा होऊन प्रकाशाचा शोध घ्या. माणसाचा अभ्युदय स्वत: माणूसच करतो..किती अदभुत आहे हा वैशाख पौर्णिमेचा दिवस, या दिवशी भगवान बुध्दांचा जन्म झाला, ज्ञान प्राप्ती होवून त्यांना बुध्दत्व प्राप्त झाले व त्याच वैशाख पौर्णिमेला भगवानांचं महापरिनिर्वाण देखील झाले..
लेखन: मोरेश्वर बागडे