31 मे ही ठाणे शहरातील नालेसफाईसाठी डेडलाईन देण्यात आली होती. परंतु आता पावसाळा अगदी तोंडावर येऊन ठेपलेला असतानासुद्धा ठाणे महापालिकेकडून संपूर्ण शहरातील नालेसफाई झालेली नाही. अनेक नाले तुंबलेल्या अवस्थेत असून कचऱयाचे ढीग, प्लास्टिकचे डोंगर यांनी हे नाले सजले आहेत तर काही नाल्यांमध्ये झाडे उगवलेली आहे. विशेष म्हणजे नाल्याच्या भिंती सुशोभित करण्यासाठीं रंगवल्या जात असताना महापालिका प्रशासनाचे कचऱयाने तुंबलेल्या नाल्याकडे मात्र दुर्लक्ष केले आहे. ठेकेदारांनी नाले सफाई न केल्यामुळे त्याचा त्रास नागरीकांना होत असून पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभाग नेमके काय करते? असा संतप्त प्रश्न नागरीक विचारात आहेत.
शहरातील नालेसफाई हा नेहेमीच चर्चेचा विषय ठरला आहे. पावसाळ्यात नालेसफाईच्या नावाखाली ठेकेदाराकडून होत असलेल्या हातसफाई बाबत अनेकदा प्रश्न उपस्थित करण्यात येतात. नालेसफाई झाल्यानंतर संबंधीत विभागाचे अधिकारी, महापालिका आयुक्त नालेसफाईची पाहणी करतात. त्या नंतर शहरातील नाल्यांकडे कोणीही पुढच्या पावसाळ्यापर्यंत ढुंकून पाहत नाही अशी स्थिती आहे. यंदाही महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी अनेक ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन नालेसफाईच्या कामाची पाहणी केली. परंतु आयुक्तांची पाठ फिरताच नालेसफाईचे काम जैसे थेच असल्याचे दिसून येते. महापालिका आणि अनोगोंदीचा कारभार हे समिकरण काही नवे नाही. रस्ते, नाले, खड्डे याविषयींच्या समस्या वारंवार समोर येतात. तात्पुरती कारवाई किंवा कार्यवाही केली जाते. पुन्हा येरे माझ्या मागल्या म्हणत या समस्या ठाणेकरांसमोर आ वासून उभ्या असतात.
ठाणे महापालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी ठाणे शहरातील नाल्यांची साफसफाई दर महिन्यात करावी अशी सूचना प्रशसानाला केली होती. वर्षात एकदाच नालेसफाई होत असल्याने पावसाळा सूरू होण्यापूर्वी करण्यात येणऱया नालेसफाईमुळे नालेसफाई योग्य प्रमाणात होत नाही. त्याचप्रमाणे दर महिन्यात साफसफाई केल्यामुळे शहरातील नाले स्वच्छ राहिल्याने नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार नाही असा कयास होता. परंतु प्रशासनाने व ठेकेदाराने या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे.
नालेसफाईची डेडलाईन 31 मे रोजीच संपली आहे. असे असूनही अनेक ठिकाणी नाल्यातील पूर्ण गाळ काढला गेलेला नाही. फक्त वरवरचा प्लास्टिकचा कचरा उचलला गेला. नाले पूर्ण क्षमतेने साफ न केल्याने मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यास पाणी नागरिकांच्या घरात घुसण्याची शक्यता आहे. दरवर्षी हा प्रकार संपूर्ण पालिका हद्दीत पाहायला मिळतो. यंदाही ठाणे जलमय होणार हे निश्चित. : मनीष वाघ
Post Views: 183
Recent Posts
देवांनो ! तुम्ही सुद्धा!…
October 23, 2025
No Comments
पोलिस हुतात्मा दिन
October 21, 2025
No Comments
गोष्ट ॲक्वा लाईन ट्रेनची..
October 21, 2025
No Comments
एकल शिक्षकी शाळा : देशाच्या भविष्यापुढे प्रश्नचिन्ह
October 17, 2025
No Comments
डिएला : अल्बेनियाची पहिली एआय मंत्री
October 15, 2025
No Comments


