31 मे ही ठाणे शहरातील नालेसफाईसाठी डेडलाईन देण्यात आली होती. परंतु आता पावसाळा अगदी तोंडावर येऊन ठेपलेला असतानासुद्धा ठाणे महापालिकेकडून संपूर्ण शहरातील नालेसफाई झालेली नाही. अनेक नाले तुंबलेल्या अवस्थेत असून कचऱयाचे ढीग, प्लास्टिकचे डोंगर यांनी हे नाले सजले आहेत तर काही नाल्यांमध्ये झाडे उगवलेली आहे. विशेष म्हणजे नाल्याच्या भिंती सुशोभित करण्यासाठीं रंगवल्या जात असताना महापालिका प्रशासनाचे कचऱयाने तुंबलेल्या नाल्याकडे मात्र दुर्लक्ष केले आहे. ठेकेदारांनी नाले सफाई न केल्यामुळे त्याचा त्रास नागरीकांना होत असून पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभाग नेमके काय करते? असा संतप्त प्रश्न नागरीक विचारात आहेत.
शहरातील नालेसफाई हा नेहेमीच चर्चेचा विषय ठरला आहे. पावसाळ्यात नालेसफाईच्या नावाखाली ठेकेदाराकडून होत असलेल्या हातसफाई बाबत अनेकदा प्रश्न उपस्थित करण्यात येतात. नालेसफाई झाल्यानंतर संबंधीत विभागाचे अधिकारी, महापालिका आयुक्त नालेसफाईची पाहणी करतात. त्या नंतर शहरातील नाल्यांकडे कोणीही पुढच्या पावसाळ्यापर्यंत ढुंकून पाहत नाही अशी स्थिती आहे. यंदाही महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी अनेक ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन नालेसफाईच्या कामाची पाहणी केली. परंतु आयुक्तांची पाठ फिरताच नालेसफाईचे काम जैसे थेच असल्याचे दिसून येते. महापालिका आणि अनोगोंदीचा कारभार हे समिकरण काही नवे नाही. रस्ते, नाले, खड्डे याविषयींच्या समस्या वारंवार समोर येतात. तात्पुरती कारवाई किंवा कार्यवाही केली जाते. पुन्हा येरे माझ्या मागल्या म्हणत या समस्या ठाणेकरांसमोर आ वासून उभ्या असतात.
ठाणे महापालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी ठाणे शहरातील नाल्यांची साफसफाई दर महिन्यात करावी अशी सूचना प्रशसानाला केली होती. वर्षात एकदाच नालेसफाई होत असल्याने पावसाळा सूरू होण्यापूर्वी करण्यात येणऱया नालेसफाईमुळे नालेसफाई योग्य प्रमाणात होत नाही. त्याचप्रमाणे दर महिन्यात साफसफाई केल्यामुळे शहरातील नाले स्वच्छ राहिल्याने नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार नाही असा कयास होता. परंतु प्रशासनाने व ठेकेदाराने या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे.
