आपल्याला आठवत असेल की अठ्ठावीस (१९९७) वर्षांपूर्वी अनिल कपूर,उर्मिला मातोंडकर आणि श्री देवी यांचा ,’जुदाई’ हा सिनेमा आला होता..
या सिनेमात उर्मिला मातोंडकर ही अनिल कपूर च्या प्रेमात पडते ,जो एके काळी तिचा एका कंपनीतील सहकारी असतो. तिला त्याच्याशी लग्न करायचे असते पण अनिल कपूर हा विवाहित असतो. तरीसुद्धा तिला तो हवा असतो. त्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढून आपलासा करण्यासाठी ती खूप मेहनत करते. पण तिचे सर्व रोमँटिक प्रयत्न वाया जातात. पण तिला तर अनिल कपूर हवा असतो. सर्व प्रयत्न फुकट जात आहेत असं दिसल्यावर ती कार्पोरेट डावपेच लढवते. ती श्रीदेवीला म्हणजे अनिलच्या बायकोला नवऱ्याला (अनिलला) सोडण्यासाठी एक कोटी रुपयांची ऑफर देते.
थोडा व्यावहारिक दृष्टिकोन लक्षात घेऊन आणि मनात गणितीय आराखडे करत श्रीदेवी उर्मिलाच्या प्रस्तावाला सुखाने होकार देते. एक कोटी रुपयाच्या बदल्यात ती अनिलला सोडायला तयार होते. थोडक्यात ती अनिल याला एक कोटी रूपयांत ऊर्मिलाला चक्क विकते. सिनेमातली ही घटना बऱ्याच रसिकांना आवडली नाही..
पण मंडळी, अलिकडे चार वर्षांपूर्वी अशीच एक घटना भोपाळ मध्ये खऱ्याखुऱ्या सांसारिक जीवनात घडली आहे.
एक ५४ वर्षांची महिला ४२ वर्षांच्या सहकाऱ्याच्या प्रेमात खोलवर पडते. तो विवाहित असतो आणि त्याला दोन मुलेही असतात. प्रेमात आकंठ बुडालेली ती महिला त्याचा ताबा घेण्यासाठी आसुसलेली असते. यासाठी ती चक्क त्या सहकाऱ्याच्या बायकोला जाऊन भेटते आणि तिच्यासमोर एक प्रस्ताव ठेवते.तो खालील प्रमाणे असतो.
१. साठ लाखांचा एक दुमजली बंगला.
२ सत्तावीस लाखांच्या मुदत ठेवी.
३ आणि एक भूखंड
अशा प्रकारे तिला जीवनभर पुरेल अशी एकूण एक कोटी दहा लाखांची पुंजी देऊन तिचा नवरा देण्याचा प्रस्ताव ती तिच्या समोर ठेवते.
कोणतेही आढेवेढे न घेता ती आनंदाने तो प्रस्ताव स्वीकारून नवरा तिला द्यायला तयार होते. नव्हे देतेही.. ही प्रत्यक्ष घटना भोपाळ ची आहे.
तर मंडळी सन १९९७ साली चित्रपटात अनिल कपूर नवरा म्हणून एक कोटीला विकला गेला आणि भोपाळचा हा सद्गृहस्थ अलिकडे एक कोटी दहा लाखाला विकला गेला.
या घटनेतून एक गोष्ट ठामपणे सिद्ध होते ती म्हणजे महागाईचे चटके देणाऱ्या सध्याच्या चलनवाढीच्या काळात गेल्या पंचवीस वर्षांतील नवऱ्याचे बाजार मूल्य क्वचितच वाढल्याचे आढळते.
*यातून एक धडा शिकायला मिळतो तो म्हणजे
सेन्सेक्स वाढू शकतो, सोन्याचे भाव गगनाला भिडू शकतात, रिअल इस्टेटचा धंदा तेजीत येऊ शकतो पण नवरा नावाची मालमत्ता लक्षणीय रित्या स्थिर राहते.*
©® मोरेश्वर बागडे


