विडियो न्यूज

वेब स्टोरी

वेब स्टोरी

ई-पेपर

लॉग इन करें

रोबोट्सचे आंदोलन : माणसाला जागे करणारा इशारा

कल्पना करा… हातात झेंडे घेऊन, घोषणा देत रोबोट्स रस्त्यावर मोर्चा काढत आहेत! ऐकायला हे एखाद्या विज्ञानकथेतील दृश्य वाटते. पण ७ सप्टेंबर २०२६ रोजी पोलंडची राजधानी वारसॉ येथे हे प्रत्यक्षात घडले. डिजिटल अफेयर्स मंत्रालयाबाहेर सुमारे तीस ह्युमनॉइड रोबोट्स आणि रोबोटिक कुत्र्यांनी आंदोलन केले. त्यांच्या घोषणा होत्या ‘नोकऱ्या वाचवा’, ‘नियमांची वेळ आली आहे’, ‘थांबू नका, नियमन करा’.

हा प्रकार गंमतीचा वाटू शकतो. रोबोट्सना नोकरीची चिंता कशाला? त्यांना बेरोजगारी भत्ता लागतो का? घर चालवायचे असते का? मुलांचे शिक्षण करायचे असते का? महिन्याच्या शेवटी पगाराची वाट पाहावी लागते का? नाही. मग रोबोट्स माणसांच्या नोकऱ्यांसाठी आंदोलन का करत होते? याच प्रश्नांमध्ये या संपूर्ण घटनेचे गांभीर्य दडले आहे.

हे आंदोलन प्रत्यक्षात रोबोट्सचे नव्हते; ते माणसांनी रोबोट्सच्या माध्यमातून माणसांसाठी केलेले आंदोलन होते. ‘डेमोक्रॅटिसम’ या उपक्रमाने कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रोबोटीकरणाचा रोजगार बाजारावर होणारा परिणाम चर्चेत आणण्यासाठी ही मोहीम उभी केली. तंत्रज्ञानाचा विरोध करायचा नाही; पण तंत्रज्ञान माणसाच्या रोजगाराची जागा घेऊ लागले तर त्याला नियमांची चौकट हवी, हा आयोजकांचा मुद्दा होता आणि म्हणूनच हा मोर्चा रोबोट्सचा नसून माणसाच्या भविष्याचा मोर्चा आहे.

आजपर्यंत यंत्रे माणसाचे शारीरिक कष्ट कमी करत होती. संगणकाने कार्यालयीन कामे वेगवान केली. इंटरनेटने माहितीचे जग हाताच्या तळव्यावर आणले. पण कृत्रिम बुद्धिमत्तेने पहिल्यांदाच प्रश्न वेगळ्या पातळीवर नेला आहे. कारण आता मशीन फक्त हाताने होणारे काम करत नाही; ते विचारासारखे दिसणारे कामही करू लागले आहे.

लेखन, भाषांतर, चित्रनिर्मिती, ग्राहक सेवा, माहितीचे विश्लेषण, संगणकीय प्रोग्रामिंग, कायदेशीर कागदपत्रांची छाननी, वैद्यकीय अहवालांचे प्राथमिक विश्लेषण, जाहिरात, पत्रकारिता; अनेक क्षेत्रांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता माणसाच्या कामाला पर्याय ठरू लागले आहे. उद्या एखाद्या कार्यालयात शंभर कर्मचारी असतील आणि त्यांचे काम दहा माणसे व अत्याधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता करू लागली, तर उरलेल्या नव्वद जणांचे काय? हा प्रश्न केवळ रोजगाराचा नाही. तो अर्थव्यवस्थेचा, सामाजिक सुरक्षिततेचा आणि माणसाच्या प्रतिष्ठेचा आहे.

प्रत्येक औद्योगिक क्रांतीने काही रोजगार संपवले आणि काही नवे रोजगार निर्माण केले. त्यामुळे ‘रोबोट आले म्हणजे सर्व माणसे बेरोजगार होतील’ असे सरसकट म्हणणे योग्य ठरणार नाही. पण यावेळी बदलाचा वेग आणि व्याप्ती हा महत्त्वाचा मुद्दा आहे. नवीन तंत्रज्ञान शिकून घेण्यासाठी माणसाकडे वेळ असेल का? एका पिढीला जुने कौशल्य सोडून नव्या कौशल्याकडे वळण्याची संधी मिळेल का? की कंपन्यांच्या नफ्याच्या शर्यतीत माणूसच सर्वात स्वस्त आणि सहज बदलता येणारा घटक ठरेल? वारसॉच्या रस्त्यावर उभे असलेले रोबोट्स याच प्रश्नांकडे बोट दाखवत होते.

या आंदोलनात एक विलक्षण उपरोधही आहे. माणसांनी तयार केलेली यंत्रेच माणसांना सांगत होती ‘आमच्यावर नियंत्रण ठेवा!’ रोबोट्सनी फलक हातात घेतले होते; पण खरी भीती त्यांच्या हातात नव्हती. ती भीती माणसांच्या हातातून निसटणाऱ्या नियंत्रणाची होती.

पोलंडचे डिजिटल अफेयर्स मंत्री क्रिझिस्तोफ गॉव्कोव्स्की यांनी आंदोलनस्थळी आयोजकांशी संवाद साधला आणि नियंत्रणाशिवाय विकसित होणारी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि त्यात समाविष्ट होणारी ह्युमनॉइड तंत्रज्ञान ही गंभीर समस्या ठरू शकते, असे मत व्यक्त केले. म्हणजेच सरकारसमोरचा प्रश्न आता ‘AI येणार का?’ हा राहिलेला नाही. AI आली आहे. रोबोट्स रस्त्यावर उतरले आहेत. प्रश्न आहे, तिचा वापर कोणत्या मर्यादेत करायचा?

भारतासाठीही हा इशारा तितकाच महत्त्वाचा आहे. आपल्याकडे तरुणांची संख्या प्रचंड आहे. दरवर्षी लाखो तरुण रोजगाराच्या बाजारात प्रवेश करतात. त्याच वेळी उद्योगांना कमी मनुष्यबळात अधिक उत्पादन हवे आहे. अशा परिस्थितीत कृत्रिम बुद्धिमत्ता आणि स्वयंचलित यंत्रणा मोठ्या प्रमाणावर स्वीकारली गेली तर रोजगाराचे स्वरूप झपाट्याने बदलू शकते.

मग शिक्षणव्यवस्थेने काय करायचे? केवळ पदव्या देत राहायच्या की बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळणारी कौशल्ये शिकवायची? सरकारने काय करायचे? कंपन्यांना तंत्रज्ञान स्वीकारण्याची मोकळीक द्यायची; पण त्याच वेळी कामगारांच्या संरक्षणासाठी कायदे करायचे का? उद्योगांनी नफा वाढवताना विस्थापित होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पुनर्प्रशिक्षणाची जबाबदारी घ्यायची का? आणखी मोठा प्रश्न आहे तो म्हणजे AI मुळे निर्माण होणाऱ्या संपत्तीचा लाभ कोणाला मिळणार?

जर उत्पादन वाढले, नफा वाढला आणि रोजगार कमी झाले, तर त्या वाढलेल्या संपत्तीमध्ये सामान्य माणसाचा हिस्सा काय? तंत्रज्ञानामुळे श्रीमंत अधिक श्रीमंत आणि रोजगाराच्या शोधात असलेला तरुण अधिक असुरक्षित झाला, तर ती प्रगती कोणासाठी? म्हणूनच कृत्रिम बुद्धिमत्तेचा विरोध करणे हा उपाय नाही. उलट, AI चा वापर अधिक मानवी करण्याची गरज आहे. तंत्रज्ञानाने माणसाला विस्थापित करण्याऐवजी सक्षम केले पाहिजे. धोकादायक, कंटाळवाणे आणि अत्यंत कष्टाचे काम रोबोट्सनी करावे; पण त्यातून निर्माण होणाऱ्या आर्थिक फायद्याचा सामाजिक वाटा निश्चित करण्याची जबाबदारी राज्याची असली पाहिजे.

वारसॉमध्ये रोबोट्स काही तास रस्त्यावर फिरले. त्यांनी घोषणा दिल्या. लोकांनी त्यांच्याकडे कुतूहलाने पाहिले. माध्यमांनी त्यांचे फोटो जगभर पोहोचवले. पण त्या रोबोट्सनी प्रत्यक्षात माणसाला आरसा दाखवला आहे. पण आरशात दिसणारा प्रश्न रोबोट्सचा नाही.‘उद्या मशीन काम करेल, पण माणूस काय करेल?’

या प्रश्नाचे उत्तर आजच शोधावे लागेल. कारण उद्या रोबोट्सना आंदोलन करण्याची गरज उरणार नाही. जर आपण आज नियम केले नाहीत, तर कदाचित माणसालाच आपल्या रोजगारासाठी रोबोट्सकडे मोर्चा काढावा लागेल. तंत्रज्ञान थांबवणे शक्य नाही.पण तंत्रज्ञानाच्या वेगापुढे माणूस हरवू नये, याची काळजी घेणे नक्कीच शक्य आहे. रोबोट्सनी वारसॉमध्ये आंदोलन केले; खरा मोर्चा मात्र माणसाच्या भवितव्याचा आहे.

: मनीष चंद्रशेखर वाघ

Leave a Comment