
शब्दांचे मेघ जमले, तरी संवेदनांचा दुष्काळ,
शेतकऱ्यांच्या वेदनांना, नाही कवितेचा ओलावा;
संमेलनात शब्दांचा उत्सव, मदतीचा मात्र वनवास,
साहित्य जिवंत म्हणायचे, की संवेदनांचा आभास?
महाराष्ट्रात दुष्काळ पडतो, शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील पाणी आटते, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होतो, पिण्याच्या पाण्यासाठी गावोगावी वणवण सुरू होते आणि दुसरीकडे साहित्य संमेलनांच्या आयोजनाची लगबग सुरू होते. कुठे संमेलनाचे स्थळ, कुठे मंडपाची व्यवस्था, कुठे पाहुण्यांची यादी, तर कुठे शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानाची जुळवाजुळव! महाराष्ट्रातील या दोन वास्तवांमधील विरोधाभास अस्वस्थ करणारा आहे. एकीकडे जगण्याचा संघर्ष आणि दुसरीकडे साहित्याचा उत्सव! प्रश्न साहित्य संमेलनाला विरोध करण्याचा नाही, तर साहित्याच्या संवेदनशीलतेची कसोटी संकटाच्या काळात नेमकी कुठे लागते, हा आहे.
पुढील वर्षी पुण्यात होणारे शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हा मराठी साहित्यविश्वासाठी ऐतिहासिक टप्पा असेल. शंभराव्या संमेलनाचा उत्साह, त्याचा भव्यपणा आणि त्यानिमित्ताने होणारे सांस्कृतिक कार्यक्रम यांना निश्चितच महत्त्व आहे. मात्र, महाराष्ट्रातील दुष्काळाचे सावट गडद होत असताना या शतकमहोत्सवी संमेलनाने स्वतःच्या भव्यतेपलीकडे जाऊन समाजाच्या वेदनांकडे पाहण्याची तयारी दाखवली आहे का? हा प्रश्न विचारणे गैर नाही.
साहित्य संमेलने दरवर्षी होतात. अध्यक्ष निवडीचे मानपमानाचे प्रयोग रंगतात. नियुक्त अध्यक्षांची भाषणे होतात, परिसंवाद रंगतात, पुस्तकांची चर्चा होते, कवी संमेलनांमधून कवी समुदायाचा पूर येतो, साहित्यिकांचा गौरव होतो. साहित्याच्या भवितव्यावर चिंता व्यक्त केली जाते. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी ठराव मांडले जातात. पण ज्या महाराष्ट्राच्या मातीतून हे साहित्य उगवते, त्याच मातीला तडे जात असताना साहित्यविश्वात किती अस्वस्थता दिसते?
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या, पाण्यासाठी होणारी वणवण, स्थलांतरित होणारी कुटुंबे आणि उद्ध्वस्त होणारे ग्रामीण जीवन या विषयांवर किती साहित्यिक सातत्याने लिहितात? किती संमेलनांमध्ये या प्रश्नांवर ठोस कृतीची चर्चा होते? किती साहित्यिक आपली लोकप्रियता आणि व्यासपीठ दुष्काळग्रस्तांच्या प्रश्नांसाठी वापरतात? हा खरोखरच संशोधनाचा विषय आहे.
दुष्काळावर भाषण करणे आणि दुष्काळाची वेदना जगणाऱ्या माणसाच्या बाजूने उभे राहणे, यात मोठा फरक असतो. साहित्यिकाने केवळ शब्दांची शेती करायची नसते; समाजाच्या वेदनांमध्येही त्याने सहभागी व्हायचे असते. अन्यथा साहित्य हे समाजाचे प्रतिबिंब न राहता केवळ साहित्यिकांच्या प्रतिष्ठेचे प्रदर्शन ठरू शकते.
दुसरीकडे, संमेलनासाठी शासनाकडून अधिकाधिक निधी कसा मिळवता येईल, आयोजन अधिक भव्य कसे करता येईल, पाहुण्यांची सरबराई कशी करावी, कार्यक्रमांचा दर्जा कसा वाढवावा, जेवणाचा मेन्यू काय असावा? श्रीखंड-पुरी, बासुंदी की पुरणपोळी असावी, यावर चर्चा होताना दिसते. या व्यवस्थापनाची गरज नाकारता येणार नाही. पण महाराष्ट्राच्या तिजोरीतून सांस्कृतिक उपक्रमांसाठी निधी मागताना त्याच महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांच्या तोंडाला पाणी लावण्यासाठी किती साहित्यिक पुढाकार घेतात? संमेलनाच्या व्यासपीठावरून शासनाला दुष्काळ निवारणासाठी ठोस प्रश्न विचारण्याची हिंमत किती जण दाखवतात?
शंभराव्या संमेलनाच्या निमित्ताने एक वेगळा विचार का होऊ नये? यंदा संमेलनासाठी राज्य सरकारने ५ कोटी रुपयांचे अनुदान जाहीर केले आहे. संमेलनाचा काही अनावश्यक खर्च कमी करून तो दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी वळवता येणार नाही का? संमेलन रद्द करणे हाच एकमेव पर्याय नाही; परंतु परिस्थिती गंभीर असेल, तर संमेलनाचे स्वरूप साधे करून जास्तीत जास्त निधी मदतकार्यासाठी वापरण्याचा प्रस्ताव साहित्यिकांनी स्वतःहून मांडायला हवा. शासनाकडून मिळणाऱ्या निधीचा विनियोग संबंधित नियमांनुसार आणि आवश्यक मंजुरी घेऊनच व्हायला हवा; मात्र अशा मदतीसाठी साहित्यविश्वाने एकत्रितपणे पुढाकार घेणे अशक्य नाही.
संमेलनाच्या मंडपात दुष्काळावर परिसंवाद घेण्यापलीकडेही काही करता येईल. दुष्काळग्रस्त भागांत साहित्यिकांची पथके पाठवता येतील. शेतकऱ्यांच्या व्यथा प्रत्यक्ष ऐकून त्यांचे दस्तऐवजीकरण करता येईल. ग्रामीण भागातील लेखकांना व्यासपीठ देता येईल. दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना पुस्तके, शैक्षणिक साहित्य आणि आवश्यक मदत उपलब्ध करून देण्यासाठी पारदर्शक उपक्रम राबवता येतील. साहित्य संमेलनाच्या नावाने जमा होणाऱ्या देणग्यांमधून कायदेशीर चौकटीत स्वतंत्र मदतनिधी उभारता येईल. म्हणजे साहित्याचा उत्सव समाजाच्या दुःखापासून तुटलेला राहणार नाही.
या सगळ्याचा अर्थ साहित्यिकांनी केवळ दुष्काळावरच लिहावे असा नाही. साहित्याचे विषय व्यापक असतात. प्रेम, निसर्ग, मानवी नातेसंबंध, राजकारण, तत्त्वज्ञान या साऱ्यांना साहित्यात स्थान आहे. पण समाजाच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असेल, तर त्या साहित्याच्या सामाजिक बांधिलकीची चिकित्सा झालीच पाहिजे.
शंभरावे साहित्य संमेलन हे केवळ शंभर संमेलनांचा उत्सव ठरू नये; ते मराठी साहित्याच्या सामाजिक उत्तरदायित्वाचा हिशेब देणारे संमेलन ठरावे. पुण्यातील व्यासपीठावरून मराठी भाषेच्या वैभवाची गाथा गायली जाईलच; पण त्याच वेळी दुष्काळाने होरपळलेल्या महाराष्ट्राचा आक्रोशही ऐकू आला पाहिजे.कारण साहित्यिकांची खरी श्रीमंती त्यांच्या पुस्तकांच्या संख्येत, पुरस्कारांच्या यादीत किंवा संमेलनाच्या भव्य मंडपात नसते. ती असते त्यांच्या संवेदनशीलतेत, त्यांच्या शब्दांच्या प्रामाणिकपणात आणि संकटात सापडलेल्या माणसाच्या बाजूने उभे राहण्याच्या धैर्यात.
महाराष्ट्रात पाणी आटत असताना साहित्यिकांच्या संवेदना आटता कामा नयेत. शेतकऱ्यांच्या शिवारात दुष्काळ असताना साहित्याच्या व्यासपीठावर मात्र केवळ उत्सवाची हिरवळ दिसत असेल, तर त्या साहित्याने ‘आम्ही समाजाचे साहित्यिक आहोत, की साहित्याच्या उत्सवाचेच?’ हा प्रश्न स्वतःलाच विचारण्याची वेळ आली आहे.
: मनीष चंद्रशेखर वाघ