विडियो न्यूज

वेब स्टोरी

वेब स्टोरी

ई-पेपर

लॉग इन करें

भावनांचा बाजार

मध्यंतरी वृत्तपत्रात एक बातमी प्रकाशित झाली होती, सॅन फ्रान्सिस्कोची. तिथल्या एका जंगलात २० ते ५० वयोगटातील महिलांचा एक छोटा समूह जमतो. त्या किंचाळतात, ओरडतात, जमिनीवर पाय आपटतात. एकीचा आरडाओरडा ऐकून दुसरीला तसंच करण्याची परवानगी मिळते. याला नाव दिलंय – ‘होली रेज रिट्रीट’. चार लाख रुपयांचं सात दिवसांचं पॅकेज!

ही बातमी वाचून पहिल्यांदा हसू आलं. पण नंतर अस्वस्थता येते. आपण अशा काळात आलो आहोत का, जिथे राग व्यक्त करण्यासाठीही पैसा मोजावा लागतो?

पूर्वी राग व्यक्त करणं ही नैसर्गिक क्रिया होती. अंगणात, शेतात, मैत्रिणींजवळ मोकळं रडणं, भांडणं व्हायचं. आता आपण सगळं आत दाबायला शिकलो आहोत. विशेषतः स्त्रिया. तू मुलगी आहेस, मोठ्याने बोलू नकोस. तू बायको आहेस, सहन कर. तू आई आहेस, रागवणं तुला शोभत नाही. वर्षानुवर्षे शिकवलेल्या या संयमाचा स्फोट आतमध्ये होतो. मग तो चिंता, नैराश्य, थकवा, आजारपणाच्या रूपात बाहेर येतो.

म्हणूनच या शिबिरात येणाऱ्या ८० टक्के महिला त्या आहेत ज्यांचा घटस्फोट झालाय, नोकरी गेलीय, आजारपणातून उठल्यात किंवा स्वतःच्या श्रद्धांबद्दल प्रश्न पडलाय. म्हणजे आयुष्याने जेव्हा सगळं हिरावून घेतलं, तेव्हा ओरडण्यासाठी जागा शोधावी लागते. इथे खरी सामाजिक समस्या उभी राहते.

एकीकडे आपण मानसिक आरोग्याबद्दल बोलतो, पण दुसरीकडे त्याचंही भांडवल करतो. जंगलात जाऊन ओरडणं ही थेरपी असू शकते, पण ती थेरपी ३.८२ लाखाला विकणं हा भावनांचा बाजार नाही का? सॅन फ्रान्सिस्कोमध्ये ३ तासांच्या सत्रासाठी ५१ हजार रुपये घेतले जातात. एकीकडे पोर्टलँडमध्ये हेच शिबिर २ लाखात मिळतं. हा दिलासा आहे की धंदा?

दुसरा मुद्दा, हा राग कोणाचा? २० ते ५० वयोगटातील महिलाच तिथे जास्त येतात. हीच ती पिढी आहे जी नोकरी, घर, मुलं, सोशल मीडियावरील परफेक्ट असण्याचा दबाव या सगळ्यात अडकली आहे. त्यांना राग येतोय नात्यांवर, राजकारणावर, जगण्यावर. पण तो राग व्यक्त करायला समाजात सुरक्षित जागा नाही. घरात बोललं तर ‘ड्रामा’ म्हणतात, ऑफिसात बोललं तर ‘अनप्रोफेशनल’ म्हणतात. मग जंगल हेच शेवटचं ठिकाण उरतं.

आपल्याकडेही हीच परिस्थिती वेगळ्या रूपात आहे. इथे जंगलात जाण्याची गरज नाही, पण व्हॉट्सअॅप ग्रुपवर भडास काढली जाते, अनोळखी लोकांसमोर रीलवर रडलं जातं. कारण जवळच्या माणसासमोर रडणंही आता महाग झालंय.

या शिबिरात एक चांगली गोष्ट आहे, तिथे आधी मानसिक तपासणी केली जाते, प्रत्येकीला वेळ दिला जातो, फोटोग्राफी नसते, १० जणींपेक्षा जास्त ग्रुप नसतो. म्हणजे खरंच ऐकलं जातं. कदाचित आजच्या काळात हेच दुर्मिळ झालंय.

प्रश्न आहे. आपल्याला राग व्यवस्थापित करायला शिकवायचं आहे की राग येऊच नये अशी व्यवस्था बदलावी? केवळ किंचाळून राग जाणार नाही, तर ज्या कारणांमुळे राग येतोय – अपमान, असमानता, एकटेपणा, सततची तुलना – ती कारणं दूर करावी लागतील. चार लाखाचं पॅकेज घेऊन जंगलात ओरडणं हा उपाय नाही, तर आपल्या आजाराचं लक्षण आहे.

समाज म्हणून आपण इतके असंवेदनशील झालो आहोत की माणसाला माणसासमोर मोकळं होता येत नाही आणि त्यासाठी त्याला जंगल शोधावं लागतं.

: मनीष चंद्रशेखर वाघ

Leave a Comment