विद्वेषाचा भस्मासुर उलटत आहे: कंगणा रणौत यांच्या ‘कानाखाली आवाज’ ही सुरुवात

दिनांक ६ जून २०२४च्या बातमीनुसार आपल्या वादग्रस्त आणि आक्रस्ताळ्या वक्तव्यांसाठी कुप्रसिद्ध असलेल्या नवनिर्वाचित भाजप खासदार दिल्लीला जाण्यासाठी चंदिगड विमानातळवर आल्या होत्या. तेव्हा महिला सीआयएसएफ जवान कुलविंदर कौर हिने कंगणा यांच्या कानाखाली आवाज काढला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्या महिला जवानाच्या विरुद्ध तक्रार झाल्यावर तिला निलंबित करण्यात आले आहे. तिला कदाचित नोकरीतून कमीही केले जाऊ शकते.
कुलविंदर कौरने कंगणा यांच्या कानफाडत का मारले याचे कारण दिले आहे. ते म्हणजे दिल्लीच्या शेतकरी आंदोलनात शंभर रुपये घेऊन शेतकरी बसत होते असे आंदोलक शेतकर्‍यांचा उपमर्द करणारे कंगणा यांनी केलेले वक्तव्य. या आंदोलनात कुलविंदरची आई देखील सामील झाली होती. कंगणा यांच्या वक्तव्यामुळे कुलविंदर संतप्त होती असे दिसते. आणि संधी मिळताच तिने कंगणा यांच्या कानाखाली आवाज काढून आपल्या संतापाला वाट करून दिली.
विविध माध्यमांमध्ये याबाबत उलट-सुलट प्रतिक्रिया येत आहेत. अनेक लोक कुलविंदरचे समर्थन करत आहेत, तिने केले ते योग्यच केले, कंगणा यांची तीच लायकी असे म्हणत आहेत. परंतु क्षीण का होईना, या हल्ल्याला विरोध करणारे आवाज पण उठत आहेत. हे कमी होते की काय, या घटनेनंतर कंगणा यांनी आपल्या लौकिकास जगून असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे की, पंजाबात दहशतवाद वाढत आहे.
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरफायदा घेऊन निर्बुद्धपणे केलेली कंगणा यांची वक्तव्ये अनेकदा धार्मिक विद्वेषास खतपाणी घालणारी, सामाजिक सलोखा बिघडवणारी असतात, संतापजनक असतात हे जगजाहीर आहे. परंतु अशी वक्तव्ये केली म्हणून त्यांना, किंवा अन्य कोणालाही मारहाण करणे योग्य आहे का? तर, अजिबात योग्य नाही. अशा मारणीचा निषेधच केला पाहिजे. पण त्याच बरोबर, आपल्या देशात अशी मारहाण हल्ली नित्याचीच का झाली याचा देखील विचार केला पाहिजे आणि अशी मनोवृत्ती मोडून काढली पाहिजे. मग प्रश्न असा आहे की ही अशी हिंसक मनोवृत्ती आपल्याकडे का रूजली आहे?
याचे उत्तर, गेल्या दशकात जाणीवपूर्वक पेरल्या गेलेल्या धार्मिक, सामाजिक, जातीय, राजकीय विद्वेषात मिळते. तसेच या विद्वेषातून, आपल्यापेक्षा वेगळा धर्म, जात, विचार असलेल्यास ठोकून काढणे, मारून टाकणे हा जसा काही राष्ट्रधर्मच झाल्याचे जाणवत आहे. मॉब लिंचिंग, लव्ह जिहाद हे शब्द याच काळात उदयास आले. गोमांसाच्या केवळ संशयावरून हत्या झाल्या. कोणीतरी दाढीवाला आहे म्हणून हत्या झाली. अल्पसंख्यांकांवर हल्ला करणार्‍यांना अभय मिळू लागले. अन्य धर्मीय महिलांवर बलात्कार केला म्हणून सत्कार होऊ लागले. धार्मिक उन्माद पराकोटीला पोहोचला. जय श्रीराम या घोषणेस धार्मिक सन्मानाचा, आदराचा आशय प्राप्त होण्याऐवजी धमकीचा, दहशतीचा आशय प्राप्त झाला. जेवढे धार्मिक ध्रुवीकरण होईल, अल्पसंख्यांक लोक ‘औकातीत’ राहतील तेवढे बरे असाच सत्ताधार्‍यांचा दृष्टीकोन राहिला. याने कोणाला राजकीय लाभ जरूर झाला असेल. परंतु विद्वेषाचा एक भस्मासुरच यातून निर्माण झाला. यामुळे विविधतेत एकता जपणार्‍या समाजाचा तानाबानाच विस्कटला. धार्मिक अल्पसंख्यांक बॅकफूट वर गेले. तरी, भारतात भेदभाव हा केवळ धार्मिक आधारवरच चालतो असे नाही. त्यास, जात, भाषा, राज्य, व्यवसाय असेही कंगोरे आहेत. त्यांमध्ये देखील हा विद्वेषाचा भस्मासुर झिरपला. त्याचाच परिणाम म्हणून कुलविंदर या शेतकर्‍याच्या कन्येने कंगणा यांच्या कानाखाली आवाज काढला. कुलविंदर आणि तिच्यासारखा विचार करणार्‍या लोकांच्या मनात आता हे खोलवर ठसले आहे की आपल्या विरुद्ध कोणी बोलला किंवा काही कृती केली की त्याच्या कानाखाली जाळ काढायचा. ते एवढे ठसले आहे की कुलविंदर हिला आपली नोकरी जाईल किंवा राहील याचीही काळजी वाटली नाही. अशा प्रकारे विद्वेषाचा भस्मासुर आता उलटू लागला आहे. त्यात कोण कोण भस्म होते हेच आता बघत बसावे लागणार आहे.
आज अनेक लोक कुलविंदरचे कौतुक करत असले तरी, तिच्यासारखा विचार सर्वांनीच केला आणि आपल्या विरोधकाच्या कानाखाली आवाज काढायला सुरुवात केली तर देशात अनागोंदी माजेल. देशात कायद्याचे राज्य शिल्लक राहणार नाही. कायद्यावरचा लोकांचा विश्वास उडेल. त्यातही कुलविंदर ही तर सुरक्षा जवान आहे. आपल्या देशाच्या एका पंतप्रधानांची हत्या त्यांच्या सुरक्षा रक्षकांनीच केली होती याचा विसर पडू देऊ नये. अशा भस्मासुरास पोसणे देशाला परवडणारे नाही. तो देशाच्या एकतेचा, अखंडतेचा, सामाजिक सद्भावाचा घास घेण्याआधीच त्याला आवर घातला पाहिजे. कायद्याचे राज्य स्थापित करून हे सध्या करता येईल. त्यासाठी सर्व पक्षांनी, जनतेने आपापसातील भेद विसरून एकत्र आले पाहिजे.
लेखक-उत्तम जोगदंड.

Leave a Comment

× How can I help you?