ज़िंदगी यूँ हुई बसर तन्हा
क़ाफ़िला साथ और सफ़र तन्हा
माणूस जन्माला एकटाच येतो आणि मरण पावल्यावर जातानाही एकटा जातो. जन्म आणि मृत्यू पर्यंतच जीवन व्यतीत करत असताना आईवडील,पती-पत्नी ,मुले, मित्र , मैत्रीणी यांचा त्याला सहवास लाभतो आणि हे सर्व त्याच्या सोबत ,बरोबर असल्याचे त्याला वाटत असते. पण खरंच ही मंडळी त्याच्या बरोबर असतात का? वेळ येते तेव्हा ते त्याला किती साथ देतात? कधीं कधी बायको, मुलगा, सून, घरदार हे सगळे असून नसल्यासारखे होते. तो आयुष्यभर कुटुंबासाठी खस्ता खातो पण दुर्धर प्रसंग ओढवला की कुणी कुणाचे नसते हेच खरे!
सतं एकनाथ आपल्या भारुडात म्हणतात,
“नाही कुणाचे कुणी, तुझे नव्हे रे कोणी |
अंती जाशील एकाला प्राण्या, माझे माझे म्हणोनी ॥”
तर “वाल्या कोळी”चा जीवनपट फार उद्बोधक आहे .रानात येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची तो त्याच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी लुटमार करे. जेव्हा त्याने आपल्या कुटुंबातील मंडळींना विचारले की आपण माझ्या पापाचा अर्धा वाटा घेणार का? त्यावेळी ‘तू करत असलेल्या पापात आम्ही भागिदार का व्हायचे?’ असे म्हणत सर्वांनी वाल्याला नकार दिला. या प्रसंगातून बोध घेऊन वाल्या कोळीने आत्मचिंतन व तपस्या केली आणि रामायणासारखं सुंदर महाकाव्य जन्माला घातले.वाल्याचा , “वाल्मिकी” ऋषी झाला. सगळ्यांनाच प्रसंगातून सावरता येते असे नाही. पण मथितार्थ असा की प्रसंगी आपटी खाण्याची वेळ बहुतांश माणसांच्या जीवनात येत असते.त्यावेळी माणसाला आपण एकटं असल्याची जाणीव प्रकर्षाने होते.
तेराव्या शतकातील प्रसिद्ध कवी रुमी म्हणतो, “It’s your road, and yours alone, others may walk it with you,but no one can walk it for you.”
आयूष्याच्या मार्गावर दुसरे तुमच्याबरोबर चालत असतील पण ते तुमच्यासाठी चालणार नाहीत.जीवन नौका तुमची तुम्हाला पार करायची आहे..एक लक्षात ठेवावे जीवनात आलेले लोक म्हणजे आपली मालमत्ता नव्हे की ज्यावर आपला मालकी हक्क असेल.त्यांच्यावर आपले नियंत्रण कदापिही नसते.त्यांच्या सहवासाचा, साथीचा आनंद घेऊन सुंदर क्षणांची सोबत करत जीवनाचा मार्ग चालत राहावे. लोक तुमचे नसतात, तुम्ही एकटे असता आणि अनुभव हाच तुमचा खरा साथीदार व साक्षीदार असतो.
चालताना सोबतीला
माणसांचा तांडा होता
पण वेळ येता माझी
साथ द्याया कोण होता?
: मोरेश्वर बागडे