उनको तोहफे में एक आईना दीजिए

वह जो सूरत पर सबकी हंसते हैं,
उनको तोहफे में एक आईना दीजिए

श्रीमद्भगवद्गीता सांगते, जो सर्व मानवजातीशी एकसमान पद्धतीने त्यांच्या सुखदुःखाची तुलना आपल्याशी करत वर्तन ठेवतो तो खरा विवेकवान पुरुष होय. पण असे विवेकीपुरूष या जगात किती सापडतात?
सर्रास इतरांना नावे ठेवण्याची रीत सर्वव्यापी आहे. आपल्या गुणदोषांचे परीक्षण कोणीही करत नाही.सर्वसाधारणपणे असे म्हटले जाते की, ज्यावेळी आपण दुसऱ्याकडे एक बोट दाखवतो त्यावेळी चार बोटे आपल्याकडे वळलेली असतात. प्रत्येकाला स्वतःचे दुर्गुण दिसून येत नाहीत.प्रत्येकाला वाटत असते ,मी करतो तेच योग्य आहे.
या पृथ्वीतलावरील कोणताही मानव परिपूर्ण नाही.जन्माला आलेल्या माणसामध्ये काहीना काही तृटी ,दोष असतातच. त्या तृटी किंवा दोष हे स्वभाव,सवयी,आचार विचार,वागणे ,बोलणे व अगदी दिसण्यापर्यंत असू शकतात. असे असताना नावे ठेवण्याचा अधिकार कोणा एकाला कसा मिळू शकतो? नाही का? या जगात वावरताना आपण पाहतो बरीच मंडळी दुसऱ्यांची उणीदुणी काढत असतात. जणू काही ती उणीदुणी त्यांच्या ठायी अजिबात नाहीत किंवा असली तरी त्याबाबत त्यांना त्याचे काहीच देणेघेणे नसते. ‘कुणी निंदा वा कुणी वंदा हाच आमचा धंदा ‘या वृत्तीने त्यांचे व्यवहार चालू असतात.कोण कोणाच्या शारीरिक व्यंगा विषयी,तर कोण कोणाच्या सांपत्तिक , कौटुंबिक परिस्थितीवर, खाजगी जीवनाबद्दल फूका भाष्य करत असतो.
या संसार रूपी विश्वात प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या परिस्थितीतून गेलेला असतो.कोणतीही गोष्ट किंवा परिस्थिती या जगात कायम नाही. क्षणार्धात माणूस रंकाचा राव होतो आणि रावाचा रंक होतो. ज्या परिस्थितीवर तुम्ही लोकांचे हसे करताय ती परिस्थिती तुमच्यावर येऊ शकते ,नव्हे येतेही. आपल्यातील अवगुणांचं,दोषांचे आत्मपरीक्षण न करता आपण दुसऱ्यांच्या अवगुणांविषयी दोषांविषयी भरभरून बोलतो. बैठकीतून माणूस निघून गेल्यावर त्याची पाठ फिरताच आपण त्या माणसाविषयी काहीबाही बोलायला लागतो. “निंदकाचे घर असावे शेजारी” हे जगतगुरू संत तुकाराम सांगून गेले आहेत हे खरे आहे.पण त्याचा अर्थ असा आहे की निंदा करण्याची पात्रता देखील निंदकाकडे असायला हवी. निंदा म्हणजे शिव्या,नालस्ती नव्हे.
खुलेआम नशापान करणाऱ्या माणसाने दुसऱ्या व्यसनाधीन माणसाला नावे ठेवावी असा प्रकार नको .अवगुणांचे निरीक्षण करून जो आपल्यात सुधारणा घडवून आणण्याच्या दृष्टीने आपली निंदा करतो असा निंदक शेजारी असावा. निंदा म्हणजे गुणदोषांची निंदनी करून दोषांवर बोट ठेवणे..उठसूठ टवाळकी,चेष्टा करून तुमचे हसे करणारा निंदक काय कामाचा? म्हणून निंदकाचे घर असावे शेजारी या वचनाला जोडून पुढे म्हटले जाते, “निंदा जोडियते नाते,चेष्टा तोडियेते बंध ”
वास्तविक प्रत्येक माणसाने दुसऱ्यावर टीकाटिप्पणी करताना ते दोष किंवा तृटी आपल्यामध्ये तर नाहीत ना? याचा विचार करून टीकाटिप्पणी करायला हवी.पण असे क्वचितच घडते म्हणून अशा माणसाला आरसा दाखवण्याची वेळ समाजावर निंदकाच्या भूमिकेतून येते.निंदक म्हणजे आरसा.या आरश्यात समाज त्या माणसाचे गुणदोष दाखवत त्या माणसाचा खरा चेहरा त्याला दाखवुन देतो.

शोधी उणिवा नेहमी
हसे सदा इतरांना
कुणीतरी धरावा हो
तया समोर आयना

लेखन: मोरेश्वर बागडे

Leave a Comment

× How can I help you?