प्रोजेक्ट आत्मनिर्भर क्रांतीकारी ठरणार – संदीप माळवी

अंध, मूकबधिर व दिव्यांग व्यक्तींनी बनवलेल्या छत्र्यांची विक्री सुरु

ठाणे, दि. २५ – रस्त्यावर निर्वासितांसारखे जगणाऱ्या समूहाला प्रतिष्ठा देण्याचे काम प्रोजेक्ट आत्मनिर्भरच्या माध्यमातून होईल. सिग्नल शाळेचे हे पाऊल भविष्यात क्रांतिकारी ठरणार, असा आत्मविश्वास ठाणे महापालिका अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी येथे व्यक्त केला. समर्थ भारत व्यासपीठ संचलित सिग्नल शाळेच्या प्रोजेक्ट आत्मनिर्भर प्रकल्पाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.
उदरनिर्वाहाचा शोध घेत शहराकडे झेपावलेले लाखो कुटुंब निर्वासितांचे जगणे जगतात. त्यांच्या पुनर्वसनासाठी व्यापक प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. सिग्नल शाळेच्या माध्यमातून निर्वासित कुटुंबातील मुलांचे शिक्षण मार्गी लागत असताना त्यांच्या पालकांच्या सक्षमीकरणासाठी राबविण्यात येत असलेला सिग्नल शाळा पालक प्रोजेक्ट आत्मनिर्भर भविष्यात क्रांतिकारी ठरेल. प्रशासन म्हणून यांना सर्वतोपरी मदत करण्याची आमची भूमिका असेल असे आश्वासन अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी यावेळी केले.
जिल्हा न्यायाधीश सोनल शहा, ऍड. ईश्वर सूर्यवंशी,  ऍड. प्रदीप टिल्लू, समर्थ भारत व्यासपीठाचे संचालक उल्हास कार्ले आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
ठाण्यातील विविध सिग्नलवर वस्तू विकून चरितार्थ चलविणाऱ्या कुटुंबांना दर्जेदार उत्पादने उपलब्ध करून आर्थिक सक्षम करण्यासाठी प्रोजेक्ट आत्मनिर्भर सुरू करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात द नॅशनल असोसिएशन ऑफ डिसेबल्ड इंटरप्राइजेसच्या अंध, मूकबधिर व दिव्यांग व्यक्तींनी बनवलेल्या निर्यातक्षम गुणवत्तेच्या छत्र्या उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. याचसोबत विक्री करणाऱ्या कुटुंबांचे प्रशिक्षण करून त्यांना ड्रेसकोड देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे.

Leave a Comment

× How can I help you?