अवघ्या काही तासांंमध्ये गेम फिरला, लोकसभा अध्यक्षांची निवड बिनविरोध होणार?

लोकसभा अध्यक्षपदासाठी बुधवारी होणाऱ्या निवडणुकीपूर्वी नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे.

लोकसभा अध्यक्षपदासाठी बुधवारी (26 जून) निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी सत्तारुढ NDA कडून मागील लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना उमेदवारी देण्यात आलीय. तर विरोधकांच्या ‘इंडिया आघाडी’ चे काँग्रेस खासदार के. सुरेश रिंगणात आहेत. सुरेश यांनी अध्यक्षपदासाठी शेवटच्या क्षणी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे निवडणूक होणार असं स्पष्ट झालं होतं. पण,  या निवडणुकीत नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे.

इंडिया आघाडीचे उमेदवार के. सुरेश त्यांचा अर्ज मागे घेणार असून ओम बिर्ला यांची निवड बिनविरोध होईल, अशी माहिती ‘NDTV मराठी’ ला सूत्रांनी दिली आहे. लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक बुधवारी सकाळी 11 वाजता होणार आहे. त्यापूर्वी सुरेश अर्ज मागे घेतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. इंडिया आघाडीतील वेगवेगळ्या पक्षांचे सुमारे 7 खासदार मतदानाला उपस्थित राहणार नाहीत. त्यामुळे आधीच कमी असलेलं विरोधकांचं संख्याबळ आणखी कमी होणार आहे. त्यामुळे सुरेश माघार घेणार असल्याचं समजतंय.

18 व्या लोकसभेत NDA कडं स्पष्ट बहुमत आहेत.  वायएसआर काँग्रेसनंही बिर्ला यांना पाठिंबा जाहीर केलाय. आंध्र प्रदेशातील या पक्षाचे लोकसभेत चार खासदार आहेत. सत्तारुढ आघाडीचं वाढलेलं बळ आणि विरोधकांचे अनेक खासदार दिल्लीत नसल्यानं सुरेश ऐनवेळी अर्ज मागे घेतील, असं मानलं जातंय.

Leave a Comment

× How can I help you?