‘पप्पू’ ते सक्षम विरोधी पक्षनेता
मोदी सरकारने ज्यांना सदैव ‘पपू्’ म्हणून चिडवलं, ज्यांच्यावर अनेक आरोप केले, ज्यांच्यामागे चौकशा लावल्या, बेइज्जत करून घराबाहेर काढलं तेच राहूल गांधी आज संसदेत मोदी सरकारसमोर सक्षम विरोधी पक्षनेते म्हणून उभे आहेत. काळाचा महिमा अगाध असतो हेच खरे. अगदी काही दिवसांपुर्वीच गोदी मिडिया टोळीतील एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत ‘कोण राहूल गांधी?’ असा कुत्सित प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विचारला होता..राहूल गांधी कोण आहेत याची ओळख आता नरेंद्रजींना हळूहळू होत जाईल.
वयानं नरेंद्र मोदी नक्कीच ज्येष्ठ आहेत. परंतु लोकसभा सदस्य म्हणून राहूल गांधी हे नरेंद्र मोदी यांना सिनियर आहेत. त्यांनी अमेठी लोकसभा मतदारसंघातून 2004, 2009 व 2014 मध्ये निवडणूक लढवली व ते जिंकले. 2019 मध्ये त्यांचा अमेठीत पराजय झाला, परंतु ते वायनाडमधून निवडून आले. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत वायनाड व रायबरेली या दोन्ही लोकसभा मतदारसंघांतून ते निवडून आले आहेत. नरेंद्र मोदी 2014 ला पहिल्यांदा लोकसभा सदस्य झाले. राहूल गांधी त्या अगोदरच सभागृहाचे सदस्य झालेले आहेत. तरीही कोण राहूल गांधी? ही अहंकाराची भाषा? आज ‘विरोधी पक्षनेता’ या नात्याने राहूल गांधींना हात धरून स्पिकर ओमप्रकाश बिर्ला यांच्या खुर्चीपर्यंत न्यावं लागलं, ही भारतीय लोकशाहीची खरी ताकद!
राहुल गांधी यांच्या भूमिकेत सातत्य नाही. ते अचानक देश सोडून विदेशात जातात. ते राजकारणाविषयी फारसे गंभीर नाहीत. ते पक्षातील ज्येष्ठांचा मानसन्मान ठेवत नाहीत, असे आरोप त्यांच्यावर याआधी झाले. तथापि भारत जोडो पदयात्रा, न्याय यात्रा यानंतर राहुल गांधी हे कमालीचे बदलले आहेत. सुडाच्या, विद्वेषाच्या उन्मादी राजकारणावर ते प्रेम, बंधुभाव, सद्भावनेचा उतारा देऊ लागले आहेत. त्यांची भाषणेही आता मुद्देसूद व प्रभावी ठरू लागली असून त्यांच्या भाषणाला अधिक धार आली आहे. ते आता ‘मन की’ नव्हे, तर ‘जन की बात’ करू लागले आहेत. जनमानसाची नस त्यांना उमगली आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून मान्यता मिळाल्यानंतर आपल्या पहिल्याच भाषणातून त्यांनी देशातील गरीब, दलित, आदिवासी, मागासवर्गीय, शेतकरी, कामगार, तरुणवर्गाचा आपण आवाज बनणार असल्याचे जाहीर केले आहे. राज्यघटनेवरील प्रत्येक हल्ला आपण परतवून लावणार आहोत, असे ठणकावून सांगत त्यांनी मणिपूरच्या वेदनादायी घडामोडीविषयी नाराजी व्यक्त केली आहे.
लोकसभेतील विरोधी पक्षनेता म्हणून राहुल गांधी यांना आता अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. मुख्य निवडणूक आयुक्त, सीबीआय, ईडीचे संचालक, लोकपाल, मुख्य दक्षता अधिकारी, राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष नेमताना आता राहुल गांधी यांचेही मत केंद्र सरकारला विचारात घ्यावे लागणार आहे. त्यांना कॅबिनेट मंत्र्यांचा दर्जा आहे. लोकसभा सभागृहातील आसन व्यवस्थेत त्यांना पहिल्या रांगेत स्थान व संसदीय प्रथा परंपरांमध्येसुद्धा मानाचे पान मिळाले आहे. त्यांना अल्पसंख्यांकांच्या न्याय हक्काचे संरक्षण करावे लागणार आहे. त्याचबरोबर सत्ताधायांना त्यांच्या कर्तव्य व जबाबदारीची जाणीव वेळोवेळी करून द्यावी लागणार आहे. त्यातच त्यांच्या नेतृत्वगुणाची कसोटी लागणार आहे.
18व्या लोकसभेतील विरोधी पक्षाचे नवे नेते राहुल गांधी यांच्याकडे कॅबिनेट मंत्रिपदासारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱया आहेत. त्यांच्या भूमिकेत सरकारी धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे, महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चेची मागणी करणे आणि परराष्ट्र संबंध आणि संरक्षणविषयक बाबींवर पंतप्रधानांचा संभाव्य सल्ला घेणे यांचा समावेश आहे. या भूमिकेत गांधींना त्यांचे शब्द आणि कृती काळजीपूर्वक मोजावी लागेल. सरकारी उत्तरदायित्व राखण्यासाठी त्याचे महत्त्व अधोरेखित करून हे पद वैधानिक मान्यतेसह येते. सरकारची जबाबदारी सुनिश्चित करण्यासाठी आणि भारताच्या राजकीय परिदृश्यात संभाव्य बदलाचे संकेत देणाया लोकशाही वादाला चालना देण्यासाठी राहुल गांधींचे नेतृत्व आवश्यक असेल.
विरोधी पक्षाचे प्रवत्ते म्हणून काम करणे, जनतेला आणि प्रसारमाध्यमांना त्यांचे विचार आणि राष्ट्रीय समस्यांबद्दल माहिती देण्याबरोबरच, तो जनतेचा आवाज बनतो आणि सरकार नेहमी त्यांच्या कृतींसाठी जबाबदार राहते याची खात्री देतो, जनतेला पर्यायी दृष्टिकोन प्रदान करतो. आणि धोरणे प्रदान करावीत. विरोधी पक्षनेते म्हणून डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यक्षमतेशी सगळेच परिचित आहेत. आज जेव्हा पुन्हा शक्यता निर्माण झाल्या आहेत, तेव्हा जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारताच्या संसदीय विरोधी पक्षाची गमावलेली ताकद पुन्हा जिवंत करण्याचा आणि बळकट करण्याचा विचार का करत नाही? विरोधी पक्षनेत्याच्या विचारांना ठोस स्वरूप दिल्यास लोकशाहीचा पाया नक्कीच मजबूत होईल. या भूमिकेला आता नक्कीच न्याय मिळेल. कारण राहुल गांधी यांच्या रूपाने भारतीय लोकशाहीला पुन्हा एकदा सक्षम विरोधी नेता लाभला आहे.
: मनीष चंद्रशेखर वाघ