विधानपरिषद निवडणूक : मुंबईत उद्धवसेनेची सरशी; शिंदेंची डोकेदुखी वाढणार

विधानपरिषद निवडणूक; मुंबईत उद्धवसेनेची सरशी;
शिंदेंची डोकेदुखी वाढणार

विधानपरिषदेच्या चारपैकी मुंबईतील दोन जागांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार विजयी झाले आहेत. मुंबईतील पदवीधर निवडणुकीत अनिल परब यांनी बाजी मारली. त्यांनी भाजपाच्या किरण शेलार यांचा पराभव केला. तर मुंबईतील शिक्षक मतदारसंघात ज.मो. अभ्यंकर विजयी झाले आहेत.
उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय असलेले माजी मंत्री अनिल परब यांनी किरण शेलार यांचा 26 हजार 12 मतांनी पराभव केला. परब यांना 44 हजार 784 तर शेलार यांना 18 हजार 772 मतं मिळाली. हा विजय शिवसेनेचा, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा आहे, अशी प्रतिक्रिया अनिल परब यांनी विजयानंतर व्यक्त केली. मुंबईत शिवसेना आहे. ही शिवसेना उद्धव ठाकरेंची आहे, असं परब यांनी स्पष्ट केलं.
या विजयाने उद्धव ठाकरे आणि सहकाऱयांचे मनोबल उंचावले असून, खरी शिवसेना ही उद्धव ठाकरे यांचीच असल्याचे बोलले जात आहे.
2022 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बंडखोरीमुळे शिवसेनेत फूट पडली. काही महिन्यांनंतर, एकनाथ शिंदे गटाकडून ‘शिवसेना’ हे नाव आणि पक्षाचे ‘धनुष्य-बाण’ हे चिन्ह कायम राहील, असा निर्णय निवडणूक आयोगाने दिल्याने उद्धव ठाकरेंनी पक्षाचे नाव आणि चिन्ह गमावले. अशा परिस्थिती लोकसभा निवडणुकीत ठाकरे सेनेनी लक्षणीय विजय संपादन केल्यामुळे, शिंदे गटात चिंतेचे वातावरण पसरले होते. आता विधान परिषदेच्या या निकालाने शिंदे गटाची डोकेदुखी नक्कीच वाढेल, असे राजकीय विश्लेषक म्हणू लागले आहेत.
अनिल परब यांचा विजय शिवसेना ठाकरे गटासाठी पदवीधर मतदारसंघातील वर्चस्वासाठी गरजेचा होता. तसेच या विजयाने कार्यकर्त्यांचेही विधानसभेसाठी मनोबल वाढले असणार. शिवाय विधानपरिषदेमध्ये अनिल परब यांचे असणे ठाकरे गटासाठी महत्त्वाचे आहे. आजच्या निकालाने उद्धव सेना आता नव्या जोमाने आणि उत्साहाने विधानसभेला सामोरी जाईल, हे निश्चित.

Leave a Comment

× How can I help you?