अजितदादांच्या बंडाचं एक वर्ष…
काय मिळवलं? काय गमावलं??
2 जुलै 2023… रविवारची दुपार… विरोधी पक्षनेत्याच्या बंगल्यातून गाड्यांचा ताफा सुसाट निघाला आणि राजभवनात पोहोचला. अजितदादांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीविरोधात बंड केलं, दादा विरोधी पक्षनेतेपदावरून थेट राज्याचे उपमुख्यमंत्री झाले… त्यांच्यासोबत शरद पवारांची साथ सोडून आठ मंत्री सत्तेच्या बाकावर बसले…
एकनाथ शिंदे यांना बंड करण्यासाठी राज्याची सीमा ओलांडत गुवाहटी, आसाम असा प्रवास करावा लागला होता. दादांनी मात्र शांतपणे महाराष्ट्राच्या राजधानी मुंबईत, रविवारच्या दुपारी, मिडीया आणि महाराष्ट्र निवांत असताना आपल्या बंडाचा मुहुर्त साधला आणि सत्तेत सामिल झाले.
दादांनी बंड करून एक वर्ष व्हायच्या आतच लोकसभेच्या निवडणुका झाल्या. दादांनी हट्टाला पेटून आपली पत्नी सुनेत्रा पवार यांना आपली बहिण सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उभे केले. पण त्यांच्या पदरात दारुण पराभवाशिवाय काहीच पडलं नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म झाला तेव्हापासून तो पक्ष आणि सत्ता हातात हात घालूनच फिरत होते. दादा तर तब्बल पंचवीस वर्षे आमदार राहिले. अनेक मंत्रीपदं उपभोगली. मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पाहत उपमुख्यमंत्री पदही भोगलं. २०१४ नंतर केवळ पाच वर्षेच दादा सत्तेबाहेर राहिले. पण २०१९ मध्ये मात्र सत्तेच्या बाहेर राहायचेच नाही, असा दादांनी जणू चंगच बांधला. पहाटेचा शपथविधी करून दादा भाजपसोबत गेले. पण दादांचा प्रयत्न फसला आणि ते शरद पवारांकडे परत आले. मग पवारांनी त्यांच्या सगळ्या चुका पोटात घातल्या. डोक्यावर उपमुख्यमंत्रिपदाचा मुकुट ठेवला आणि शिवसेना काँग्रेससोबत अलगद सत्तेत नेऊन बसवलं.
सत्ता कुणासोबत यापेक्षा सत्ता हेच दादांसाठी जास्त महत्वाचं असावं. त्यामुळे उद्धव ठाकरेंसारख्या विधिमंडळातल्या नवख्या जणांसोबतसुद्धा दादा रमले. पण शिंदेंचं बंड झालं. सरकार बदललं आणि दादा पुन्हा विरोधात आले. आता सत्तेत जायचं तर पुन्हा एकदा भाजपचं बोट धरणं गरजेचं होतं. दादांनी मग फार मागेपुढे पाहिलं नाही. त्यांनी पुन्हा भाजपशी हातमिळवणी केली आणि पुन्हा एकदा ते राज्याचे उपमुख्यमंत्री झाले.
बंड केल्यानंतर अजित पवारांना अशी एक गोष्ट साध्य झाली. जी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत अजित पवारांना कधीही मिळू शकलेली नाही. आणि ती म्हणजे दिल्लीतील सत्ताधारी केंद्रीय नेतृत्वाशी थेट संबंध. आपल्या राजकीय कारकिर्दीत सुरुवातीचा एखादा अपवाद वगळता अजित पवार कधीही केंद्राच्या वाटेला फारसे गेले नाहीत. आपण बरे, आपला पक्ष बरा आणि आपली राज्यातली सत्ता बरी अशीच अजित पवार यांची भूमिका राहिली.
२०१४ पासून केंद्रात भाजपची सत्ता आली आणि केंद्र सरकार नरेंद्र मोदी आणि अमित शहा या दोन नावांभोवती फिरू लागली. बंडानंतर आणि पक्षाचं नाव चिन्ह मिळाल्यावर अजित पवार पक्षांचे सर्वेसर्वा बनले. प्रफुल्ल पटेल यांच्याव्यतिरिक्त अजित पवारांचा एकही शिलेदार केंद्रात अनुभवी नव्हता. त्यामुळे पक्षाच्या पातळीवरील सगळ्याच चर्चा या अजित पवार आणि मोदी-शहांमध्ये होऊ लागल्या.
दिल्लीश्वरांकडे दादांचं ‘वजन’ वाढलं तरी लोकसभेतली पत मात्र गेली. ज्यावेळी दादांनी बंड केलं तेव्हा पक्षाचे पाच खासदार त्यांच्यासोबत होते. पण बंडानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या ‘खऱया’ राष्ट्रवादीचा केवळ एकच खासदार सुनिल तटकरे यांच्या रूपाने निवडून गेला. एकीकडे लोकसभेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं संख्याबळ एक इतकंच राहिलं. तर दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे तब्बल आठ खासदार संसदेत पोहोचले. हा दादांसाठी मोठा धक्काच आहे.
आता विधानसभेच्या निवडणुकात जवळ आल्या आहेत. महायुतीत जागांची देवाणघेवाण सुरू असताना दादांच्या राष्ट्रवादीतल्या पाच आमदारांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची खुलेपणे विधान भवनात भेट घेऊन चर्चा केली. त्यामुळे अजित पवार गटाचे हे आमदार पुन्हा शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. या पाच आमदारांपैकी एक जण सातारा येथील असून अन्य आमदार पुणे. आणि अहमदनगर येथील आहेत. त्यांनी जयंत पाटील यांची विधान भवनातच भेट घेतली आहे. विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना अशी जाहीर चर्चा करण्यात आल्याने दोन्ही गटामधील कार्यकर्ते चक्रावून गेले आहेत. आमदारांच्या बाबतीत अशी चर्चा असताना अजितदादांचे दुसरे बलस्थान पिंपरी चिंडवडमधल्या 16 माजी नगरसेवकांनीही शरद पवार यांच्याशी प्रत्यक्ष भेट घेतली आहे. यासोबतच अजित पवारांसोबत गेलेले अनेक नेते, लोकप्रतिनिधी शरद पवार यांच्या संपर्कात असून त्यांची घरवापसी होऊ शकते, असं बोललं जात आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर लगेचच घेतलेल्या आमदारांच्या बैठकीला अजितदादांचे चार ते पाच आमदार गैरहजर राहिले. यामध्ये नरहरी झिरवळ यांचा समावेश होता. पुढच्या काहीच दिवसांत नाशिक पदवीधरच्या निवडणुकीत झिरवळांनी उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. लोकसभा निवडणुकीदरम्यानसुद्धा पारनेरचे आमदार निलेश लंकेंनी अजित पवारांची साथ सोडून शरद पवारांच्या पक्षाकडून निवडणूक लढवली आणि निवडूनही आले. सुप्रिया सुळे निवडून आल्यावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या दहा ते बारा आमदारांनी त्यांचं अभिनंदन केल्याची चर्चा रंगली. त्यामुळे एकीकडे ‘खऱया’ राष्ट्रवादीतलं इनकमिंग जवळपास थांबलंय, तर दुसरीकडे जवळचे आमदार, नगरसेवक, पदाधिकारी परत शरद पवार गटाकडे जाण्याची भाषा बोलू लागले आहेत. एकूणच अजित पवार यांच्या ‘खऱया’ राष्ट्रवादीला एका वर्षातच गळती लागताना दिसत असून केवळ अजितदादांचेच नव्हे तर त्यांच्या पक्षाचेही काही खरे नाही, हेच खरे!
राजकीय विश्लेषण : मनीष चंद्रशेखर वाघ