डोंबिवली : पुण्यातील ‘पोर्शे’ प्रकारानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सर्व अवैध बार, हुक्का सेंटर बंद करायचे आदेश दिले आणि राज्यभर या अवैध आस्थापनांवर कारवाईचा एकच सपाट सुरु झाला. अनेक ठिकाणी तरअधिकाऱ्यांना आपली ‘खुन्नस’ काढण्याची संधी या आदेशाने दिले. अनेक ठिकाणी कारवाई पथके माघारी फिरताच ते धंदे पुन्हा सुरु झाले. असाच एक प्रकार डोंबिवलीत घडला आहे. डोंबिवली स्टेशन परिसरात असणाऱ्या वाईन शॉप बाहेरच ओपन बार सुरु असून, इथे खुलेआम तरुण मंडळी दारू पीत बसतात. येथून हाकेच्या अंतरावरच पोलीस स्टेशन आहे. पण पोलिसांना खिशात घेऊन फिरणाऱ्या या बारवाल्यांना काहीच भीती नाही. त्यामुळे आता दाद तरी कोणाकडे मागायची असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या आयुक्त इंदूराणी जाखड, पोलीस उपायुक्त सचिन गुजांळ यांनी कल्याण डोंबिवली शहरातील अवैध बार, डान्स बार, ढाबे, टपऱ्यांवर कारवाई सुरु केली. अनेक ढाबे, डान्सबार, टपऱ्या महापालिकेने पोलिस बंदोबस्तात जमीनदोस्त केल्या आहेत. अवैध कृत्य रोखण्यासाठी पोलिस आणि महापालिकेकडून मुख्यमत्र्यांच्या आदेशानंतर कारवाई सुरु झाली . असे असले तरी शहरात अनेक ठिकाणी आजही अवैध गोष्टी सर्रास सुरू आहेत. वाईन शॉपच्या बाजूलाच दारुचा ग्लास भरुन उघड्यावर मद्यपान करण्याचे प्रकार सुरू आहेत. काहींचे तर भर रस्त्यात मद्यपान सुरु असते. याचा त्रास नागरीकांना होतो. महिला, लहान मुलं हे दृश्य उघड्या डोळ्यांनी पाहत असतात. काही मद्यपी छेडछाडही करतात.
डोंबिवली स्टेशन परिसरात वाईन शॉप आहेत. तीथे मद्यपी दररोज वाईन शॉप बाहेरच दारू पित बसलेले आढळून येता. या विरोधात तक्राही करण्यात आली. त्यानंतर रामनगर पोलिस आणि केडीएमसीच्या सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी त्याठिकाणी धाव घेतली. पोलिसांनी मद्यपींना पिटाळून लावले होते. ज्या ठिकाणी हे मद्यपी दारु पितात, ते कट्टे ही जमीनदोस्त केले. मात्र तरीही हे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे यामद्य पिणाऱ्यांना तिथे मद्य पिण्यास अटकाव करण्याची जबाबदारी नक्की कोणाची हा प्रश्न निर्माण झाला आहे. रामनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार होत आहे. काही महिन्यापूर्वी या पोलिस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर काही तरुण हुक्का पित असल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या घटनेतून पोलिसांनी धडा घेतला नाही. त्यामुळेच मद्यपीचे धाडस वाढले आहे. यावर ठोस कारवाई कधी केली जाणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.