नवोदित लेखकाने तंत्रस्नेही बनावे – शुभांगी पासेबंद
ठाणे : नवोदित लेखकाने तंत्रस्नेही बनावे. कुणावरही अवलंबून न राहता आपले लेखन स्वतः टाईप करून पुढे पाठवता आले पाहिजे, इतके सक्षम व्हा, असा सल्ला ज्येष्ठ लेखिका शुभांगी पासेबंद यांनी दिला. नौपाडा वाचक कट्ट्याच्या ‘ सलाम साहित्यिक’ या उपक्रमात त्या बोलत होत्या. ज्येष्ठ लेखिका डॉ. अंजुषा पाटील यांनीअनेक प्रश्न विचारून त्यांचा लेखन प्रवास जाणून घेतला.
लेखिका शुभांगी ताई पासेबंद या दररोज लेखन करतात. त्यांचे लेख लोकसत्ता, जीवनदीप वार्ता, वृत्त प्रकाश, जनादेश यासारख्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध होतात.
शुभांगीपासेबंद यांची ललित लेखन, कथासंग्रह, कादंबरी, स्तंभलेखन, ऑडिओ, इ बुक, इंग्रजीमध्ये दोन पुस्तक,ब्रेल लिपीतील काव्यसंग्रह अशी पन्नास पुस्तके आजवर प्रकाशित झाली आहेत. समाजात घडणाऱ्या घडामोडी, भेटलेल्या व्यक्ती, अनुभवलेले प्रसंग याच्या आधारावर लेखन करून त्याचे एकत्रितपणे पुस्तक बनवतात. त्या पुस्तकांना ‘या सुखांनो या’, ‘तुझेच गीत गात आहे’, ‘परीकथेतील राजकुमारा’ , ‘ही वाट दूर जाते’, ‘स्वप्नातल्या कळ्यांनो’, ‘गावाकडची माती’, ‘डाव मांडून भांडून मोडू नको’, ‘कुठे शोधिसी रामेश्वरअन’ यासारखी गाण्यांची शीर्षक त्या आपल्या पुस्तकाला देतात. त्यामुळे वाचकांना त्यांचे लेखन आवडते.
स्त्रियांच्या वेदना, समाजातील विषमता, परदेशी गेलेल्या मुलांची मानसिकता, अंध अपंगाविषयी कणव, महागाई, आर्थिक व्यवहार या विषयांच्या भावना त्यांच्या लेखनातून दिसून येतात.
लेखिका शुभांगी ताई पासेबंद यांनी सेंट्रल बँक ऑफ इंडिया या बँकेतून सेवानिवृत्ती घेऊन लेखनाचा छंद जोपासला. आहे. ‘मयूर मासा’ ही पहिली कादंबरी महाराष्ट्र संस्कृती मंडळाने प्रकाशित केली. तर पन्नासावी कादंबरी ‘गावाकडची माती’ ही नवल प्रकाशनने प्रसिद्ध केली. त्यांच्या पुस्तकाला गाण्यांच्या नावाची शीर्षकं दिलेली आहेत हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. लेखन आणि वाचनाचा छंद जोपासून समाजातील दिसणाऱ्या समस्या, व्यक्तिरेखा यांच चित्रण ते आपल्या लेखनातून करतात.
सदर मुलाखत ऐकण्यासाठी कट्ट्याचे सदस्य, समाजातील अनेक लेखक, गायक वृंद, कलाकार, पत्रकार, यासारखे दर्दी श्रोते उपस्थित होते.
नौपाडा विभागातील वाचन कट्ट्यावर वेगवेगळ्या क्षेत्रातील नामवंतांना संस्थेचे संस्थापक किरण नाकती सर प्रकाशात आणून त्यांचे कार्य समाजापुढे ठेवण्याचं सामाजिक कार्य करत आहेत. सर्व श्रोत्यांचे श्री. नाकती सर यांनी आभार मानले.