सावरोली शाळेतील विद्यार्थ्यांनी बनवले 20 हजार सीड बॉल

ठाणे :  पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व संवर्धन करण्यासाठी शहापूर तालुक्यातील जिल्हा परिषद सावरोली बुद्रुक शाळा पुढाकार घेत आहे. विद्यार्थ्यांच्या दुसऱ्या सत्राची परीक्षा संपल्यानंतर सीड बॉल (Seed Ball) बनवण्याचा एक अनोखा उपक्रम हाती घेऊन तब्बल 20 हजार सीड बॉल तयार केले आहेत.

विविध बिया, माती, शेणखतापासून तयार करण्यात आलेल्या सीड बॉल कृषी दिनानिमित्त शहापूर तालुक्यात गटविकास अधिकारी भाऊसाहेब रेंगडे यांच्या हस्ते मातीत विविध ठिकाणी टाकण्यात आले.

शाळेतील पटसंख्या 74 असून, विद्यार्थ्यांना निसर्गा विषयी प्रेम आत्मीयता जागृत करणे. पर्यावरण आणि मनुष्य यांचा सहसंबंधाची जाणीव करून देण्याच्या उद्देशाने ह्या उपक्रमाची संकल्पना ह्या शाळेतील शिक्षिका पूनम रवींद्र उबाळे यांची असून यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. शाळा सुरू झाल्यावर गटागटा मधून सीड बॉल जमा करण्यात आले असून सर्वाधिक सीड बॉल बनवणाऱ्या गटाला बक्षीस देऊन गौरवण्यात आले आहे.

या उपक्रमासाठी गटविकास अधिकारी भाऊसाहेब रेंगडे, गटशिक्षणाधिकारी भाऊसाहेब चव्हाण, विस्तार अधिकारी डॉ. प्राजक्ता राऊत, केंद्रप्रमुख मनीषा जटाळ, वनक्षेत्र अधिकारी शैलेश गोसावी यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच शाळेचे मुख्याध्यापक मनोज गोंधळी, सहशिक्षक अरुणा शेलार, विजयकुमार उदार, सरपंच रोहन चौधरी, उपसरपंच शुभम चाभरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बेबी सोंगाळ, सर्व पालक व ग्रामस्थ यांनी सहकार्य केले आहे.

Leave a Comment

× How can I help you?