ठाणे : अनधिकृत हॉटेल, पब, हुक्का पार्लर आणि बार व्यवसायिकांना पाठीशी घालणाऱ्या ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण आणि निष्कासन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संपत्तीची चौकशी करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सरचिटणीस व ओवळा माजिवडा विधानसभा अध्यक्ष संदीप पाचंगे यांनी ठाणे महापालिका आयुक्त यांना निवेदन देऊन केली आहे.
मुख्यमंत्री यांनी आदेश दिल्यानंतर तात्काळ कारवाई करणाऱ्या अतिक्रमण आणि निष्कासन विभागाचे संदीप पाचंगे यांनी आभार मानले आहेत. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील येऊर, उपवन परिसर, घोडबंदर रोड, कोठारी कंपाऊंड यासारख्या ठिकाणी अनधिकृतपणे चालू असणाऱ्या हॉटेल, बार, पब, हुक्का पार्लर यांवर कारवाई करण्यासाठी करदात्यांच्या पैशांचा वापर होतो. अतिक्रमण व निष्कासन विभागाचे अधिकारी मुख्यमंत्री महोदयांनी आदेश द्यायची वाट पहात होते का? असा सवाल संदीप पाचंगे यांनी केला आहे.
दक्ष नागरिक, लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांनी यापूर्वी केलेल्या तक्रारींवर कारवाई न करण्यासाठी अतिक्रमण व निष्कासन विभागाला कोणी थांबवले होते? अतिक्रमण व निष्कासन विभागातील विभागातील काही अधिकाऱ्यांची गेल्या काही वर्षात वाढलेली संपत्ती दुर्लक्षित करून चालणार नाही. अनधिकृतपणे व्यवसाय करणारे व त्यांना अभय देणारे दोन्ही समान दोषी आहेत. सध्या देखील कारवाई करताना काही व्यवसायिकांना अभय देण्यात येत आहे, असा आरोप संदीप पाचंगे यांनी केला आहे.
