ठाणे : ठाणे महापालिकेचे कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. जून महिन्यात 21 नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर गेल्या सहा महिन्यात 89 नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. ऑगस्ट 2023 मध्ये एकाच दिवशी 18 रुग्ण दगावल्याच्या घटनेला एक वर्ष पूर्ण होत नाही तोच पुन्हा एकदा ही आकडेवारी समोर आली आहे.
ऑगस्ट 2023 मध्ये एकाच दिवसात 18 रुग्ण दगावल्याची घटना येथे घडली होती. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयाला भेट देत रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांना रुग्णालयात सुविधा करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र अद्यापही रुग्णालयात सुविधा नसल्याची ओरड रुग्णांच्या नातेवाईकांकडून करण्यात येत आहे. तर रुग्णालयावर मोठा भार पडत असून भिवंडी, मुरबाड, शहापूर, कल्याण आदी भागात एनआयसीयूची सोय नसल्याने नवजात बालक अत्यावस्थ होऊनच येथे येतात. मात्र तत्काळ उपचार मिळाले नसल्याने त्यांच्यावर उपचार करणे कठीण असते. त्यामुळेच रुग्ण दगावण्याच्या घटना घडतात, अशी माहिती येथी वैद्यकीय अधिकारी डॉ. राकेश बारोट यांनी दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय केवळ 30 एनआयसीयू खाटा असून त्यातील 20 खाटा रुग्णालयातील रुग्णांसाठी तर 10 बाहेरून आलेल्या रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.