गुनाह करके कहाॅं जाओगे गा़लीब ये ज़मीं ये आसमाॅं सब उसी का है

मिर्झा गालीब यांचा हा शेर आहे. गालिब वयाच्या अकराव्या वर्षापासून शेर लिहीत आहेत.जीवनात अनेक गंभीर झळा सोसलेल्या या माणसाने जीवनाचे गंभीर तत्त्वज्ञान आपल्या शायरी आणि साहित्यात मांडलेले आहे. त्यांच्या गहन रचनांचा अर्थ लावणे फार अवघड असल्याचे अनेक साहित्यिक मान्य करतात.सेतू माधव पगडी, विद्याधर गोखले, डॉ.अक्षयकुमार काळे या साहित्यिकांनी गालिबच्या रचनांमधील अर्थ जाणत्या वाचकापर्यत पोचविण्यासाठी ग्रंथ रचना केल्या आहेत.. वरील शेराच्या मल्लिनाथीपूर्वी वरील प्रास्ताविक आवश्यक होते, आता माझी मल्लिनाथी सुरू करतो.
गालिब नेहमीच स्वतः ला उद्देशून जीवनाचे एक तत्त्वज्ञान मांडत आलेला आहे. वरवर साधा वाटणारा हा शेर मला गीतेतील तत्त्वज्ञानाकडे घेऊन गेला.भगवान श्रीकृष्णांनी गीतेमध्ये कर्मगतीचे तत्त्वज्ञान विशद केलेले आहे. कर्मगती फार गहन व गूढ आहे. मानवी जीवन गूढ आणि गुंतागुंतीचे आहे. जीवनात सुख येते दुःख येते.तसेच काही माणसे अधिक सुखात तर काही अधिक दु:खात असल्याचेही दिसते. या विरोधाभासामागे कर्मगतीचे तत्त्वज्ञान आहे असे गीता सांगते.कर्माचे भोग भोगावेच लागतात.कर्म केले की त्या कर्माचे फळ चिकटलेच समजायचे.ती फळे भोगल्याविना सुटका नाही. वरील शेरामध्ये गालिब तेच तर म्हणत आहे, “हे सारे जग,चराचर त्या प्रभूनेच निर्माण केलेले आहे या शिवाय हे मानवा तू कुठे जाणार आहेस? तू केलेल्या साऱ्या कृत्यांची परतफेड तुला येथेच करायची आहे!

“कुठे जाल तिथे कर्माची फळे पिच्छा पुरवीत असतात,त्याचा परिणाम भोगल्याशिवाय सुटका नाही.कर्माचा अटळ सिद्धांत असा आहे की,’जे पेराल ते उगवेल’,’जसे कराल तसे भराल’. परंतु प्रत्यक्ष व्यवहारात आपला अनुभव असा की जो माणूस न्याय नीती व धर्माने वागत असतो त्याला जीवनात खूप दुःखे भोगावी लागतात. या उलट अधर्माने वागणारे, काळाबाजार करणारे जीवनात मौजमजा करीत असतात.याला गीतेच्या तत्त्वज्ञानात असे उत्तर आहे की,ते त्यांचे सांप्रतपापाचे फळ नसते तर त्याने पूर्वीजन्मी केलेल्या पुण्याचे ते फळ असते.पूर्वपुण्याईचा जोर ओसरताच पापकर्मे आपला प्रभाव दाखवायला सुरुवात करतात. संत कबीर म्हणतात,
“कबीरा तेरा पुण्यका जब तक रहे भांडार|
तबतक अवगुण माफ है,करो गुनाह हजार||

गीता म्हणते कर्म सिद्धांतावरील आपला विश्वास आणि परमेश्वरावरील दृढ श्रद्धा किंचीत ढळू देऊ नये.प्रत्येकाने सत्कर्मे करीत आपल्या सुफळांचा साठा मोठा करावा. दुष्कृत्ये केली त्याची कुफळे चिकटलीच समजा. मग त्या फळांचे परिणाम भोगावेच लागणार त्याशिवाय तरणोपाय नाही..बोधीधर्मातील सुत्रांत हेच सांगितले आहे,”According to sutras evil deeds results in hardship and good deed results in blessings” हे बोधीधर्मात हे सांगितले आहे . विभिन्न धर्मांच्या तत्वज्ञानांत हीच विचारधारा आढळते.

जैसी करणी
तैसीचे भोगणे
नाही सुटका
या जन्ममरणे

©️®️ मोरेश्वर बागडे

Leave a Comment

× How can I help you?